बुधवार 08 मे 2019

तळ्यातला पारिजातक, एक गुपित !!

प्रिय अनुप्रिया, किती छान नाव आहे तुझ ? तू प्रश्न विचारलास की आपला आत्मा दिसावा म्हणून काय करायचं ? कॉलेजमधल्या मुलीकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. असो, प्रयत्न करतो.

तू तळ्याकाठी प्राजक्त बघीतलायस का कधी ? त्याचं प्रतिबिंब स्वच्छ तळ्यात पडतं. ते त्याच्यापेक्षाही सुंदर दिसतं. परमेश्वर हा त्या पारिजातका सारखा असतो फक्त मानवी डोळ्यांना दिसत नाही. आणि आपला आत्मा त्याचं प्रतिबिंब, आपल्या मनात पडलेलं. ते मात्र दिसू शकतं.

अगं खरंच ! मन एक तळं असतं. पण त्यावर राग, द्वेष, शत्रुत्व, स्वार्थ या सर्वांचा तवंग असतो जसा तळ्यावर शेवाळ, कचरा, पाचोळा वगैरे. आत्मा दिसायला मन तर स्वच्छ हवं. मन सुद्द तुजं गोष्ट हा ये पृथ्वी मोलाची....... , गाणं ऐकलंय सना? खरंच आहे ते. पण कसं करायचं हे मन सुद्द ?? तर जुन्या वाईट आठवणींच शेवाळ काढून टाकायचं, नैराश्याचा पाचोळा दूर करायचा, त्यावर समंजसपणाची तुरटी फिरवायची. राग, द्वेष, शत्रुत्व यांचा गाळ खाली बसतो. म्हणजे काय ? तर xx ला सोडून दे ग ! xx ला माफ करग !! xx जाऊ दे ग !! अस मनाशी सतत म्हणायचं आणि मनात काहीही न ठेवता माफ करायचं. मागचं विसरून जायचं. तळ्यातल्या दिव्यांसारखं सोडून द्यायचं. संस्कृत मध्ये याला मध्यमावाणी म्हणतात, सायकोलॉजी मध्ये सेल्फटॉक, स्वसंवाद.

एकदा का मन आरस्पानी झालं की प्राजक्ताचं प्रतिबिंब नक्की पडेल. आत्मा दिसू लागेल. खूप छान अनुभव असतो तो . अदृश्य परमेश्वराच्या म्हणजे ज्या प्राजक्ताच्या झाडाखाली बसून तू हे सगळं करतेयस तो सुद्धा आनंदाने डोलू लागेल , तुझ्यावर इच्छापूर्तीच्या केसरी फुलांचा वर्षाव करेल. तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल. त्यासाठी देवळात जाऊन तुला त्याला गदागदा हलवावं लागणार नाही.

ज्या क्षणी तो तुला तुझ्यात गवसला त्या क्षणी तू सगळं जिंकलस ! आहे कि नाही गुपित !!