गुरुवार 06 डिसेंबर 2018

बाप्पा आणि मामा

ग. बाप्पा आणि उ . मामा यांची जोडी तुम्हाला ठाऊकच आहे . बाप्पा म्हणजे बुद्धी हे सुद्धा आपल्याला शिकवलंय. माणसाने आयुष्यात बुद्धी चा सदुपयोग केला तरच त्याचा उत्कर्ष ( रिद्धी म्हणजे वाढणे ) होऊ शकतो . तसेच त्याच्या स्वप्नांची पूर्ती होऊ शकते ( सिद्धी म्हणजे पूर्ण होणे ) म्हणून रिद्धी सिद्धी या बुद्धीच्या बायका .

हा गणेश सृष्टी मध्ये वातावरणात आहे , किरणांच्या समुहाच्या रूपात आहे . पण दिसत नाही. गण म्हणजे समूह ,ईश म्हणजे देव . शाळेत फिजिक्स शिकताना आपण हे किरण समूह व त्यांचे प्रकार ( सोलर रेडिएशन ) शिकलोय .प्रकाश म्हणजेच सूर्याकडून येणारे विद्युत चुंबकीय किरण. एक हजार प्रकारचे किरण समूह पृथ्वीवर पाठवतो म्हणून सूर्याला आपण सहस्त्र रश्मी म्हणतो . प्रकाशाचा उपयोग जीव जंतू वनस्पती माणूस सगळ्यांना होतो. बाकीचे अदृश्य किरण म्हणजे अल्ट्राव्हायोलेट इन्फ्रारेड रेडिओ वगैरे . त्यांचा उपयोग वातावरण , ढग , बाष्प याना संतुलित करण्यासाठी होतो . आहे कि नाही गणेश म्हणजे सृष्टीची बुद्धी ?

तर या सर्व गणांचा ईश म्हणून गणेश प्रथम , मग जीव उत्पत्ती वगैरे . हि किरणं पृथ्वीवर मातीत मिसळतात ( पार्वतीने अंगावरच्या मातीनेच गणेश तयार केला ना ) म्हणून मातीचा गणपती बनवून शुभ काळात त्याच्या संपर्कात माणसांनी जमावे आणि त्याचा परिणाम आपल्या सूक्ष्म देहावर करून घ्यावा आणि यथाकाल विसर्जित करून पुन्हा निर्गुण निराकाराकडे मन वळवावे असे परंपरा सांगते .

बाप्पा आणि मामा यांची जोडी कॅलेंडरवर दिसते तशी गाडी आणि ड्रायव्हरची नाही . बाप्पा म्हणजे बुद्धी तर मामा म्हणजे मन . दोघे एकत्र फिरतात . मन तुम्हाला एका क्षणात अमेरिकेला घेऊन जातं .देहाने तुम्ही जाऊ शकत नाही . बुद्धीला सुद्धा अशा भरार्या मारता येत नाहीत. बाप्पा आणि मामा म्हणजे कॉम्पुटर आणि माउस ची जोडी . माउस दोन्हीकडे सारखाच . कॉम्पुटर कडे असते बुद्धी , त्याचं मन म्हणजे माउस मुळे सर्फिंग शक्य होतं . मनावर ताबा मात्र कायम बुद्धीचाच हवा . नाहीतर माणूस भरकटतो . चंद्र हा तर प्रेम , आकर्षण , भावना यांचा कल्लोळ . म्हणून आज च्या दिवशी बुद्धीकडे बघा ,चंद्राकडे बघणं म्हणजे भावनेत वाहत जाणं . सिद्धिविनायकाच्या मंदिरात उंदराच्या कानात आपल्या इच्छा सांगायला माणसांची नुसती झुंबड उडते त्याचा अर्थ आपली ध्येय स्वप्न प्रथम मनात घोळवा. एकदा मनाने घेतलं कि बुद्धीच्या साहाय्याने ती सिद्ध होतील

मन खरंच उंदरासारखं असतं . मोकळ्या शेतात उंदीर बिळं करतो . जमीन भुसभुशीत करतो . शेतकऱ्याला मदत करतो . बंद कोठारात मात्र तो धान्य खाऊन टाकतो . नाश करतो . मन असच मोकळ्या वातावरणात चांगलं वागतं . बंदिस्त केलं कि विनाश घडवतं . मोठ्या शहरात काही लोकांची बंदिस्त,स्वार्थी , संकुचीत मन , त्यांचे जाती धर्माचे फुटीर विचार , पैशाचा गर्व हे सगळं बघितलं कि हे मनापासून पटतं , त्यापेक्षा रानातली , समुद्रकाठची किंवा पहाडी माणसं आणि मनं बघा . ते माणुसकी टिकवतात .

बाप्पा आणि मामा दर वर्षी हा संदेश द्यायला येतात पण बिच्चारे त्यांचा आवाज आपल्या पर्यंत पोहोचत नाही . आपल्याला ऐकू येतच नाही.
कारण ? आपल्या गल्लीत मोठ्याने चालू असतं , "आवाज वाढव डी जे , तुला आई sssss ची शपथ हाय !!!!!"

( संवाद मराठी , नावासकट शेयर करा )