मंगळवार 07 मे 2019

मवाली चंद्र

काल चंद्र जरा वेगळा वाटला. खिडकीच्या चौकटीत बराच वेळ रेन्गाळत होता. कोणाला तरी शिळ घालत होता. डोळ्यात जरा "तसले” भाव. कळले ना तसले म्हणजे?. बघतो तर काय? माझ्या खिडकीतल्या तुळशीची चक्क छेड काढत होता. माझ्या मनात विचार आला. अरे, तुम्हारी हिंमत कैसे हुई मेरे सामने........?. डोळ्याला गॉगल, गळ्यात रुमाल, कानावर झुलपे, तोंडात शिळ. मवाली मेला.!!

तुळस बिचारी थरथरत होती. दाताने ओठ दाबून भेदरुन बघत होती. छातीशी वह्या घट्ट धरून ट्युशनला घाईघाईने चाललेल्या कौलेज कन्यके सारखी. पानापानावर कपाळावरच्या घामाचे थेंब. चंद्र जरा जास्तच सुटला होता. चक्क समोर येऊन बघत राहयला तिच्याकडे. तुळशीच्या हृदयाच पाणी पाणी झाल.

इतक्यात एक ढगोबा मध्ये आले. पान्ढरे शुभ्र केस, गोल वाटोळा चेहेरा. त्यानी बघितले याचे चाळे. ते चंद्रावर खेकसले. काय रे ए! कोण आई बहीण नाही का तुला? चल हो बाजूला!! चंद्र घाबरून बाजूला झाला. एका छोट्या ढगा मागे लपला. तुळस खुश झाली. बरी खोड मोडली. तिच्या टपोर्या मंजिर्या हसून डोलू लागल्या.

ढगोबांच्या मागे ढगाजी पण होत्या. गोरयापान, सूरकुतलेल्या, चंदेरी केसांच्या, सात्विक. दोघांच्या अंतरावरून कळत होत की लग्नाला बरीच वर्ष झाली असावी.

ढगोबाना एकदम आपल्या तरुण पणीची आठवण झाली. अशाच एका दिवशी भर पावसात त्यानी विजेची छेड काढली होती. तिने अस्सा शॉक दिला होता की पुन्हा चुकूनसुधा कोणाकडे मान वळवली नाही. " नशीब माझ, नाहीतर त्यादिवशी " ढगातच" पाठवल असत तीने. " ढगोबांच्या मनात विचार चमकुन गेला ...." विजेसारखा ".

मी पुढे होऊन म्हटल थॅंक यु ढगोबा, त्या चन्द्राला झापल्याबद्दल,! ढगोबा डोळे मिचकवत म्हणाले, अरे त्यात विशेष  काय ? त्या वयात मी हेच केल, आणि माझ्या वयात  मी आज केल ते तो करेल.

वयच करत, वयच निस्तरत, आपण निमित्त मात्र, काय समजल?

एवढ्या लगबगीने कुठे निघालात?.. मी विचारल. अरे पाऊस सुरू झाला, आमचे दिवस भरले, अवतार कधी संपेल सांगता येत नाही. मी म्हटल, भीती नाही वाटत संपण्याची, मरण्याची ? आजोबा म्हणाले, अरे जिचा नवरा घरजावई होणार आहे, अशा नवरीला लग्नात रडताना पाहील आहेस का कधी? नाही ना? तसच आमच. समुद्राकडून बाष्प बनून आलो पुन्हा पाऊस बनून माहेरी जाणार. दुक्ख कशाच?.

इतक्यात ढगाजी आल्या पुढे, म्हटल काय आजी,  तुम्ही पण जाणार का? त्या म्हणाल्या, नाही रे बाबा, आमचा अवतार देवाने ठेवलाय लहान मुलान्साठी, सगळेच झाले पाऊस तर मूल आकाशात काय बघणार, पर ब्रम्ह? आजी आजोबांकडे बघून हसत म्हणाल्या.

मी विषय बदलला, आजी चान्दण्या बघीतल्यात का आकाशात ? फुलांसारख्या ! आजी म्हणाल्या, अरे मला काय त्याच? मी दिवसासुधा पहाते. दोन्ही डोळ्यात मोतिबिंदू झालेत ना? आयुष्यभर पतिदेवाने दोन मोती करून गळ्यात कधी घातले नाहीत म्हणून देवाने दोन "डोळ्यात" घातले. आजीनी शेवटी टोमणा मारलाच . मी लगेच मुलाखत आवरली.

म्हटल् आजोबा, पुढे काय विचार आहे? आजोबा एका हाताने आजीना सावरत म्हणाले, एका गरीब शेतकरयाच्या शेतावर पाऊस होऊन पडण्याचा विचार आहे. तेवढीच एक आत्महत्या आपल्या हातून टळते का बघायच ?..........

खिडकीची चौकट मोकळी झाली. तुळस थकून झोपी गेली. मलाही डोळा लागला. सकाळी उठलो, लिहून काढल, खरच घडल हे सगळ!! नाही तर तुम्ही म्हणाल, चल, स्वप्न बघतोयस !!