मंगळवार 07 मे 2019

प्रिय वौटस एप,

तू तर एक इवलासा हिरव्या साबणाचा बुडबुडा आहेस. तू काय करणार अस वाटल होत. पण तू तर अक्ख्या त्रिभुवनावर राज्य करतोयस, विष्णुच्या बटू वामन अवतारासारखा. दोन वर्षात इतका मोठा झालास की झुकरबर्गने मान झुकवली आणि तुला एक लाख करोडला विकत घेतल.

अस म्हणतात की एक सरदारजी म्हणाला, कायको इतना पैसा खर्चा किया? मैने तो फ्री डाउनलोड किया! घराघरात, गावागावात, देशादेशात तू आणि तूच. तुझयामुळे बायकोला नवर्यासाठी, मुलाना बापासाठी, क्लार्कला साहेबासाठी, टीचरना मुलांसाठी, कोणालाही कोणासाठी वेळच नाही.सगळेच बिझी. खरतर तुला शांततेच नोबेल प्राइज़ मिळायला पाहिजे. कारण तुझयामुळे घरात, ऑफीसमधे प्रचंड शांतता असते. जो तो आपल्या मोबाइलवर वौट्सेपचे जोक्स फॉर्वर्ड करण्यात मग्न. त्यात एक जोक चार ग्रूप्सना फॉर्वर्ड करायचा. किती बर बोटाना काम? थकून जायला होत. संवाद बंद, वादही बंद, नात्याचा आस्वाद तर पूर्ण बंद. मग तुझयावर मात करायला काही पॉज़िटिव थिंकिंगवाले लोक कुटुंबाला बाहेर हॉटेलमधे घेऊन जातात बोलायला. पण तिथेही तेच. ऑर्डर समोर येईपर्यंत तुझी संगत कोणी सोडायला तयार नाही.

नशीब, जेवताना बोलताही येत. बाहेरगावी जाव तर पहिली अट, वायफाय आहे का? एवढ होईल असा वाटल नव्हत.! मूर्ती लहान पण किर्ती महान. तुझयावरून आठवल, तीन हजार वर्षापूर्वी कणाद ऋषी राजवाड्याकडे जाताना लोकानी रस्त्यावर टाकलेले तांदूळ वेचत होते आणि लोक त्याना वेडा म्हणत होते. पण त्यातूनच त्याना कल्पना सुचली की अणू हा पदार्थाचा सर्वात लहान कण असावा. ते म्हणाले होते जितका लहान तितका शक्तिमान, सावध रहा. बहुतेक तुझयाबद्दल बोलत असावेत. थोड विषयांतर, शास्त्रद्न्यानी हिग्स बोसोन शोधून काढला तेव्हा गणु जोशी सकाळीच पेपर घेऊन घरात घुसला होता. अरे वाचालस का? अमेरिकेत " हिप्स बॉटम "चा शोध लावलाय, अरे आमच्या कणाद ऋषिनी आधीच लावला होता, उगाच पैशाची नासाडी ! त्यापेक्षा अन्न द्या म्हणाव गरिबाना. मला चहा पिताना ठसका लागला, म्हटल गण्या, हिप्स बॉटम नव्हे, त्याचा शोध आदमईवच्या काळापासून मानवाने लावलाय. हे हिग्स बोसोन !! आणि सकाळीच काय रे पेपर ढापतोस हल्ली? गणुला म्हणजे अणुचीही अक्कल नाही.

बिचारया नवराबायकोच्या कबाबात सुधा तुझी हड्डी असते. माझीच गोष्ट सांगतो, माझी म्हणजे प्रातिनिधिक आहे, सर्वांच्या घरात घडतेय पण कोणी सांगायला तयार नाही. म्हणून माझी म्हणालो, बायकोच्या नातेवाईकानी कृपया घरावर मोर्चा आणू नये.

माझी बायको एकदाची टीवि सीरियल्स संपवून, किचन आवरून, फ्रेश होऊन , पर्फ्यूम मारुन, बेडरूम मधे येतें. मी सुधा गुळगुळीत दाढी करून ( पुरुषांचा तेवढाच शृंगार) कपाटात लपवलेल आक्स (axe) मारुन येतो. गणु जोशाने घ्यायला लावले, म्हणे लिफ्ट मधे " सुखकर सहवास” मिळतो. पण आक्सने माझ्या स्वप्नावरच कुरहाड (axe) मारली. एक दोन सुकन्या सटासट शिन्कल्या. उरलेल्या आधीच्या मजल्यावर उतरल्या. गणु म्हणाला, अरे एवढ नसत मारायच , ते काय डासांच औषध आहे? त्यानंतर काढल ते डाइरेक्ट आज.

असो, बेडरूममधे आल्या आल्या बायको खळ्खळुन हसतें. मी चकित होतो. मग कळत , बायको वौट्सेपवरच्या सरदारजीच्या जोकला हसतेय. ए, ऐक ना, म्हणत दिवसभराच वौट्सेप पुराण ऐकवते. माझ्या मोबाइलवर आमच्या जोरुके गुलाम ग्रूपची ट्रिंग वाजत असते. बर का, वौट्सेप, तुझ्या मुळे जोरू के गुलाम ऐवजी जोरूपासून लांब अस झालय माझ. निद्रादेवी माझ्या पापण्यांवर कधीपासुन भरतनाट्यम् करत असते. मी तिला शरण जातो. बायकोच्या अंगावर हात टाकून क्षणात झोपी जातो. संपला आमचा "" शुद्ध देसी रोमान्स "".

मोबाइल वर इंटिमेशन ची ट्रिंग वाजली की स्थळ काळाच बंधन राहात नाही. तुझ्यामुळे इंटिमेसी पेक्षा इंटिमेशनला महत्व आलय. एनीवे, तुझा पराक्रम बघून अचंबा वाटतो, अवधूत गुप्ते असता तर म्हणाला असता व्वा ! गड्या , तोडलास....... पुढे मी म्हणालो असतो, होय, कुटुम्बातला संवाद, पण जोडलीस दूरवरची नाती !!!!