बुधवार 08 मे 2019

मातृश्का ............

प्रिय पि, नातं कसं जपायचं ? असा तुझा प्रश्न होता……….

नातं हे एखाद्या दोरी सारखं असतं, त्या दोरीने एखाद्याला करकचून बांधून ठेवता येतं, जसं नवरा आणि लग्नाची बेडी. याना त्याला म्हणतात बंध (रेशमाचे) . याच दोरीने दोन जीवांमध्ये सेतू बांधता येतो जो मैत्रिणी, कुटुंबीय, यांच्याशी असतो. त्याला म्हणतात अनुबंध. काही नाती अदृश्य दोरीने आपल्याला अनोळखी व्यक्तीं बरोबर बांधून ठेवतात. पूर्व जन्माचं देण असल्यासारखी. त्याला म्हणतात ऋणानुबंध. एकाच नात्याचे हे तीन पदर, बंध, अनुबंध, ऋणानुबंध.

तू त्या सुंदर रशियन बाहुल्या बघितल्या आहेस का ? त्यांना म्हणतात मातृश्का. लॅटिनमध्ये मातर म्हणजे आई,  संस्कृत मध्ये मातृ. स्त्रीप्रधान मातृसत्ता करशियन समाजाची हि प्रतिनिधी. त्या बाहुल्या एकातएक असतात एकीच्या पोटात दुसरी , दुसरीच्या पोटात तिसरी. आपण या मातृशका सारख नातं उघडून बघूया, काय सापडतंय ?

नात्याच्या पोटात कोण ? प्रत्येक नात्यात असतो एक संवाद. सुसंवाद म्हणजे मित्र, कुसंवाद म्हणजे शत्रू.  मित्राबरोबर हा संवाद उतू जाणाऱ्या ताज्या दुधासारखा असतो. कधीतरी त्यात संशयाचं चिमूटभर मीठ पडतं,  त्यात मत्सराचं लिंबू पिळलं जातं, दूध नासतं मग तयार होतो शत्रू. संवाद वाणीचा आणि देहबोलीचा सुद्धा हवा. संवाद नात्याचा ऑक्सिजन आहे. संवाद असेल तर घरच्या मोलकरणीशी सुद्धा घट्ट नातं नसेल तर नवऱ्याशीसुद्धा xxx.

मग संवादाच्या पोटात कोण ? संवादाच्या मागे सह-अनुभूती. शांतपणे, संपूर्णपणे ऐकून घेणं, जे तुझी मैत्रीण करू शकते . मैत्रीण शब्दाची व्याख्याच मुळी दुपारी जेवण झाल्यावर तासंतास आपलं रडगाणं कुठलाही उपदेश, सल्ला, प्रतिक्रिया न देता ऐकणारी बाई अशी आहे. नवरा हे करू शकत नाही. (काही भाग्यवान बायका सोडल्या तर). तो एक तास शांतपणे ऐकून घेउ शकत नाही. तो पाचव्या मिनिटाला तुझ्या प्रॉब्लेमवर उपाय सांगून मोकळा होईल आणि भिंतीकडे तोंड करून घोरू लागेल.

अर्जुन कृष्णाचं नातं संवाद आणि सहअनुभूती यावरच उभं होतं. ऐन युद्धात शस्त्र टाकून बसणार्या अर्जुनाचं कृष्णाने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. तिथे नवरा बायको असते तर नवरा म्हणाला असता, तरी मला वाटलच होतं, चल हो बाजूला, मी बघतो असं म्हणून त्याने धनुष्यबाण हातातून घेऊन कौरवांबरोबर ढिशुमढिशुम फायटिंग सुरु केली असती, थोडक्यात काय तर संवादासाठी सहअनुभूती हवी.

मग सहानुभूतीच्या पोटात कोण ? समंजसपणा. समजा बागेत दोन मुली खेळायला आल्या आहेत. तिथे एक झोका आहे आणि एक सी सॉ. जर त्या नुसत्या मैत्रिणी असतील तर झोक्यावर मी आधी, मी आधी बसणार म्हणून भांडतील,  एकीचे झोके दुसरी मोजेल, दहा झाले कि झोका पकडून तिला खाली उतरवेल. पण त्या समजूतदार मैत्रिणी असतील तर सी-सॉवर बसतील, एकत्र आनंद घेतील. याला म्हणतात समंजसपणा. म्हणजे मी वाट्टेल ते ऐकून घायचं कि काय?  असा तुझ्या मनातला प्रश्न इथे मला जोरात ऐकू येतोय. त्याचं उत्तर म्हणजे मन शांत असेल तरच तू ऐकून घेऊ शकशील, नाहीतर तुही तलवार उपसशील.

समंजसपणाच्या पोटी कोण ? तर अर्थात मन:शांती !! मनाचा समुद्र खवळला कि विचारांची बोट भरकटते,  भलत्याच दिशेला लागते, क्रोधाच्या खडकावर आपटते, भांडणाच्या गाळात रुतते. समोरचा निघून जातो. आपण मात्र रुतून बसतो.  समोरच्या व्यक्तीचा राग, द्वेष, संताप हा पावसात भिजून घरी आलेला पाहूणा समज. त्याला जरा बसू दे, टॉवेल दे,  आल्याचा चहा दे. त्याला फक्त तुझ्याकडे मनावरचा भार उतरवायचा आहे. आल्या पावली तो निघून जाईल. जाताना थँकयु देखील म्हणेल.

पि, लक्षातठेव, गीता घडली ती कृष्णार्जुन नात्यामुळे, महाभारत घडलं ते नातं बिघडल्यामुळे, रामायण घडलं ते रामाने नात्याची किंमत चुकवल्यामुळे. मानवी जीवनात नात्याचं एवढ मोठं मोल आहे.

सारांश. मन शांत ठेव, समंजसपणा दाखव, शांतपणे ऐकून घे, संवाद सुरु कर, प्रत्येक नातं सुंदर होईल,  त्या रशियन मातृश्कासारखं !!