शुक्रवार 07 डिसेंबर 2018

एक जुनी फँटसी-पुण्यनगरीत सरदारमेळावा (शाळेतल्या मित्रमैत्रिणींचं गेट टुगेदर) !!

श्रीमंत बिलुराजे बिवलकर, पुणे संस्थान यांस

(एकेकाळचे) श्रीमंत प्रताप राजे यांचे अनेक उत्तम आशिर्वाद,

तुमचा मेसेज पाहून मनी संतोष जाहला. तुम्ही म्हणजे साक्षात आमच्या ज्वानीचा फोटो आल्बम आहात. गुरुकुल आणि आश्रमातल्या अनेक आठवणी (नको नको त्या) श्रावण मेघांप्रमाणे मनात दाटल्या. सांप्रत काळी पुन्हा उत्तरेकडे यवनभुमी कडे कूच करण्यापूर्वी तुम्हा पुण्यनगरीतील सरदारांस भेटुन घ्यावे ही श्रींची इच्छा दिसते. त्या बाहेर आम्ही नाही. पुणे, नगर, हवेली तालुक्यातील सर्व सरदार व सरदारणीस (आपल्या बॅचच्या) एखाद्या इष्ट वारी बोलावून घ्यावे. आम्ही बहिर्जी (शरद अभ्यंकर) व नेताजी (सुहास जोशी) यांच्याशी मसलत केली आहे. खरे सांगू बिलू राजे? काही कामगिरी सोपवायची म्हणजे आम्हाला आमच्याच सरदारांचं टेन्शन येतं . खानाचं सुद्धा एवढ टेन्शन येत नाही.

आम्ही ओल्ड पूना रोडने येऊ. एक्सप्रेसवेवर टोलनाक्याजवळ गनिम उभा ठाकला आहे. (अशी बहिर्जी शरद यांची बातमी आहे). हल्ली बहिर्जीचा बराचसा वेळ खानाला गन्डवण्यात जातो. स्वराज्याची हेरगिरी राहते बाजूला. असो.

आम्ही येताना मुंबई ठाण्याहून मिळतील तेवढे सरदार ,शिलेदार (बॅचमेट्स ) आणूच. आमच्या सैन्यातील महिला आघाडीशी बोलताना जरा अंमळ अदबीने घ्या. त्या आता शाळेतल्या दोन वेण्यान्च्या परकरी मुली राहिल्या नाहीत. लै तिखट झाल्यात. अंगाने भोपळी मिरची झाल्या तरी जबान लवंगी मिरची आहे. आम्हास अनुभव आहे.

योग्य वेळ व स्थळ खलिता धाडून कळवत आहे. इथे चर्चा नको. खानाचा फेसबुकवर अकाउंट आहे

( बहिर्जीची बातमी). सर्वांचे म्हणणे, सिंहगडावरच्या तानाजी समाधी जवळ भेटावे. हे इतिहासप्रेम नाही. तिकडचे भजी आणि दही चापायचे आहे सर्वाना. हल्ली राहिलेत कुठे महाराजांच्या वेळचे सरदार? म्हणून आम्हाला यांच्यासोबतच स्वराज्य घडवाव लागतय. काय करणार?

राणी सरकार " आमी पन येनार, आमी पन येनार " म्हणून मागे लागल्या आहेत. त्याना आणाव का? तुम्ही पण आपला कुटुंब कबिला आणणार का? प्रोग्राम काय असणार ते सांकेतिक भाषेत लिहून खलिता धाडावा. मेसेज करू नये . राणी सरकार रात्री आमचा मोबाइल बघतात असा आम्हाला संशय आहे

हल्लीचे दूत मुंबईहून पाठवले कि वाशी येईपर्यंत आमचा गुप्त खलिता उघडून वाचतात व खानाला एसएमएस करतात असा बहिर्जीना संशय आहे. बहिर्जींनी आमच्या डोक्याच दही करून टाकलय. याना नस्त्या कल्पना सुचतात आणि आमच्या झोपेच मात्र खोबर होतं !!!

पुण्यास आम्ही संध्याकाळी येऊ. दशभुजा गणपती मार्गे प्रवेश करू. त्याच वेळी कात्रजच्या घाटात अंधारात मशाली धावताना दिसतील. समजा आमचे इमानी बैल आहेत ते. तुमच्यासारखेच. (म्हणजे तुमच्यासारखे इमानी. बैल नव्हेत.)

आणि एक लक्षात ठेवा, पुण्यास पोहोचल्यावर पहिल्या मेण्यातुन आमचा “तोतया” उतरेल. मग आम्ही उतरू. तुम्ही मागच्या वेळी त्यालाच घेऊन गेलात आणि जेवण संपलं. पंचाईत झाली. मी आणि नेताजी वडापाव खाउन राहिलो. पुण्यातल्या वडेवाल्याजोशीना आम्ही खुश होऊन तात्काळ चार गावांची बलुतेदारी दिली.

असो. तुम्ही प्रद्न्यावन्त आहातच. श्रींच्या कृपेने पुण्यनगरीत सरदारमेळावा (शाळेतल्या मित्रमैत्रिणींचं गेट टुगेदर) यथायोग्य घडवून आणाल अशी श्री चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र!!

मुद्रांकित

(एके काळचे) श्रीमंत प्रताप राजे , पार्ले संस्थान