बुधवार 05 डिसेंबर 2018

बदाम......

गरिबांचे चणे , मध्यम वर्गीयांचे  शेंगदाणे, श्रीमंतांचे काजू , अरबांचे पिस्ते पण सर्वांचे मात्र बदाम.
मुलांपासून वृद्धांपर्यंत आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर ठायी ठायी साथ करणारे बदाम
माणसाच्या आयुष्याला जणू चिकटलेलेच

बदाम .....

लहानपणी आईने मालिश करून अंगात जिरवलेले  तेल बदाम
शाळेत लाकडी बाकावर कंपासने कोरलेले नुकतेच वयात आलेले बदाम  

कॉलेज कॅन्टीनच्या भिंतीवर बाणात घुसलेले कोवळ्या वयातले घायाळ बदाम
लाल मातीच्या आखाड्यात मल्लांचं शरीर कमावून देणारे पाव शेर रोजचे बदाम
साजूक तुपाच्या सत्य नारायण प्रसादातले सोलीव पवित्र बदाम

व्हॅलेंटाईन डे ला मार्केट मध्ये लटकणारे लाल फुग्यांचे दुप्पट दाम बदाम
सिनेमातल्या मधुचंद्रात हिरोईन,  हातभर घुंगट आणि ग्लासभर दूध घेऊन उतावीळ हिरोला खिलवते ते बदाम
 
पत्त्यातली आवडती हुकूम , पुढे प्रत्येकाला आयुष्यात हवी असणारी राणी बदाम
लग्ना नंतर स्वतःच हुकूम बनणारी , सदा हुकूम सोडणारी बायको म्हणजेच पूर्वीची राणी बदाम

"खिशात नाही छदाम आणि खाऊ म्हणतो बदाम " अशी गरिबीची थट्टा उडवणारे बदाम
म्हातार पणी स्मरणशक्ती वाढवायला कामी येतात या लाडक्या मुलीच्या सांगण्यावरून
 रात्रभर भिजवलेले  ते  पाच बदाम

स्मरणशक्ती परत आल्यावर
तारुण्यातले नको ते दिवस आठवुन
डोळयासमोर पुन्हा पुन्हा येणारे ,
वहीच्या शेवटच्या पानावर काढलेले ,
वास्तवात न उतरलेले
मुकेच राहिलेले ....................बदाम