मंगळवार 07 मे 2019

प्रिय कविता (मुलगी नव्हे पोएम !!)

आठवतं, बऱ्याच महिन्यांपूर्वी आपण दोघे मनाच्या स्विमिन्गपुल पाशी बसलो होतो. लिरिलच्या जाहिरातीतल्या मुलीसारखी तू लेमन फ्रेश दिसत होतीस. आत्ता येते म्हणून तू मनात डाईव्ह मारलीस. यमकांचे कॉकटेल्स, दिलखेच शब्दांचे वेफर्स घेऊन मी वाट बघत बसलो. दोन्ही तुला आवडतात मग तुला वेगळाच "रंग " चढतो....... पण तू वर आलीच नाहीस.!

असेच पुर्वी जुहूच्या वाळूत आपण बसलो होतो. तुझ्या केसांशी चाळा करणारी माझी बोटं. वाळूत वर्तुळ काढणारी तुझी बोटं. ऑफिस नावाचा छxx, कर्तव्य नावाचा चणेवाला आपल्याला येऊन डिस्टर्ब करायचे. ऑक्वर्ड करायचे. मी चिडायचो. तू फिदीफिदी हसायचीस. आत्ता पाण्यात पाय बुडवून येते म्हणून गेलीस

......... पण परत आलीच नाहीस .!

"मागच्या लेडीजच्या डब्याकडे ये" म्हणून मेसेज केलास. मी येऊन प्लॅटफॉर्मवर उभा राहिलो. तांदळाचं माप ओलांडून नवी नवरी घरात यावी तशी गाडी लाजत मुरडत प्लॅटफॉर्म मध्ये शिरली. तांदूळ पसरावे तश्या सगळ्या बायका सुद्धा प्लॅटफॉर्म वर घरंगळल्या . ........ पण तू मात्र आलीच नाहीस !

कुठूनसा वारा येऊन तुझा निरोप कानात कुजबुजला. नोकरीच्या झोपाळ्यावरून खाली उतर. प्रपंचाच्या बागेचं गेट ओलांडून बाहेर पड. डाव्या हाताला प्राजक्त आहे. त्याचे केशरी देठ ओंजळीत भरून घे. मी आलेच. आणि मी वेडा. चाललो तुझ्या मागे !! ए , पण येशील ना ??

प्रिय निशिता, माणसं सुद्धा अशीच असतात वेगवेगळ्या रंगाची, कोणी मनिषा असते, कोणी विजय, कोणीअनुजा, कोणी हिमांगी. ती एकत्र येतात तेव्हा अशीच छान नात्यांची रांगोळी बनते. देव सुद्धा आपल्या हाताने माणसांची रांगोळी काढत असतो. त्यालाही तुझ्या सारख कळतं, कुठले रंग एकत्र आले तर छान दिसतील. तसे तो त्याना एकत्र आणतो. पण एका रंगामुळे ती उठून दिसते, तो असतो सफेद रंग, आपुलकी चा, समजून घेण्याचा, स्पेस देण्याचा, सुख दुःख वाटून घेण्याचा. त्या रंगामुळेच रांगोळीचं सौंदर्य खुलतं. नात्यांची हि रांगोळी तीस तीस वर्ष सुद्धा टिकते. जसं आपल्या सर्वांच्या बाबतीत. देव अशी रांगोळी काढतो, अन् छान जमली की पहारा देत बसतो. शेजार्यांचं खट्याळ पोर (गैर समज) कधीही येईलआणि बिघडवेल म्हणून. या दिवाळी ला त्याचे खरे मनापासून आभार. (रांगोळीतला एखादा रंग बाहेर पडतो , तेव्हा त्यालाच हे जाणवू शकतं )