मंगळवार 07 मे 2019

माझ्या बायकोची मैत्रीण

माझ्या बायकोची एक मैत्रीण आहे. तिच्या इतकी त्रिभुवनात कोणी सुंदर नाही. अरे अरे थांबा माझ्यावर संशय नका घेऊ. अस व्यासांनीच तिचं वर्णन केलंय. तिचं नाव आहे सौ द्रौपदी  पांडव. तिचं संपूर्ण नाव सांगीतलं तर त्याची एक मालगाडी होईल कारण तिला पाच नवरे आहेत. एकदा आमच्या घरी ती आणि माझी बायको गप्पा मारत बसल्या होत्या. मी तोंडावर पांघरून घेऊन, झोपेचं सोंग घेऊन त्यांचं बोलणं चोरून ऐकत होतो. त्यांचं ऐकून मला बोधीवृक्षाखाली बसल्यासारखं ज्ञान प्राप्त झालं ते तुम्हाला ऐकवतो आहे.

बायको म्हणाली, कसं काय बाई जमवतेस तू ५ नवऱ्यांबरोबर ? आमचं एक खटलं सांभाळताना आमच्या नाकी नऊ येतात. द्रौपदी म्हणाली, बायको, खरं सांगू का ? व्यासांनी तुम्हा बायकांसाठीच या ५ व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत. खरं तर एकाच नवर्याची हि रूपं आहेत. कसं  ते सांगते. पहिला, युधिष्ठिर. धर्माने  वागणं हे पुरुषाचं पहिलं कर्तव्य. प्रामाणिकपणा, सचोटी, सत्य प्रियता हे गुण त्यांच्या अंगी हवेतच. म्हणून मोठा भाऊ धर्म. उगाच त्यासाठी कलियुगाची कारणं  देऊ नका. दुसरा अर्जुन, म्हणजे कौशल्य, विद्या. पुरुष त्याशिवाय अर्थार्जन करू शकत नाही, प्रपंच सांभाळू शकत नाही. तिसरा भीम, म्हणजे शक्ती, ऊर्जा तसंच सहनशक्ती, चिकाटी सुद्धा. संकटाना सामोरं जाण्यासाठी पुरुषांमध्ये हि हवीच. नुसत्याच बुद्धीचा उपयोग शून्य. नकुल म्हणजे साक्षात  सौंदर्याचा पुतळा होता. सहदेव थोर विद्वान,  ज्योतिषी होता. हे दोघे लहान भाऊ , कारण पुरुषाचं कर्तृत्व हेच त्याचं सौंदर्य आणि भविष्य तर  त्याच्या कर्मात असतं. दोघांचं महत्व गौण.

बायको म्हणाली, हे झालं पुरुषांचं. पण नवरे म्हणून त्यांचे पाच वेगवेगळे पैलू तुला बघायला मिळतात का ग ?

द्रौपदी म्हणाली, हो ना ! तुला माहितेय श्रीकृष्णाने रुक्मिणीचं वर्णन केल होतं. कार्येषु दासी, करणेषु मंत्री, शयनेषु रंभा, क्षमायेषु धरित्री, भोजेषु माता वगैरे. तसं  मला वाटतं प्रत्येक नवर्याची ५ अंगं असतात तश्या त्याच्या बायकोकडून अपेक्षा असतात. माझ्या ५ नवऱ्यामधून मला हे जाणवलं पण हे सगळं तुझ्या एका नवर्यात असेल. तो कधी धर्म असतो तर कधी अर्जुन, भीम किंवा नकुल सहदेव. सर्व त्याचीच रूपं. पहा बरं

धर्म बुध्दीवान याला कार्येषु दासी, करणेषु मंत्री अशी बायको हवी असते म्हणजे कामात मदत करणारी, कधी सल्ला देणारी, कधी शिष्या तर कधी निमूटपणे ऐकणारी बायको.

दुसरा अर्जुन, रसिक बलमा, याला हवी असते अनुप्रिया, प्रेयसी, प्रेमाचा वर्षाव करणारी बायको, शयनेषु रंभा. बायकोला डोळा मारत द्रौपदी म्हणाली मला माहितेय भावजी फुल टाईम अर्जुन असतात. मी पांघरुणाच्या आत इतका लाजलो कि विचारू नका.

तिसरा भीम शक्तिशाली, बलवान. याला हवी असते स्वामिनी, स्वामित्व गाजवून घेणारी, डॉमिनेट करून घेणारी, तरीही तक्रार न करणारी, क्षमयेषु धरित्री, भूमातेसारखी क्षमा करणारी, अपराध पोटात घालणारी.

चौथा, पाचवा नकुल सहदेव, याना हवी असते भोजेषु माता. मातेसारखं वात्सल्य दाखवणारी, उत्तम जेवण करून घालणारी, मायेने सांभाळणारी बायको.

जे मी पाच जणांसाठी करते तेच तू एकट्यासाठी करतेस. म्हणून तुझ काम माझ्या पेक्षा मोठं.

बायको म्हणाली होय बाई खरंय तू म्हणतेस ते. पण मला सांग, पाच नवरे असून तुझ्या पदराला हात घातला तेव्हा कोणीच आले नाहीत. तुला शेवटी श्रीकृष्णाचा धावा करावा लागला, असं का ?

द्रौपदी म्हणजे व्यासांची साक्षात प्रतिभा, ती माझ्या बायकोला थोडीच ऐकतेय ? ती म्हणाली हे बघ , नवरा एक असो व पाच. प्रत्येक स्त्रीचा एक श्रीकृष्ण असतो तो म्हणजे तिच्या मनाचा खंबीरपणा. तो कायम तिच्या जवळ हवा. तोच प्रथम धावून यायला हवा. मग नवरा. मी सुद्धा त्या दिवशी जर दुःशासनाच्या मांडीवर बसले असते आणि २० वर्षांनी मी - टू , मी - टू करत असते तर माझी किंमत झाली असती शून्य !! पण मी माझ्या खंबीर मनाला हाक मारली , तो आला. त्याने लाज वाचवली . तुम्ही नोकरी व्यवसायाकरिता बाहेर पडणाऱ्या बायकांनी विशेषतः  शाळा कॉलेज मधल्या  तरुण मुलींनी हे लक्षात ठेवायला हवं कि हे दुःशासन ( त्यात अनोळखीपेक्षा ओळखीचेच जास्त ) आपल्या आजूबाजूला अनेक रूपात जिभल्या चाटत वळवळत असतात. पण प्रत्येक स्त्रीने तिच्या स्वत्वाची परीक्षा घेणाऱ्या क्षणी आपल्या श्रीकृष्णाला म्हणजे मनाच्या खंबीरपणाला हाक मारली पाहिजे आणि ओरडून म्हटलं पाहिजे,

नो sssss !! नो म्हणजे नो ssss !!

ती इतक्या मोठ्याने ओरडली कि मी घाबरून तोंडावरचं पांघरूण काढलं, आणि उठून बसलो. मला पाहून ती ओशाळली. म्हणाली, अग बाई, उठले वाटतं भाऊजी, येते ग मी, पाच जणांना वाढायचं आहे अजून.

मी बायकोपासून माझा ऑकवर्ड झालेला चेहेरा लपवत होतो…….

इतक्यात ती उर्फ सौ. द्रौपदी पांडव, माझ्या बायकोची मैत्रीण, अंतर्धान पावली.