गुरुवार 06 डिसेंबर 2018

मना सज्जना

काय सांगू बाबा, आमचा मालक ढेकणे पाटील म्हन्तोय, मन धुवून वाळत घiलाया पायजे. कुठल्या तरी आश्रमात गेलता प्रवचन ऐकायला. येऊन माज्यामागे लागलाय. देवघरात , देवळात असतच की मन धुवायच वॉशिंग मशीन. रोज भक्तीचा साबण लावून, पूजा गीजा करून, तोंडावर दोन थपडा मारुन म्हन्तो, देवा पुन्यन्दा दुधात पानी नाही , वजनात मारनार नाही, आनि पूना तेच.

बंगलोरला लौन्ड्री हायेत म्हने, स्पिरिचुयल लौन्डी, मनावरचे पक्के डाग घालवुन देत्यात म्हन. १०० टक्के. आश्रम म्हनत्यात त्याला. म्हंजी कसं ? दाढीवाले बाबा तिथे अमेरिकेत असत्यात. तिथून हितं लॉंड्री चालवत्यात. मी म्हन्ल, खुळा का काय लेका? ते सान्गतय आणि हे ऐकतय. आश्रमात सात दिवस -हावा,बोलन बंद, नॉनवेज बंद,ते हिकडच तिकडचं बंद. ईकडुन श्वास घ्या तीकडून सोडा. दोन पायाच्या मधून हात काढा. आस करून मी सुद्ध होनार काय? आन् याला जमनार काय ? भायेर आला की डब्बल करनार ह्ये.

ते तुकारामबुवा सुद्धा थकल माजा फुड. म्हणाल, नाही निर्मळ मन, तेथे काय करील साबण?

तुमच रामदास स्वामी लई भारी होतं राव. पायल्यंदाच भेटल तवा म्हनाल. मना , सज्जना…. !! तुम्ही न्हाई का मंत्र्याच्या डायवरला म्हन्ता, सायेब ......! तसं. माज्या सारख्या पोचलेल्या दुर्जन माणसाला गुळ लावून कस लायनी वर आणायाच त्यानाच ठावुक. मी काय म्हणतो, लेका, मी घोडा हाय. तू हायेस माजी गाडी. मी भले उधळलो, तरी लगाम हायेच की तुज्या हाती. तूच मला चिखलात घालतोस, लगाम ढिला सोडतोस. टांगा पल्टी घोडं फरार झालं की म्हणतोस, घोडं धुवा....कस व्हायचं ?

गावकड म्हनत्यात न्हव्. मन म्हंजी नदीच पाणी. वरच्या अंगाला प्यायचं, आन खालच्या अंगाला धुवायाचं. हे बेनं करतय उलटं.

आन् माज्या मागे लागलय हात धुवून. आता तुमीच सांगा याला , स्पिरिचुयल लौन्ड्रीत खिसा पार धुवून जाईल तुजा. मला धुनारा " बाप" यायचाय अजुन म्हनाव !