मंगळवार 11 डिसेंबर 2018

जातं - एक चमत्कार !!

प्रिय धवल , तुम्ही “हे” लिहून का  ठेवत नाही ? या तुझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून हे इथे लिहून ठेवतोय.

जीव शास्त्र म्हणतं कि प्रत्येक गव्हाच्या दाण्याला तीन भाग असतात . एक बाहेरचं आवरण ( bran ),  मधला गाभा ( स्टार्च) आणि खालच्या बाजूला खाचेत एक महत्वाचा भाग म्हणजे जर्म . या पासूनच व्हीट जर्म ऑइल बनतं . हे जर्म म्हणजे व्हिटामिन इ , बी व अँटिऑक्सिडंट्स यांचा मोठा साठा. औषधी , आरोग्यदायी तसेच अँटी कॅन्सर गुणधर्म या जर्म मध्ये असतात . तसेच ब्रान या बाहेरच्या आवरणात सुद्धा असतात. गव्हाच्या लोम्ब्या आणि तेल याना निसरगोपचारात खूप महत्व आहे . गव्हाचं ब्रान व जर्म हे टिकवून त्याचं पीठ जर चपाती, भाकरीकरता वापरलं तर त्याचे फायदे शेकडो पटीने वाढतात . मोड आलेली कडधान्य हे सुद्धा असच एक उदाहरण . जे गव्हात तेच ज्वारी, बाजरी तांदूळ या धान्यात . आपल्या पूर्वजाना हे पक्के ठाऊक होतं . म्हणून त्यांनी गहू कधी बाजारातल्या गिरणीत पाठवून  त्याचं चक्क पीठ करून टाकलं नाही . किंवा मॉल मधून चक्की फ्रेश आटा  या नावाखाली मैदा घरी आणला नाही . ( आणि आपण स्वतः:ला सुधारक फॉरवर्ड म्हणवतो) असो .

दोन दगडांच्या जात्यामध्ये हे गहू जर संथ गतीने अलगद रगडले तर त्यांचं औषधी व पोषण मूल्य टिकून राहील या कल्पनेतून जात्याचा जन्म झाला .ब्रान, जर्म आणि पीठ टिकवणं हे जात्याचं काम . स्त्रीच्या संसारात जात्याला अनन्य साधारण महत्व आहे . जातं म्हणजे ज्यात “जातं” आणि परत येत नाही ते जातं . या जात्यावर एक छान अध्यात्मिक रूपक आहे . प्रकृती  नावाच्या स्थिर दगडावर काळ नावाचा गोलाकार दगड सतत फिरतोय . त्यात तुम्हा आम्हा सारखे अनंत जीव गव्हाच्या दाण्यासारखे भरडले जाताहेत . ईश्वर ही स्त्री ,माया हा जात्याचा दांडा , हाती धरून हे करतेय . असं हे संसार चक्राचं रूपक .

आता आपण अध्यात्मातून प्रपंचात येऊ . घरची स्त्री नवीन आलेली सून किंवा जाऊ , नणंद , भावजय हिला सोबत घेऊन जात्यावर धान्य दळतेय . संथ लयीत कंटाळा येऊ नये म्हणून ओवी म्हणतेय . शब्दात ओवता येते , प्रपंचाचं गूढ सार सांगते ती ओवी . घर कसं चालवायचं याचे काव्यात्मक धडे देणारी ती ओवी .किती सुंदर आहे ना कल्पना ? या काव्यातूनच जन्म होतो एकाद्या जनाबाईचा, बहिणाबाईंचा .

“अरे संसार संसार जसा तवा  चुलावर, आधी हाताले चटके, तेव्हा मियते भाकर “, किंवा

“माझं सुख, माझं सुख, हंड्या झुंबरं टांगलं , माझं दुःख, माझं दुःख, तळघरात कोंडलं”

ओव्यामधून बाहेर पडते अशी फिलोसोफी !!

जातं आणि दळण्या च्या प्रक्रियेतून आपण आता शरीरशास्त्राकडे वळूया . आज तुम्ही जिम मध्ये जाऊन कोअर मसल ट्रैनिंग घेता. दळणं , मुसळीत मसाला कुटणं , विहिरीतून पाणी काढणं या कामातून घरच्या स्त्रीला आपोआप ते ट्रैनिंग मिळतं. कोअर मसल्स म्हणजे आपल्या शरीरातले हाडाच्या पिंजर्यावर असलेले आतले  स्नायू . हाता, पायावर, पोटावर, पाठीवर दिसतात ते बाहेरचे स्नायू . जिम मध्ये जाऊन वेटस घेऊन वाढतात ते बाहेरचे स्नायू . मग दंड मोठे दिसायला लागतात आणि स्लीव्ह लेस टॉप्स घालायला लाज वाटते. कष्ट करण्यासाठी, उत्तम ऍथलिट होण्यासाठी, काटक होण्यासाठी लागतात ते आतले स्नायू . फिटनेस एक्स्पर्टला विचारा .

घर कामांमुळे त्याकाळी अनेक बाळंतपण सिझेरियन शिवाय होत असत . सुदैवाने त्याकाळी पैसे देऊन शांताबाईला  घरचे काम देण्याची पद्धत नव्हती . मालकीण बाई सुद्धा सोफयावर बसून हाती ( टी व्ही चा आणि कुटुंबाचा ) रिमोट घेऊन ऑर्डरी ठोकीत नव्हत्या.

एक जातं, त्याचं दळणं , त्यात किती शास्त्र सामावलेली आहेत ? जीव शास्त्र , तत्वज्ञान , अध्यात्म , काव्य , शरीर शास्त्र , समुपदेशन . आहे कि नाही आश्चर्य? याला म्हणतात संस्कृती . जी आपण टिकवली नाही तर टाकली. आणि कारण काय तर म्हणे "वेळ नाही" !!!