बुधवार 08 मे 2019

आणि अभिनंदन सुखरूप परत आला !!

बऱ्याच दिवसांपासून दोघांमधे धुसफूस चालू होती. धूर दिसत होता पण आग दिसत नव्हती. शेवटी तिने विचार केला, इनफ इज इनफ, आज सर्जिकल स्ट्राईक करायचाच. तो आंघोळीला गेला असता ती त्याचे मोबाईल मेसेज वाचू लागली . ऑफिस मधल्या अतिरेकी बायकांशी त्याचे संबंध होते. तो नेहेमीच इंनकार करत असे. तिने त्या अतिरेकी बायकांचे व्हाट्सअँप चॅट चे अड्डेच उध्वस्त केले. हा तर हजार किलोचा बॉम्ब झाला. तिने सगळे मेसेजेस पुरावा म्हणून आपल्या मोबाईलवर फॉरवर्ड करून ठेवले. २१ मिनटात ती एलओसी क्रॉस करून पुन्हा एकदा हॉलमध्ये येऊन बसली. फ्रिजमधली बाटली काढून थंड पाणी घटाघटा प्यायली.

तो अंघोळीहून आला. आपला मोबाईल कोणीतरी उचलून वाचला आणि पुन्हा परत वेगळ्या पोजीशनमध्ये ठेवला हे त्या मिलेनिअल, स्मार्ट नवऱ्याला कळणार नाही का ? सर्जिकल स्ट्राईक त्याच्या लक्षात आला पण तो पर्यंत वेळ गेलेली होती. त्याने हॉलमध्ये येऊन रागाने लालबुंद होत पहिला एफ१६ सोडला, तो म्हणाला, " नवर्याचा मोबाइल न विचारता वाचायचा नसतो हे शिकवलं नाही वाटतं तुझ्या सुशिक्षित आईबाबांनी ?"

तिला माहितीच होतं तो असा अनपेक्षित हल्ला करणार. तिचं मिग२१ आकाशात घिरट्या घालतच होतं. तिचा इगो, आत्मसन्मान, अभिनंदन चवताळून उठला. त्याने प्रति हल्ला केला. ती म्हणाली, हो, शिकवलयना !! वाचून पुढे काय करायचं ते सुद्धा माझ्या वकील बाबानी शिकवलंय !!.

वकील बाबांचं नाव काढताच एफ१६ हवेमध्येच कोलमडला, गटांगळ्या खाऊ लागला. तिने दुसरा युनिव्हर्सल हल्ला केला . "मी म्हणून टिकले, दुसरी कोणी असती तर केव्हाच पळून गेली असती" तिने अखिल विश्वातल्या स्त्रीजातीच्या रक्तात भिनलेला डायलॉग टाकला.

आता मात्र एफ१६ ने मिगवर प्राणघातक हल्ला केला, मग जा, ना, कोणी अडवलंय ? वाट कसली बघतेस ?. हा हल्ला मिग२१ ला वर्मी लागला. तो या धक्क्याने खाली येऊ लागला. इगो, अभिनंदन मात्र हुशार होता, त्याने वेळीच जीव वाचवायला पॅराशूटने उडी मारली. पण तो त्याच्या क्षेत्रात पडला.

शेवटच्या वाक्याने अभिनंदनचं नाक ठेचलं, तिचा आत्मसन्मान दुखावला, भळाभळा रक्त येऊ लागलं. सुदैवाने त्याचा विवेक वेळीच जागृत झाला. त्याने अभिनंदनला अजून दुखावलं नाही. तो त्याला ऑफिसमध्ये घेऊन आला. चौकशी केली . नाकाला मलमपट्टी केली. गरमागरम चहा दिला. एक वीडियो काढून ठेवला. इगोने सुद्धा त्याचं कौतुक केलं. पण तो वाकायला तयार नव्हता, इगोचं तो !. फुरफुर करून चहा पित होता. बाणेदारपणे उत्तरं देत होता. तो दिवस असाच शांततेत गेला. एकमेकांकडे पाठ करून झोपण्यात रात्र गेली.

सकाळी तो नेहेमी प्रमाणे सगळं विसरून उठला. तोपर्यंत तिने रक्षा मंत्रालय (आई) आणि एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर (सासू) दोघांनाही कळवून टाकल होतं. भिशीच्या मैत्रिणींची प्रेस कॉन्फरेन्स सुद्धा ठरली होती. शेजारच्या राष्ट्राला कोंडीत पकडण्यासाठी तिने जय्यत तयारी केली होती. डाव टाकला होता. दात घासून तो नेहेमीप्रमाणे म्हणाला, हेकाय ? चहा कुठाय ? ती घुश्यात म्हणाली, घ्याना करून, मी गेल्यावर कोण देणारेय ?

त्याला रात्रीचा सगळा प्रकार आठवला. त्याचे खाडकन डोळे उघडले. आता त्याचा इम्रानखान झाला होता. त्याच्या हृदयात बसलेला सद्सद्विवेक म्हणाला, ए, भाय, किसके साथ पंगा ले रहा है तू ? चल मांडवली कर !! तो एक मोट्ठा आवंढा गिळून म्हणाला, ऐक, शांत डोक्यानी विचार कर. युद्ध कोणाच्याच हिताचं नाही. तुला पक्क माहितेय कि माझ तुझ्याशिवाय पान हलत नाही. मी तुझ्या आत्मसन्मानाला इजा केलेली नाही. तो सुखरूप आहे. भांडणात शब्दाने शब्द वाढतो. दोन्ही बाजूने गोळ्या सुटतात. मी तुझा अभिनंदन परत करायला तयार आहे पण... . ती मध्येच तोडून म्हणाली , नो पण, नो बिण. तो हात जोडून म्हणाला, बर बाई !!. चल सोड आता, आज रात्री पिक्चरला जाऊ. उरी लागलाय . ती लटक्या रागाने म्हंणाली, उरी नको बाई, उरी बाण लागलाय तेवढा पुरे आहे, युद्ध नको, कुठलातरी रोमँटिक बघू. तिने चहासाठी आधण ठेवलं.

अशा तर्हेने तिचा आत्मसन्मान त्याच्या ताब्यातून वेळीच सुखरूप सुटला. आणि अभिनंदन परत आला ........

प्रेमळ सल्ला : नवरा बायकोने कितीही युद्ध करावीत, वेळप्रसंगी सर्जिकल स्ट्राईक करावेत पण एकमेकांच्या इगोला, आत्मसन्मानाला इजा करू नये. ज्याचा असेल त्याच्याकडे सुखरूप पोचवावा.