मंगळवार 11 डिसेंबर 2018

पाडवा : जे पिन्डी ते ब्रह्मान्डी !!

नवरा बायकोच्या नात्याच्या पणतीत संवादाच तेल असेल तर विश्वासाची वात अखंड पेटत राहते. कुटुंब नावाचं देवघर उजळून टाकते. आज पाडवा, भांडखोर बायको आणि मारकुटा नवरा सुद्धा आज गोड प्रेमात असतात. नवरा चेष्टेत म्हणतो, अग, वर्षभर दावु लाटणं आणि आज लावु उटण ? बायको म्हणते, हो, तुम्ही पण वर्षभर बडवा ,आज मात्र पाडवा. ओवाळण म्हणजे ओळखण. ही सगळी प्रतीक आहेत. अक्षता म्हणजे शुभ व्हाव अस वाटणं, कुंकूमतिलक म्हणजे आदर. हस-या चेहेरयाचं तबक, नेत्रांच्या ज्योती, ओठांचं कपुरी पान, त्यात लाजेची सुपारी, आधी नजरभेट मग पाडवा भेट. हाउ रोमॅंटिक येट पवित्र, मंगल आणि शुभ. हिंदु सणांचा अभिमान का वाटू नये?

कुटुंबाच्या ब्रह्मान्डातले शक्ति आणि शिव आज एकमेकाना ओळखतात. शक्ति ओवाळते , शिव प्रसन्न होतो. ओवाळणी घालतो. वर्षभर सृष्टीने धरेचं सृजन, पालन केल्याबद्दल प्रसन्न होऊन शिवाने केलेलं आकाशातलं मेघ वीज तांडव, चिंब करणा-या घनघनधारा हीच त्याची ओवाळणी. सृष्टी मग ही हिरवी कंच पैठणी नेसून श्रावणा पासून चार महिने मिरवते. स्रुष्टीतला पाडवा कार्तिक महिन्यात असा घरोघरी नवरा बायकोचा पाडवा म्हणून अवतरतो.

म्हणूनच म्हणतात जे पिन्डी ते ब्रह्मान्डी !!

दिवाळी म्हणजे घराचं मन होणं !!

आदल्या दिवशी चांगल्या विचारानी माळ्यावर चढून मनाचा कोपरा न कोपरा साफ करणं. मग दाराबाहेर पूर्वीच्या सुंदर आठवणींची रांगोळी. घरोघरी कर्तुत्वाचा कंदील. छोट्या छोट्या आनंदाच्या पणत्या. समाधानाचा फराळ. चेष्टा मस्करीच्या खुसखुशीत चकल्या. कौतुकाचे रवा बेसन लाडू. हास्याचे फुलबाजा अनार. कुटुंबाच आकाश उजळून टाकणारे प्रेमाचे, नात्याचे, मैत्रीचे लख लख चंदेरी फटाके. उत्सवाचा उत्साहाचा उद्देशच हा असतो. बाहेर घडवावं, आत मनात प्रतिबिंब पडावं.

म्हणूनच दिवाळी म्हणजे घराचं मन होणं !!