मंगळवार 07 मे 2019

लग्नाच्या २७ व्या वाढ दिवसाच्या निमित्ताने !!

सत्तावीस वर्षांपूर्वी मी स्वप्नांची गिटार हाती घेऊन तारुण्याच्या हिरव्या लुसलुशित कुरणातुन एका स्वच्छंद हरणा सारखा बागड्त होतो. इतक्यात लग्न नावाच्या विहिरीवरुन जाताना मला आवाज आला, धावा, धावा, वाचवा!! वाकून बघतो तर काय? एक मुलगी हातात कांदेपोहे चहा घेऊन माझी वाट बघत होती. मी धापकन आत उडी घेतली. अन् एक गुटगुटीत भटजी हातात आन्तर्पाट घेऊन उभे होते , नेमका त्यांच्याच पुढयात मी पडलो. भटजी ओरडले, xx xxx सावधान !!! वाजवा रे वाजवा!! सगळीकडे एकाच जल्लोष झाला. गळ्यात वरमाला पडली. अशा रीतीने मी विहिरितला एक प्रतिष्ठीत बेडुक झालो होतो. रामायणातल्या मायावी मारिच राक्षासासारखा धावा, धावा, वाचावा असा आवाज काढून बाहेरच्या हरणाना आत बोलावणे आणि त्यांचा बेडूक करणे हेच माझे परंप्रपंचकर्तव्य होते. आजूबाजूचे बेडूक म्हणत, या विहिरित खाली खोल खजिना आहे . तो हाती लागला की बाहेर पडायचे.

त्यासाठी दर वर्षी एक कळशी उपसून पाणी बाहेर टाकायचे. कधितरी लागतोच खजिना. मी २७ कळशा पाणी उपसले. शोधता शोधता खोल दगडात माझी जुनी फुगुन बसलेली गिटार सुद्धा दिसली पण खजिना काही हाती लागेना.

अचानक एका दगडाखालुन एक मगर फुस्सकंन बाहेर आली. म्हणाली काय शोधतोयस इथे? हिरे माणक? हिरयासारखी बायको, सोन्यासारखी मुलगी, मोत्या माणका सारखी नाती, मित्र, कुटुंब हाच तो खजिना. तो मिळाला ना? मग आता पोहर्यात बसून बाहेर पड, पुन्हा हरिण हो !! आता या विहिरीत फक्त मी राहणार ! यंदा मला कर्तव्य आहे !!   मगर अशी लाल होईपर्यंत लाजताना मी पहिल्यांदाच बघत होतो !!!!