मंगळवार 11 डिसेंबर 2018

नवीन देव

बाबा, मला नवीन देव पाहिजे. ऑफीस मधून दमुन आलेल्या बाबाना सोनुने गुगली टाकला. मला नकोत हे जुने तेच तेच देव! त्यांच्या स्टोरीज मला माहितेयत. बाबा म्हणाले, सोनू मी दमुन आलोय, डोक नको खाऊ, संध्याकाळी मौल मधे जाऊ, नवीन देव घेऊ, ओके? शी!! बाबा, तुला कळतच नाहीए मी काय म्हणतेय ते !

खरच, तुला कळल नाही ती काय म्हणाली ते ! भिंतीवरुन आवाज आला. बाबानी चमकुन बघितल तर घड्याळ बोलत होतं. अरे, मीच तिचा नवीन देव. त्या देवाना चार हात असतात ना तसे मला तीन आहेत. पण त्यांचा अर्थ तुला सांगावा लागेल, माझा सेकंद काटा म्हणजे तुमचं हृदय. याची टिकटिक तशीच त्याची टिकटिक. मीच माझा अंश म्हणून तुमच्यात हृदय बसवलय. तुम्हाला कुठलाही निर्णय घेताना मदत व्हावी म्हणून. तुमचं पोट, मेंदू, हृदय या तिघाना निर्णय घेता येतात. पोट भुकेपोटी आरडाओरडा करतं किवा मेंदू डोळे मिटून आपलाच फायदा बघतो . तुम्ही मात्र पोटाला भूक म्हणून त्याच ऐकता किवा मेंदूला व्यवहार दिसतो म्हणून त्याच ऐकता.

तुम्ही आपल्या हृदयाच ऐकत नाही पण हृदयाचा निर्णय समोरच्याला समजून घेतलेला असतो.

मिनिट काटा म्हणजे तुमचं मन आणि विचार, दर मिनिटाला नवीन विचार येतात ,आलेले बदलतात. पण ते विचार मिनिट काट्यासारखे एकाच दिशेने फिरू देत. उलट्या दिशेने विचार फिरले तर काय परिणाम होतात हे मी सांगायला नको. तुमच्या या दर मिनटाला उगवणार्या विचारामुळेच तुमचं दर तासाच आयुष्य घडत असतं. मिनिट काटाच शेवटी तास काटा फिरवतो. विचारामुळेच तुमच कर्म तयार होतं.

आता तास काटा म्हणजे काय ते बघुया. तास काटा म्हणजे तुमचं आयुष्यं,आजूबाजूचं जग. दर तासाला बदलणारं, नवीन रूप घेऊन येणारं. दर तासाला तुम्हाला त्याच्याबरोबर जुळवून घ्यावं लागतं., स्वत:ला बदलावं लागतं. नाहीतर जग जातं पुढे आणि तुम्ही मागे राहाता. गाडी चुकली म्हणून नियतीला दोष देता. संधी निसटते परत येत नाही, तशीच गेलेली वेळ. “त्यावेळी अस करायला हवं होत” याची खंत मागे राहते. एकदा तास काटा एका जागेवरून पुढे सरकला की परत यायला बराच वेळ लागतो . असच आहे ना आयुष्य सुधा ?

बारा आकडे म्हणजे बारा महिने चार ऋतू. वर्षभर तुमच्या आयुष्याला बारा नवनवे रंग देत मी तुम्हाला साथ देतो. पुढे वर्षानुवर्ष तोच फॉर्मुला चालू राहतो. माझा गोल आकार म्हणजे तुमच्या आयुष्य रथाचं चाक. इतक्या जोराने फिरतं की स्थिर असल्या सारखच वाटतं. तुमच्या वेदिक काळातल्या अत्यंत बुद्धिमान अशा याद्न्यवल्क्य ऋषिंची आठवण झाली. ते म्हणाले होते, माणसाच्या आयुष्य रथाला दोन चाकं असतात. एक इच्छाशक्ती दुसरी नियती, इच्छा शक्ति म्हणजे माझा मिनिट काटा, नियती म्हणजे तास काटा , संथपणे फिरणारा. पण पुन्हा मागे वळुन न पाहणारा. मिनिट काट्याच्या, इच्छा शक्तीच्या प्रयत्नानेच नियतीचा तास काटा हळू हळू फिरत असतो. नाहीतर तो तिथेच अडकतो आणि तुम्ही मात्र नियतीला दोष देता.

मला आता सांग एवढी फिलॉसोफी सांगणारं, सतत तुमच्या सोबत देवासारख राहणारं, अमर्याद अनादी , अनंत काळाचा सगुण अवतार अस मी घड्याळ. तुझ्या मुली साठी नवीन युगाचा नवीन देव का होऊ शकत नाही? आज काळ, वेळ आणि घड्याळ सांभाळलं तर सगळ्या क्षेत्रात देवासारख यश नक्की मिळेल. मला काम सुरू करायला फक्त भक्तिची बॅटरी लागते आणखी काय मागतो मी ? सोनू म्हणते ते खरय, तुला कळलच नाही ती काय म्हणतेय.

बाबा खाडकन स्वप्नातून जागे झाले. बाजूला सोनू शांत झोपली होती. आपल्याच स्वप्नात खुदुखुदु हसत होती. बहुतेक तिला नवीन देव मिळाला होता. पण बाबाना मात्र कळला होता.