शुक्रवार 07 डिसेंबर 2018

जांभूळ गुपित

अनेक वर्षांपूर्वी रवींद्र नाट्य मंदिरला जांभूळ आख्यान हे शाहीर विठ्ठल उमप यांचं लोकनाट्य पाहिलं. लोक महाभारतात एक कथा आहे. द्रौपदीला करणा विषयी  सुप्त आकर्षण , प्रेम वाटत होतं. कृष्णाला  ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा त्याने एक युक्ती केली. त्याची हि कथा. शाहीर डोक्याभोवती एक ओढणी गुंडाळून द्रौपदीचा अभिनय इतका सुंदर करायचे. त्यात एक वाक्य होतं. " अन कृष्णाला पाहून द्रौपदी चं मन पाकुळलं. " म्हणजे अति पिकलेलं फळ जसं आपसूक गळून जातं तसं. हे वाक्य म्हणताना त्यांचे डोळे , हावभाव हुबेहूब लावण्य वती द्रौपदी उभी करत. असं वाटे कि एखाद्या पाषाणात अप्सरेची मूर्ती कोरलीय.
तर ही गोष्ट आहे जांभळाची. कृष्ण पांडव द्रौपदी सह एका वनात सहलीला गेला होता. द्रौपदीने  तिथे एका झाडाचं टपोरं जांभूळ तोडलं. आणि ते झाड बोलू लागलं. द्रौपदी काय केलस हे ? इथे एक ऋषी १२ वर्ष उपाशी पोटी तपश्चर्येला बसलाय त्याने खाण्यासाठी हे जांभूळ राखून ठेवलय. आता तो तुला शाप देणार. पुन्हा जांभूळ झाडाला चिकटवलंस तरच तुझी सुटका आहे. द्रौपदी घाबरली , सर्वाना विनवू लागली पण कोणालाच ते करता येईना. श्रीकृष्ण म्हणाला द्रौपदी , तूच पतिव्रता आहेस. आपल्या ५ पतीशिवाय कोणाचाच विचार तुझ्या मनात येत नसेल,हो ना ? मग तूच हे काम करू शकतेस. हे ऐकून द्रौपदी रडू लागली , आपल्या मनातली सुप्त प्रीती तिने व्यक्त केली. ती म्हणाली , मी माझी चूक कबुल करते , पण आज कर्ण माझा पती असता तर माझ्यावर ही विटंबनेची वेळच आली नसती.पण हा अशुभ विचार मी केला, हे मानसिक पाप मी मान्य करते. तिने चूक कबुल केली आणि ती शुद्ध झाली. जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिकटलं आणि कृष्ण गालातल्या गालात हसू लागला .
अशी ही व्यासांची प्रतिभा. १२ वर्षांच्या वनवासात अर्जुन भीम युधिष्ठिर सगळे बदलले , शिकले पण द्रौपदी मात्र त्या दिवशी बदलली. जांभूळ वृक्ष हा आदिवासींचा कल्प वृक्ष, जसा आपला नारळ. वृक्ष बहरला कि आदिवासी सगळ्यांना ढोल वाजवून तिथे बोलावतात आणि समूहाने फळांचा आस्वाद घेतात. म्हणून ते गाणं , जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी? आदिवासी असे गरीब असले तरी मनाने श्रीमंत असतात. विचार करा तिथे श्रीमंत असते तर ? एकट्यानेच ओरबाडून नेलं असतं , असो . जांभूळ बियांचं चूर्ण मात्र श्रीमंतांच्या मधुमेहावर गुणकारी.
जांभूळ हे एक रूपक आहे. माणसाच्या गुपितांचं. मानवी आयुष्यात अनेकदा अशुभ कर्म घडतात मग ते गुपित आपण हृदयात दडवून ठेवतो. पण जांभूळ गुपचूप खाल्ल तरी जीभ मात्र जांभळी  होते. कधीतरी ते बाहेर येतं असा त्याचा अर्थ. देवापुढे , श्रीकृष्णा पुढे मात्र आपण जांभूळ खाल्ल्याचं कबुल करावं. असं या लोक महाभारतातल्या जांभूळ कथेचं सार. दाखवा बघू  जीभ !!