बुधवार 08 मे 2019

अरायवल थेरपी – आनंदाचे डोही आनंद तरंग

लग्नासाठी भाऊ आणि त्याच्या गोडगोड मुलींना रिसिव्ह करायला मी अरायवल टर्मिनलला गेलो. विमान प्रवासी (एसटीच्या भाषेत सांगायचं तर पाशिंजर) भरभरून बॅगा घेऊन बाहेर पडत होते. वाट बघणारे आतुरतेने उभे होते. आपलं माणूस दिसलं की त्यांचे चेहरे फुलत होते. ते हात हलवत होते. आल्यावर मिठी मारत होते पाप्या घेत होते.

कोणी मागच्या वर्षी u.s. च्या युनिव्हर्सिटी गेलेला मुलगा आत्ता महिन्याच्या सुट्टीवर आला होता. त्याला घ्यायला त्याचे आई-बाबा होते. बाबांचं हसू आणि आईचं रडू एकाचवेळी दिसत होतं कारण अनेक दिवसांनी भेट होत होती. बहुतेक या ट्रीपमध्ये बघायचा कार्यक्रमसुद्धा होणार असं वाटत होतं.

कोणी नवीन लग्न झालेला नवरा ऑफिसच्या तीन महिन्याच्या टुरवरून परत आलेला होता. त्याला घ्यायला आलेली त्याची गरोदर बायको भेटण्यासाठी आतुर होती. फोनवरून गुडन्युज दिल्यानंतर आज पहिलीच प्रत्यक्ष भेट. पातेल्यातल्या उतू जाणार्या दुधासारखं त्यांचे प्रेम, त्यांची गळामिठी, तिच्या पोटावरून फिरलेला ओझरता हात आणि बाप होण्याच्या कल्पनेने त्याला आलेली शिरशिरी हे सगळं माझ्या नजरेने टिपलं.

एखादा ड्रायव्हर बाँसला घ्यायला आला होता. त्याची ब्रिफकेस घेऊन ट्रॉली ढकलत चारपावलंपुढे चालत होता. त्याचा चेहरा जणू ओरडून सांगत होता. धावरसं झाली नोकरीत. आमचे साहेब लई चांगले, देवमाणूस !!मागच्या टायमाला बाळंतपणात माझी बायको अडली होती. समदा खर्च साहेबांनी केला.

पाहुण्यांच्या नावाचे बोर्ड घेऊन बरेच हाँटेलवाले कंपनीवाले ऊभे असतात.

एखाद्या कंपनीचा एक्झिक्यूटिव्ह जपानी किंवा कोरियन पाहुण्यांना घ्यायला आलेला असतो आणि आदल्या दिवशी त्याला मँनेजरने दिलेली तंबी आठवते, बघहां, या साहेबाचं फक्कड स्वागत झालं पाहिजे, मोठ्ठी ऑर्डर देणार आहे, तोंडफाटे पर्यंत हसत तो शेकहँंड करतो.

एखादा गावाकडचा हुशार मुलगा परदेशी शिकायला जातो तो पहिल्यांदाच सुट्टीत घरी येतो त्याच्या गावाकडची लोकं त्याला घ्यायला आलेली असतात हातात झेंडूच्या फुलांचा हार, कानावर कडाकडा बोटं मोडणारी राधाक्का, टोपीवाले गावातले काका, धोतरवाले अण्णा, लयभारी दिसतोस गड्या असं म्हणून गच्च मिठी मारणारा जीन्सटी-शर्ट आणि खुरटी दाढी वाढवलेला भावड्या हे गोड, निष्पाप चित्र दिसतं.

एकूण काय तर सगळीकडे आनंद सोहळा, गळाभेटी, हास्यफवारे, कौतुक, आनंदाश्रू, चुंबन, आनंदाचे डोही आनंदत रंग .....

एकाच ठिकाणी एवढं सगळं आणि ते सुद्धा मुंबईत? तुम्हाला बघायला मिळत ? दररोज फ्लाईट लँंड झाल्यावर, भारतात आणि जगात सगळ्या एअरपोर्टवर दिसतं आपण मात्र आनंद शोधण्यासाठी वणवण भटकत असतो .कोणी पर्वताच्या शिखरावर चढतो. पाण्यात डुबकी (स्क्युबाडायवींग )घेतो. कोणी कोट्याधीश देवाच्या मंदिराबाहेर रांगेत उभा राहतो. अरे बाबानो, हेच खरं मानवतेचं मंदिर !!

खरंच असं अख्ख जग असू शकणार नाही का? निद्रानाश, वैताग, चिडचिडाबाँस, खाष्टसासू, कुचकट शेजारी अशा अनेक रोगांवर बहुगुणी अशी ही नवीन अरायवल थेरपी रोज एकतास नक्की घ्या .ईश्वराकडे ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं जगाच्या कल्याणाकरता. मला जर देवाने विचारलं सांग तुला काय हवे ? तर मी सांगेन विश्वेश्वरा, अख्ख्या जगाचं अरायवल टर्मिनल कर !!