मंगळवार 07 मे 2019

सीता और गीता इन चर्चगेट फास्ट

सीता सकाळी ८:०५ ला विरारला लेडीजच्या डब्यात चढली. अग्निदिव्यच ते. चौथ्या सीटवर संकोचून बसली. पर्स मधून पुस्तक काढलं. वाचू लागली. क्षणात जग विसरली. सीता और गीता तुम्ही बघितलाय का ? त्यातल्या सीतेसारखी हि सालस, शांत, साडीत वावरणारी मुलगी. ठासून भरलेल्या गाडीत बोरिवलीला पुन्हा बायकांचा लोंढा घुसला. धाडकन उडी मारून गीता आत चढली. सीतेला बघून चक्क ओरडलीच. ए हाय सीता ना तू ? मला ठाऊक आहे तुझ्याबद्दल सगळं. मी गीता श्रीकृष्ण यादव. श्रीकृष्णा ने मला जन्म दिला. सीता शांतपणे म्हणाली. येना, बस , मी सीता श्रीराम अयोध्येकर. प्रभू रामचंद्रांची पत्नी. गीता चौथ्या सीटवर बसत म्हणाली बरं झालं बाई तू भेटलीस, आता वेळ छान जाईल माझा. ए तुझी हरकत नसेल तर आपण एक खेळ खेळूया का चर्च गेट येई पर्यंत ? मी माझ्या बद्दल एक सांगायचं मग तू तझ्या बद्दल सांगायचं. त्यातून आपण किती वेगळे आहोत हे कळल पाहिजे. चल, तू सुरवात कर. सीतेला पर्यायच नव्हता. ती हो म्हणाली आणि बोलू लागली.

माझे पती मर्यादा पुरुषोत्तम. जगाला त्यांनी चारित्र्य, मर्यादा शिकवली, लक्ष्मणरेखेला आमच्या आयुष्यात खूप महत्व. नेमकी तीच मी ओलांडली आणि रामायण घडलं. गीता यावर म्हणाली, श्रीकृष्णाच्या तोंडून मी बाहेर पडले म्हणून मी त्यांना पिता म्हणते, त्यांनी जगाला कर्म शिकवलं . शत्रूला युक्तीने हरवताना लक्ष्मण रेषा केव्हा ओलांडायची ते जगाला दाखवून दिलं म्हणूनच कौरवांचा पाडाव झाला. जे तुम्ही पाळलं ते आम्ही मोडलं याचं कारण जग बदललं होत. त्रेतायुगाचं द्वापर युग झालं होतं.

सीता म्हणाली शंभर वानरांच्या मदतीने यांनी एक त्रिलोकाच्या सम्राटाचा पराभव केला. गीता म्हणाली कृष्णाने एका नराच्या मदतीने हाती शस्त्र न घेता शंभर कौरवांचा विनाश केला.

सीता म्हणाली, अग, काय सांगू तुला, एका कांचन मृगाच्या मागे मी याना पाठवलं, म्हटलं चोळी बनवायची आहे. ते गेले आणि इथे एका चोळीपायी रामायण घडलं. गीता हसून म्हणाली, आमची कथा जरा वेगळी आहे, द्रौपदी च्या साडीपायी महाभारत घडलं.

सीता म्हणाली, आमचा शत्रू दूर देशी चा होता. गीता म्हणाली, बघ जग कसं बदललं, आमचा शत्रू घरातलाच होता.

सीता म्हणाली, चल मला दादरला उतरायचंय. गीता हिरमुसली अन शांतपणे बसून राहिली. इतक्यात एक सावळीशी हसरी मुलगी तिच्या जवळ येऊन बसली म्हणाली हाय गीता, मी शांती. सॉरी, मी तुमचं बोलणं ऐकत होते. माझी ओळख करून देते, मी शांती गौतम बुद्ध. श्रीकृष्णाच्या शेवटच्या दिवशीच द्वापार युग गेलं, कलियुग आलं. काळ बदलला, तुमचा शत्रू घरातला, तसा आमचा शत्रू शरीरातला म्हणजे मन. अस्थिर, चंचल मन. याच्यावर विजय मिळवण्यासाठी माझा जन्म झाला. मी म्हणजे मन:शांती असेन तरच कलियुगात पुढचा प्रवास शक्य आहे.

गीता म्हणाली, होय बाई अगदी खरंय, कानामागून आलीस आणि तिखट झालीस. सीतेचा काळ गेला, गीतेची वेळ गेली, शांती काही हाती लागत नाही अशी या मनुष्य प्राण्यांची अवस्था कलियुगात झालीय. गीताला थोपटत शांती म्हणाली, काळजी करू नकोस गीता, तुझं ज्ञान आणि माझं ध्यान जो एकत्र करेल तोच कलियुगात तरुन जाईल.

आता याच्या पुढचा प्रवास आपण एकत्र करायचा. गीता सुखावली. तिची काळजी मिटली. विचार करू लागली, शांती लहान दिसते खरी, पण उत्तर तिनेच शोधलं. पण मनुष्य प्राण्याला हे सांगायचं कोणी आणि कसं ?