गुरुवार 06 डिसेंबर 2018

प्रिय बाबा

नर्स ज्याक्षणी साडे सात पौन्डाचा मांसाचा गोळा दुपट्यात गुन्डाळुन हातात देते त्याक्षणी पुरुषाचा बाप होतो. आईची वेदना संपते. बापाची संवेदना जन्म घेते. जबाबदारी नावाची सोन्याची बेड़ी तो दिमाखाने शेवटच्या श्वासापर्यन्त मिरवतो.

कुटुंब वृक्षाला आई नावाचं खोड, मुलं नावाची फळं, फुलं असतात. त्यांच्यासाठी तो मुळं होतो. प्रपंच्याच्या मातीत विरूद्ध दिशेला खोल खोल त्याचा प्रवास असतो. आपल्या फळा,फुलांच्या गालावर एक लालसर हसू फुलवण्यासाठी सन्कटान्ची ढेकळ फोडत पाणी, सत्व यांच्या शोधात तो जात असतो.

फुलांसारख्या मुली तो “वरचा माळी” दुसर्यांच्या परडीत ठेवतो. फळां सारखी मुलं करियर नोकरी च्या सूपरमार्केट मध्ये मांडून ठेवली जातात. आयुष्याच्या मातीत स्वता:ला गाडून घेणारी बाबा नावाची मुळं वरुन कोणालाही दिसत नाहीत. जे प्राक्तन तुमचं तेच माझं तेच सगळ्या बाबांच .

देवी सरस्वतीने कोकणी माणसाला विनोद्बुद्धीच पॅरश्यूट दिल्यामुळे जेव्हा जेव्हा नशिबाने तुमचा कडेलोट करू पाहिला तेव्हा तेव्हा तुम्ही हसत हसत अलगद खाली उतरलात, पुन्हा डोंगर चढायला.

अस म्हणतात की पुरुषाचं हृदय कठोर कणखर असावं. पण चहात बुडवलेल्या ग्लुकोज बिस्किटासारख तुमचं हृदय घेऊन तुम्ही आयुष्यभर यशस्वी बाबागिरी केलीत. दादागिरी न करता. !

जगात रिक्त हातानी यावं, मुक्तपणे आनंद उधळावा, तृप्त मनाने जावं हे तुमचं जगण्याच सूत्र. धर्म आणि कर्म यांच स्तोम न वाजवता हे मर्म तुम्ही शिकवून गेलात. तोच आमचा खरा वारसा.

तेरा दिवसान्पुर्वी तुम्ही आकाशातला एक लुकलुकता तारा झालात. आपल्या तिरकस कोकणी विनोदाने बाजूच्या

ता-याना तुम्ही हसवत होतात. असेच हसत राहा, हसवत रहा. पृथ्वी काय आकाश काय, स्वधर्म सोडू नका. त्यातच आमचा आनंद आणि यमाचा पराभव आहे.

तुमचा , जगासाठी पुत्र

पण मनापासून मित्र   ---   प्रताप