गुरुवार 06 डिसेंबर 2018

सर्व पित्री अमावस्या

कॉम्प्युटरच्या दुकानात गेलो . म्हटलं स्लो झालाय , काय करावं लागेल ? तो म्हणाला साहेब फॉरमॅट करावा लागेल , सगळ्या फाइल्स डिलिट होतील .हव्या तर सेव करा. मी डिलीट केलेल्या फाइल्स पेन ड्राईव्ह मध्ये घेत होतो . जुने फोटो , कविता , लेख , रिपोर्ट्स बरंच काही सापडलं . जुन्या आठवणी जाग्या झाल्या . छान वाटलं . म्हटलं वर्षातून एकदा , डिलीट झालेल बरच काही , आठवणी, फोटो , नाती याना जागवलं पाहिजे . गेलेली माणसं सुध्धा . त्याच साठी असतो आजचा दिवस . सर्व पित्री अमावस्या . श्राद्ध हा शब्दच मुळी श्रद्धा यावरून आलाय . आजच्या धावपळीच्या जगात नुसती श्रद्धा ठेवली तरी पुरे . मुलांपर्यंत आजोबा आजींचे गुण , माया , हातची चव आजच्या दिवशी पोचवली तरी खूप झालं.त्यासाठी श्राद्धच घातलं पाहिजे असं नाही .

आज सगळ्या "गेलेल्यांची" आठवण येते. शिस्त आणि व्यवहार यात आदर्श असणारे, जगातला सर्वात बेष्ट डॉक्टर (?) आपला जावई झालाय असा ठाम विश्वास असणारे माझे सासरे, कायम मऊ हृदयाने मुलांवर प्रेम करणारे बाबा

( 'श्याम' ची आई आणि 'आम'.चे बाबा सारखेच !!), मीच जिच्यासाठी सर्व काही होतो अशी तरुण पणी विधवा झालेली आजी , काही नसताना नातवाचा महा भयंकर अभिमान असणारे , कौतुक ओसंडून वाहू देणारे आजोबांसारखे नानामामा , माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी , माझ्या सर्व आचरट जोक्स वर खदा खदा हसणारी, तरुण पणीच दैवाने ओढून नेलेली एक आत्या या सर्वांची आठवण येते. हि माणसं आपल्यावर इतकं प्रेम का करत होती याचं राहून राहून आश्चर्य वाटतं . मी आज फेसबुक, वॉट्सअप वर "लव्ह" शोधतोय पण "लाईक" मिळतंय. हल्ली कोणी कारणाशिवाय प्रेम करत नाही. त्यांच्या आठवणीने हल्ली डोळ्याला पाणी येत नाही पण हृदयात मात्र कालवतं . हि माणसं सुद्धा पेन ड्राईव्ह मध्ये सेव करून यमाला गंडवता आलं असतं तर किती छान झालं असतं .असो .

विहिरीतल्या कासवांसारख्या मधूनच वर येणाऱ्या त्यांच्या स्मृतींचा हा दिवस . अमावास्येलाच येतो ते बरंय . चंद्राशिवायच्या लुकलुकत्या चांदण्या मध्ये ती माणसं दिसतात . "काळ" नावाच्या काळ्याकुट्ट निष्ठुर आकाशाला सुद्धा सुंदर बनवतात. त्यांचे " नामो निशान " पुसू पाहणाऱ्या मृत्यूलाही टुक टुक करतात . आज काळ, मृत्यू, यम यांच्या पराभवाचा दिवस.त्यांचं प्रेम दिसावं म्हणून प्रेमाचं प्रतीक असलेला चंद्र आज लपून राहतो.अन होते अमावस्या . चला साजरी करूया !!