मंगळवार 11 डिसेंबर 2018

अध्यात्मिक मुलं !!

आमच्या शेजारच्या मोनिकाला दोन जुळी मुलं आहेत. रेवा आणि ऋग्वेद. वय ६ महिने. रेवाला मी गुगल म्हणतो. गुगगल म्हणजे गुड गर्ल. शहाण्या शांत मुलीसारखी ती जग न्याहाळात असते. मधूनच गूढ हसत असते. जणू गीतेच्या ५ व्या अध्यायातली संन्यासी वृत्ती. तिच्या उलट ऋग्वेद. ३ रा अध्याय, सतत कर्म. त्याला मी याहू म्हणतो. या SSSSS हू !! चाहे कोई मुझे जंगली कहे !! या गाण्यावर नाचल्यासारखे हावभाव तो सतत हवेत करत असतो. पायाने साइकल, हाताने बॉक्सिंग, तोंडाने टारझनच्या आरोळ्या. गुगल आणि याहू अशी दोन टोकं आहेत.

परमात्म्याला पण दोन बाळ आहेत. प्रकृती आणि पुरूष. प्रकृती म्हणजे आपल्या आजूबाजूच जग. दिसणारं, भासणार, घडणार, बिघडणारं जग. सतत कर्म करणारं, उलथापालथ करणारं जग. याहु सारखं. पुरूष म्हणजे काहीच न करणारा , अकर्ता, न दिसणारा, आपला आत्मा. गुगगल सारखा.

मुंडक उपनिषदात असच वर्णन आहे. संसार वृक्षावर दोन पक्षी बसले आहेत. एक आपल्या कर्माच फळ चाखतो आहे, जिव. दुसरा अकर्ता नुसताच पाहतो आहे. परमात्मा. शिव.

माणसाच्या मनात असेच दोन गुगल आणि याहू असतात. मनातला याहू म्हणतो, हे करू, ते करू, आणखी हव, गाडी घेऊ, सेकेंड होम घेऊ,युरोप ट्रिप करू , मूलाना शिकायला परदेशी पाठवू. हे झालं की ते, ते झालं की अजुन ते आहेच. मनातली गुगल नुसतीच गूढ हसते. जणू म्हणत असते. शांत बस, जरा दमाने घे, वर्तमानात जगायला शिक, निसर्ग, माणस, मित्रमंडळ, समारंभ एन्जॉय कर. हा क्षण मुठीत आहे तो भोग. सगळं होईल, अट्टाहास नको. आपला गोंधळ होतो . तिचं म्हणण पटतं पण याहु ने पुरता कब्जा घेतलेला असतो.

एके दिवशी डॉक्टर एक भलं मोट्ठ प्रिस्क्रीप्शन आपल्या हाती देतात. दोन गोळ्या ब्लडप्रेशरच्या, दोन डायबिटीसच्या, एके कोलेस्टरॉल ची, एक झोपेची. वर डाएट, योगा. स्मॉकिंग ड्रिंक्स बंद. जाता जाता डॉक्टर हसून टोमणा मारतात. बस ना आता! अजुन किती? आपल्याला मनाला लागतं. घरी येताना आपण आणि बायको काहीच बोलत नसतो.

रस्त्यात मोनिका भेटते. गुग्गल आणि याहु दोघांना बाबागाडीतून फिरायला नेत असते. याहु आतासुधा शम्मी कपूरच असतो. गुगल अजूनही तशीच गूढ हसत असते. फरक इतकाच की आत्ता आपल्याला तिच्या हसण्याचा अर्थ कळलेला असतो.