बुधवार 05 डिसेंबर 2018

हौस आजी - एक शब्दचित्र

आमच्या कडे एक हौस आजी आहे . हौस आजीला सगळ्याचीच भारी हौस. सण, समारंभ, सोहळे, कपडे, दागिने शॉपिंग, आजी एका पायावर तयार .

( प्रत्यक्षात तीन पायांवर , दोन तिचे , एक काठी ) . आजी पाकशास्त्र निपुण आहे . पूर्वीच्या  ऋषींसारखी आजी फक्त आश्रमातच शिकवते . तिचा आश्रम म्हणजे स्वैपाकघर. ऋषी रानात शिष्याना वनस्पती शास्त्र शिकवत . आजी चुलीकडे प्रॅक्टिकल करून घेताना थेअरी शिकवते . आजीची  परिमाणं वेगळी आहेत . पेराएवढ आलं , गुंजेएवढा गूळ , डाळीएवढं हिंग , उगीच एवढी (??) चिंच वगैरे आजीची भाषा तुम्हाला यायला हवी . फूट पट्टी घेऊन एक इंच आलं मोजणारी , यु ट्यूब लावून वरण करणारी मुलगी आजीला मान्य नाही . लसूण ठेचून कशात , कापून कशात टाकायची ? मिरी , मिरची , तिखट यांचा वेगवेगळा तिखटपणा कशात नेमका "उतरतो "? फ्रिज मधले उरलेले पेढे खोबऱ्याच्या वडीला कसे काजूकतलीची  चव आणतात ? फराळ खुशखुशीत करायला स्पेशल आजी टच कसा द्यायचा ?. असे अनेक विषय आजी या खाद्य डिक्शनरीत कोंबून भरलेत.  थालीपीठ , लाडू, आमट्या यात आजीची स्वतंत्र पीएचडी आहे. असं समजा कि हौस आजी एक पाककलेचा नायगारा आहे आणि मी तुमच्या अंगावर फक्त काही तुषार उडवलेत. हि माणसं शेतातल्या नैसर्गिक झऱ्यासारखी असतात . ती असून सुद्धा आपण पाणी मात्र मुनिसिपालटीच्या नळाचं पितो म्हणजे त्यांच्या कडून काही शिकण्याऐवजी बिनडोक , बुद्धीला गंज आणणार्या सिरिअल्स बघण्यात रोज २ तास वाया घालवतो.

 आजी म्हणजे एक स्पन्ज सुद्धा आहे . आजूबाजूला जे जे घडेल ते ती शोषून घेत असते . “सूर नवा” मधली मुलांची गाणी, होम मिनिस्टर मधले आदेश भाऊजी , माझ्या नवर्याची… मधली राधिका यांनां  आजीच्या हृदयात स्पेशल जागा आहे . आजी कधीतरी गत आठवणींच्या वाऱ्याबरोबर पाचोळ्यासारखी साठ सत्तर वर्ष मागे उडत जाते. लहानपणीच्या कवड्या, सोंगट्या, मैत्रिणी, लग्नातले रुसवेफुगवे , सासरच्या कहाण्या सांगते . पुन्हा पाखरासारखी वर्तमानाच्या घरट्यात अलगद परत येते.  

आजीला शुद्ध शाकाहारी खाण्याची सुद्धा आवड आहे . त्यात पाणीपुरी विशेष . ती स्वतःच एक पाणी पुरी आहे . तिच्यात आंबट गोड़ आठवणींचं पाणी काठोकाठ भरले आहे . त्यात नात्याची खजूर चटणी आहे , कटू प्रसंगाची तिखट चटणी आहे , सगळ्यांच्या प्रेमाचा मूग रगडा आहे . आजी नावाची पाणीपुरी तुडुंब कृतार्थ आहे.

नातवंड म्हणजे आजीसाठी टकीला शॉट्स आहेत . ती आली कि आजी टुणकन उठून बसते. संध्याकाळ होते , आजीसाठी भांडणार्या नातवंडांना त्यांच्या आई वडलांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगत,  देवापुढल्या निरंजनाची वात  खाली सरकवत  आजीचा दिवस संपतो.

नुकतीच नदीच्या काठी एक होडी लागलीय . अनेक दिवसांच्या प्रवासानंतर घराकडे परतणाऱ्या आतुर प्रवाशांना घेऊन ती आलीय . काठावरच्या खुंट्याला होडीचा दोर बांधून नावाडी, प्रवासी सगळे उतरून गेलेत .रात्रीच्या चंद्र प्रकाशात संथ पाण्यावर ती रिकामी आत्ममग्न होडी आपल्याच नादात डुलतेय . रात्रीची शांतता फुफ्फुसात भरून घेतेय .लाटा तिच्या नातवंडांसारख्या तिला झोंबतायत. ती त्यांना थोपटून झोपवतेय. आसमंतात उरतात फक्त दोघंच, होडी आणि आकाशातल्या खिडकीतला शुभ्र चंद्र . त्याला बघून तिला रोज संध्याकाळी शुभ्र सफेद सदरा घालून खिडकीत बसलेले आजोबा आठवतात . समुद्र एक मोठा उसासा टाकतो , तो रात्रीच्या शांततेत घुमतो .

हि हौस आजी उर्फ पाणीपुरी उर्फ होडी म्हणजे माझी सासूबाई , दुसरी आई. तुमच्याही आयुष्यात असेल ना अशी एक हौस आजी ?