मंगळवार 11 डिसेंबर 2018

लोकमान्य - एक स्मृतिचित्र

ती. रा. रा. बळवंतराव , उर्फ लोकमान्य टिळक ,

शिरसाष्टांग नमस्कार वि वि .

आज तुमची प्रकर्षाने आठवण झाली . शाळेत असताना तुमच्या पुण्य तिथीच्या निमित्ताने दर वर्षी होत असे . शाळेत आम्ही तुम्हाला घाबरायचो ते तुमचा झुबकेदार मिशांपेक्षाही बाई तुमच्यावर निबंध लिहायला लावणार म्हणून . मी पार्ल्याचा. त्यात पार्ले टिळक . शाळेच्या मुख्य दरवाज्यातच तुमचा पुतळा . पुढे सहा वर्ष तो आमच्या रक्तातच भिनला . स्वराज्य माझा......... , मी शेंगा खाल्या नाहीत हे तुमचे प्रसिद्ध डायलॉग , केसरी मराठातले अग्रलेख, त्यामुळे ब्रिटीश सरकारने घाबरणं , कौलेज मध्ये ब्रेक घेऊन शरीर कमावणं यामुळे तुम्ही आमचे हिरो झालात . राजेश खन्ना अमिताभ तेव्हा नट होते . आता उलटं आहे . शाहरुख , सलमान हिरो आहेत . राजकीय नेते नटाच्या भूमिका करतात .

तुम्ही पुण्याचे क्षत्रिय वृत्तीचे पित्त प्रकृतीचे ब्राह्मण , मंगळ प्रधान मिनराशीच्या पत्रिकेत पंचमहापुरुष योग, गजकेसरी योग, राजलक्ष्मी योग. केसरी मराठा सारखे दोन पेपर चालवून लेखणीने ब्रिटिशाना घायाळ केलंत . ओरायन, वेदांचे वसतीस्थान असे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिलेत . गणित, संस्कृत भौतिकशास्त्र, कायदा यांचा अभ्यास असताना पुण्यात डेक्कन फर्गसन गाजवलंत , चिपळूणकर आगरकराबरोबर शिक्षण संस्था सुरु केल्यात . कुठून एवढी अफाट एनर्जी आणलीत , बळवंतराव ?

खुदिराम बोसने कलकत्याच्या मॅजिस्ट्रेट वर हल्ला केला . पुण्यात चापेकर बंधूनी रँड चा वध केला त्या बद्दल तुम्हाला दोषी धरून सरकारने तुम्हाला मंडालेच्या तुरुंगात टाकलं. तुम्ही जस्टीस डावरला ठणकावून सांगतलेत कि मी निरदोष आहे "वरच्या " ( ईश्वरी) न्यायालयावर माझा विश्वास आहे . हे ठणकावून सांगणं फक्त तुम्हालाच जमतं . आमचा फक्त कान थंडीत ठणकतो.

मंडालेच्या तुरुंगात तुम्ही सहा वर्ष ३०० पुस्तक वाचून गीतारहस्य हि गीतेवर उत्तम टीका लिहिलीत. कर्मयोगाचा प्रसार ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून केलात. सरकारने हस्त लिखिताचे कागद परत करावयाला टाळाटाळ केली तर वयाच्या साठाव्या वर्षी तुम्ही म्हणालात, गीता रहस्य माझ्या डोक्यात आहे सिंहगडावर बसून मी पुन्हा लिहून काढीन .मराठी हिंदू बांधवानी एकत्र यावं म्हणून तुम्ही सुरु केलेल्या गणेशोत्सव आणि शिवजयंतीचं शंभर वर्षात काय झालंय हे सांगू नये हेच बरं .

शेंगा आणि टरफलांची कहाणी शंभर वर्ष अजून तशीच आहे . नेत्यांनी शेंगा खायची , सामान्य लोकांनी टरफलं उचलायची . त्यांनी बँका बुडवायच्या , आम्ही दहा हजाराच्या एफडी साठी बुडीत बँकेचे उंबरठे झिजवायचे . त्यांनी काळे पैसे दाबुन ठेवायचे, आम्ही नोटा बदलून घेण्याच्या रांगेत रात्र काढायची . त्यांनी सात बारावर आपले नातेवाईक चढवायचे, आम्ही सातशे बाराच्या पेन्शन साठी " मी जिवंत आहे " हे सिद्ध करायचं . शंभर वर्ष व्हायला आली बळवंतराव , मी टरफल उचलणार नाही असं ठणकावून सांगणारं आजही कोणी दिसत नाही . म्हणून आज तुमची आठवण आली नुसती पुण्यतिथी म्हणून नव्हे .

पुन्हा एकदा जन्म घ्या . यदा यदा हि धर्मस्य ......... जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी जन्म घेतो .... तुमच्याच गीता रहस्यांत श्रीकृष्ण म्हणतो ना ? मग ती वेळ आलीय बळवंतराव ! ती वेळ आलीय !!

तुमचाच ---

भूतकाळ विसरलेला , वर्तमान सांडलेला ,

कायम भविष्यात हरवलेला मराठी माणूस…………