गुरुवार 06 डिसेंबर 2018

गोल्डन ज्युबिली….... एक प्रश्न !!

एका सिनेमाची गोल्डन ज्युबिली होते तेव्हा प्रोड्युसर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी देतो. डायरेक्टर नवीन प्रोजेक्ट साठी नवीन बकरा ( फिनान्सर ) शोधायला सुरुवात करतो . जे काही मनात होतं ते मिळालं आता सिनेमाचं काहीही होवो. पण माणसाच्या आयुष्याचं असच होतं का ?

 

माझी पन्नाशी झाली. मुलांनी सरप्राईझ पार्टी ठेवली. कोकणातून भाऊ अचानक सरप्राईझ म्हणून आला. सगळ्यांनी आठवण करून दिली की आजपासून तू पन्नास !!.

 

माझा एक तळीराम (टललीराम)  मित्र म्हणतो , आयुष्याच्या दोन क्वारटर् संपल्या , तिसरी  चालू , आता जपून.  नक्की "पाय" घसरणार.

कानामागचे वयाची चुगली करणारे केस म्हणतात , नको आता काळे करू , असेच राहू देत चंदेरी. ऑफिस मधली खट्याळ सेक्रेटरी म्हणते, अय्या पन्नास ? सर , वाटत नाही !!. मी मनाशीच हसतो. हळू हळू , ""पन्नास? वाटत नाही"" !! हा ट्रॅप  असल्याचं लक्षात येतं.  कारण स्टाफ रजेचा अर्ज आपल्याला सहीसाठी देताना  हमखास हाच डायलॉग मारतो. 

 

आयुष्य वेगळच फील होऊ लागतं. लाट ओसरून गेल्यावर पायाखालची वाळू सरकते तसं वाटतं . आजूबाजूला कोणाला हार्ट अटॅक आला तर बातमी बरेच दिवस डोक्यातून जात नाही. असं होत नव्हतं पूर्वी . ऑफिसमधून येताना तो मावळतीचा सूर्य आणि कालवलेलं आकाश बघवत नाही आता. गाडीच्या काचा वर ओढून घेतो. अचानक घरी लवकर यावं,  घरी कोणी नसावं , एखादं ड्रिंक घेऊन बेगम अख्तर ऐकत बसावं असं वाटतं . आईची विचारपूस मध्ये फोनवर होत असते पण आज बेसन लाडवावर दोन बेदाणे जास्त लावून आपल्याला देणार्या मावशीची आठवण येते . गोव्यात बिझिनेस कॉन्फरन्स ला गेलो तर मधेच वेळ काढून मंगेशाला जाऊन यावंसं वाटतं. हल्ली असं का होतं  ?

 

"बाबा, सहा वाजता सीसीडीत भेट" . मुलीचा मेसेज येतो. बापाला सीसीडीत? म्हणजे आज बॉम्ब टाकणार बहुतेक. पोटात गोळा येतो . घाबरत मी सीसीडीत, (कॅफे कॉफी डे) येतो. बाहेरूनच काचेतून बघतो , हिच्याबरोबर एक मुलगा ? वाटलंच होतं !! मघाशी पोटात गोळा होता, आता छातीत धस्स होतय !!

 

"हाय अंकल,  मी सनी ! " तो मुलगा  शेकहॅन्ड करतो . मी विचार करतो, सनी? मुंबईतलं युनिव्हर्सल सेक्युलर नाव ! जात , धर्म ,भाषा कशाचाच सुगावा लागणार नाही . मी माझा बोंबलासारखा  लिबलिबीत पडलेला हात पुढे करतो . त्यात जान  नसते. तो म्हणतो, कॅरीऑन , अंकल मी निघतो.

 

“बस ना ! कापुचिनो घेणार?”  मुलगी विचारते . मी आवंढा गिळतो , मनात म्हणतो , सांगून टाक बाई एकदा, कोण आहे तो चिनी का सनी ?

बाबा ऐक ( मुलगी दातानी बॉम्बची पिन काढते ) माझ्या कंठाशी प्राण !. मुलगी म्हणते , मी जॉब सोडतेय , माझं स्वत:च स्टार्टअप करतेय !!

हुश्शश !! माझं हुश्श्श इतक्या जोराने कसं बाहेर आलं ? , अक्ख सीसीडी वळून बघतं.

 

पन्नास वर्ष झाली म्हणून स्वामीजींकडे बरेच दिवसांनी गेलो . म्हटलं आता पुढे काय करू ? ते म्हणाले तेच करा पण "च " टाकून द्या . मिळालच पाहिजे , झालंच पाहिजे , ऐकलंच पाहिजे वगैरे . हा “च” हृदयाच्या रक्त वाहिन्यांत जाऊन बसतो आणि मग काढायला अँजिओ प्लास्टी करावी लागते . आणखी एक करा , आणखी हा शब्दच डिकशनरीतून खोडून टाका. "आणखी पाहिजे" हा एक गळ आहे, तो एकदा घशात अडकला कि लवकरच तुम्ही पाण्याबाहेर, माशाच्या टोपलीत जाणार.

 

आयुष्यात एखादा प्रश्न पडला कि जुहूच्या समुद्राला येऊन विचारण्याची मला सवय आहे . खात्रीने उत्तरं मिळतात . तसा आलो . म्हटलं त्याला विचारावं पन्नास झालो आता काय करू ? एक बाप आपल्या मुलांना पोहायला शिकवत होता ,सांगतहोता,  खोल समुद्रात असताना जोरात पोहायचं , श्वास रोखायचा , हात पाय मारायचे पण किनारा जवळ आला कि नुस्तं पडून तरंगत राहायचं, उगाच हात पाय नाही मारायचे , पाणी आपल्याला स्वत:च पुढे नेऊन किनार्याला लावतं. समुद्र त्यावर खिदळत होता , मला खिजवत होता , जणू म्हणत होता , ऐकलंस ?, हे तुझं उत्तर !!

मी म्हटलं, खरंय बाबा ,पण नेमकं तेच कठीण असतं.