गुरुवार 06 डिसेंबर 2018

प्रारब्ध आणि पुरुषार्थ

आज खुप दिवसांनी लिहायला बसलोय. तुम्हाला वाटलं असेल विहिरीतलं पाणी संपलं कि काय ? पण गम्मत अशी कि जितक पाणी उपसून विहिरीच्या बाहेर काढावं तितके आतले झरे उसळून वर येतात. बरं . आज एका कठीण विषयाला हात घालावासा वाटतोय . बघूया सोप्पं कारण जमतंय का .

संध्याकाळची वेळ आहे. मी एका मोठ्या बागेतल्या बाकावर बसलोय. सूर्य दिवसभराचा पसारा आवरून ७:०५ ची विरार फास्ट पकडण्याच्या लगबगीत आहे . समोर मोठ्या विस्तीर्ण पटांगणावर मुलं फुटबॉल खेळतायत. मला वाटतं तो फुटबॉल म्हणजे माझ आयुष्य आहे .लाल जर्सीवाले प्रारब्ध , ब्लू जर्सी वाले म्हणजे पुरुषार्थ . खरं म्हणजे , लाल जर्सीवाले प्रा. आणि ब्लू जर्सीवाले पु. हे मैदानात वेगवेगळे दिसत असले तरी एकाच गल्लीतले कर्म सवंगडी. आणि त्यांच्या पायातला फ़ुटबॉल म्हणजे आपण.

हल्लीच्या मराठीत सांगायचं तर प्रारब्ध म्हणजे लक , पुरुषार्थ म्हणजे हार्डवर्क . प्रा आणि पु हे शब्द वापरले कि मराठी माणूस दातात बडीशेप अडकल्यासारखी चुळबुळ करतो . बाबा किंवा महाराजांच्या तोंडीच हे शब्द शोभून दिसतात असं त्याचं ठाम मत आहे .असो.

माझ्या आयुष्याचा फुटबॉल एकदा प्रारब्धाच्या पायात तर एकदा पुरुषार्थाच्या असतो. दोघांचा खेळ होतो पण माझा जीव जातो. प्रा. उर्फ लक एकदा मला लाथाडत मैदानाच्या एका टोकाला घेऊन जातं . सुदैवाने हार्ड वर्क उर्फ पु. आडवा येतो त्याच्या पायातून मला काढून घेतो . दुसर्या टोकाला नेऊन गोल करतो . मी मनातून थरारतो . बापरे ! म्हणजे नशिबावर अवलंबून राहिलो असतो तर ? आयुष्यात भलतच घडलं असतं. कधीतरी कितीही पु केला म्हणजे हार्ड वर्क केलं तरी गोल होत नाही यश मिळतच नाही. आणि सहनशक्ती संपणार इतक्यात कुठून तरी नशीब धावत येतं. एक किक मारतं आणि हे sssss गोल !!!

 

प्रारब्ध म्हणजे नेमकं काय ? नशीब , दैव म्हणतात ते हेच का ? बघूया .

प्रा + रब्ध म्हणजे ज्याला आरंभ झालाय ते . माझंच पूर्वीचं जमा झालेलं संचित कर्म आज कर्माचं फळ बनून , नशीब बनून माझ्यासमोर उभं आहे आणि मला भोगायचंय ते प्रारब्ध . याचा अर्थ प्रारब्ध सुद्धा पूर्वीचं कर्म व त्याचा परिणाम , पुरुषार्थ हे आजचं कर्म . थोडक्यात सांगायचं तर पोकळ नशिबाला कर्म शास्त्रात आणि आपल्या धर्मात जागा नाही .

म्हणून गीता ५ व्या अध्यायात म्हणते ईश्वर कोणाचं कर्म घेत नाही कोणाला देत नाही . प्रत्येक जण आपल्या गुणांनुसार ( सत्व,रज , तम ) ते करत असतो. आणि पूर्व कर्मानुसार ते भोगत असतो . खुद्द भगवंतालाही राम, कृष्ण या अवतारात ते चुकलं नाही. तिथे आपली काय कथा?

 

प्रारब्ध तीन प्रकारचं असतं . इच्छा प्रारब्ध - सीतेने स्वत:च्या इच्छेने वनवास पत्करला , अनिच्छा प्रारब्ध - लक्ष्मणाने इच्छा नसताना रामासाठी वनवास पत्करला . परेच्छा प्रारब्ध - रामाने दुसर्याची इच्छा म्हणून वनवास पत्करला.

योग वशिष्ठात राम वशिष्ठ ऋषींना विचारतो आहे , प्रारब्ध आपल्या बाजूने कस वळवायचं ? ऋषी म्हणतात त्यासाठी फक्त ईश्वरी कृपा हवी . ती कशी होईल ? त्याला आवडेल असं वागायचं , त्याला आवडणार नाही ते टाकायचं .

गीतेत श्रीकृष्ण १८ व्या अध्यायात आपला उपदेश संपवताना सांगतो आहे . सर्व धर्मान् परित्यज्य , माम् एकं शरणं व्रज , अहं त्वांम सर्व पापेभ्यो मोक्षयामि . सर्व उपाय सोड , मला शरण , ये , कर्म कर , मी तुझी सर्व पापातून , भोगातून मुक्तता करिन .

 

आता पुरुषार्थ. कालचा पुरुषार्थ हे बीज आहे तर आजचं प्रारब्ध हे त्याचाच फोफावलेला वृक्ष. उपनिषदात एक छान रूपक आहे. पुरुषार्थ हा आंधळा आहे.एकटाच पुढे जातो पण दिसत नाही. दिशा नाही. प्रारब्ध हे लंगडं असतं त्याला दिसतं पण एकट्याने पुढे जाता येत नाही म्हणून आंधळ्याच्या पाठीवर लंगडा बसला कि दोघेही मार्ग काढू शकतात . नशीब हे प्रयत्नांच्या खांद्यावरच बसलेलं आहे फक्त आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही . मानस शास्त्र म्हणतं फॅक्टर्स इन कंट्रोल म्हणजे आपण जे बदलू शकतो ते , म्हणजे पुरुषार्थ . फॅक्टर्स आऊट ऑफ कंट्रोल म्हणजे आपण जे बदलू शकत नाही ते , म्हणजे प्रारब्ध.पुरुषार्थासाठी प्रयत्न करा , प्रारब्धासाठी प्रार्थना करा.

मैदानात प्रा आणि पु प्रतिस्पर्धी दिसले, फुटबॉल सारखे आपल्याला खेळवत असले तरी मानवी आयुष्यात हे एकत्र येऊ शकतात. प्रयत्न आणि दैव एकत्र आले तर दैदीप्यमान यश मिळू शकतं. असा उपनिषदांचा दावा आहे.

मानवी जीवनाच्या यशाचं हेच खरं रहस्य आहे.