बुधवार 10 एप्रिल 2019

पापलेट , बांगडे आणि आठवणी

आजचं पुराण विष्णूच्या तिसऱ्या अवतारावर . मला आठवतंय , पापलेट माझ्या आयुष्यात लेट आलं , काय पाप केलं म्हणून लेट आलं असावं . परवडत नव्हतं म्हणून  असेल बहुतेक . आम्ही कणकवली वेंगुर्ले मालवण पट्ट्यातले सारस्वत खरे मत्स्यप्रेमी त्यात बांगडा प्रेमी . लहानपणी बाबांबरोबर फिश मार्केटला शंभर प्रकारचे मासे घेऊन बसलेल्या द्रुपदा कोळणीला बाबा थट्टेने म्हणायचे , बाई द्रौपदी , तुझे शंभर कौरव बाजूला ठेव आणि पाच पांडव तेवढे टाक पिशवीत. म्हणजे काय तर १५ रुपयांचे  ५ बांगडे. आमच्यासाठी कल्पवृक्ष , कामधेनू , चिंतामणी हि समुद्र मंथनातली रत्न एका बाजूला आणि बांगडे एका बाजूला . बांगडे सगळ्या इच्छा पुरवतात . बांगड्याचं तिखलं , धबधबीत, करंजावलेलं, सोलाचं ,तिरफळाचं , भरला बांगडा , किती प्रकार !! ज्याच्या वासानेच  माहेरवाशिणी , गरोदर बायका खवळून उठतात. खवळणं म्हणजे कडकडून भूक लागणं .
आगीवर भाजलेल्या सुक्या बांगड्याचं लालसर मास काढून त्यात खोबरेल तेल , कांदा, हळद, ओलं खोबरं घालून कोशिंबीर करा आणि तांदळाच्या भाकरी बरोबर कोकणी माणसाला खायला द्या . आपली रेल्वेजवळची शेत जमीन तो तुम्हाला नक्की अर्ध्या किमतीत विकेल ( परप्रांतीयांनी हाच फॉर्मुला वापरला कि काय )
बांगड्याची अजून एक सुरस आठवण आहे . आम्ही शाळेत असताना इंडिया इंग्लंड फायनल क्रिकेट मॅच लॉर्ड्सला होती . आपला दिलीप वेंगसरकर लंडन मध्ये कुठेतरी बांगडा खाऊन आला आणि आजारी पडला असं म्हणतात .आपण मॅच हरलो . इंडियाला आणि वेंगसरकरला लोकांनी माफ केलं पण आमच्या बांगड्याना नाही . पुढे एक वर्ष भर माझे शाकाहारी मित्र मला "तुमच्या बांगड्यांमुळे इंडिया हरली " असं ऐकवत होते .
लहानपणी बागडे घरी येणं  हा एक फार मोठा सोहळा असायचा. सांगतो ऐका .
साधारणपणे सकाळी १०/ साडे १० च्या सुमाराला वर्सोव्याची सुशी कोळीण आमच्या सोसायटीत शिरायची . गळाभर सोन्याचे दागिने आणि डोक्यावर सोन्यासारखी मोठी पापलेटं  घेऊन ती सोसायटीतल्या कस्टम ऑफिसर , सेल्सटॅक्स ऑफिसर , बँक मॅनेजर यांच्याकडे जायची. आमच्याकडे दुर्लक्ष करायची कारण आम्ही फार तर कावळी खाणारे . कावळी म्हणजे छोटी पापलेटं . आम्ही आपले भाईंदरहून मध्यमवर्गीय मासे घेऊन येणाऱ्या भय्याची वाट बघायचो .
अकरा वाजेपर्यंत तो पठ्ठया यायचाच नाही . मी आणि आजी कासावीस .वाटण तर तयार आहे पुढे काय .
कंटाळून आजी पूजेला , जपाला बसायची. एक माळ ओढली नाही कि हा किचनच्या खिडकीकडे हजर . आजीच्या हातात जपमाळ , एक डोळा प्रपंचाकडे , एक डोळा परमार्थाकडे , तोंडाने मौन .
मग मी दोघांमध्ये मध्यस्थाचं काम करत असे . आजी हाताने खुणा करायची मी बोली लावायचो . भय्या २० रुपयाला ५ म्हणायचा , आजी दहापासून सुरु करायची .
खिडकीच्या चौकटीवर एव्हाना कावळे काव काव करून आमचा व्यवहार गावभर करायचे. त्यांचे मित्र वरून घिरट्या घालायचे . झालं कि कळव रे .
आमचा बोका डोळे मिटून पंजे चाटत दुपारच्या मेजवानीच दिवास्वप्न बघायचा . इथे माझा जीव वर खाली , आज भय्या परत जातो कि काय ? शेवटी एकदा १५ रुपयांवर हे मत्स्य नाट्य संपायचं . कापलेले थडथडीत ( होय फक्त हेच विशेषण बांगड्याला सारस्वत लावतात ) बांगडे खिडकीतून आत यायचे . कावळे , बोका , मी , आजी , भय्या सगळे खुश . यालाच स्टीफन कोवे , मॅनेजमेंट च्या भाषेत विन विन सिच्युएशन म्हणतो. आज घरी रामराज्य . त्याकाळी परमानंदाची व्याख्या इतकी सोप्पी होती .
अजून एक आठवण , एकदा बहिणीकडे खूप दिवसांनी जेवायला गेलो होतो . तिची मुलं दारात मी दिसताच , मामा आला मामा आला म्हणून नाचू लागली , आनंदाने बागडू लागली . मला गहिवरून आलं , वाईटही वाटलं , कधी चॉकलेट नाही आणलं या पोरांसाठी . कुठे ते भागवतातले कंस मामा , महाभारतातले शकुनी मामा आणि कुठे मी ? प्रेमळ मामा ? इतक्यात बहिणीने रहस्य उलगडलं . माझं गहिवरणं तिथेच थिजून  गेलं. ती म्हणाली , काही नाहीं रे , डाम्बिस आहेत ती , त्यांना माहितेय , आज मामा येणार म्हणजे आई खापरी पापलेट आणणार . पक्की मासेखाऊ आहेत .
मी मेहुण्याबरोबर माटुंगा मार्केट मध्ये प्रथमच शिरत होतो . आमच्या वेळी कॉलेजमध्ये ४ मित्रांच्या २ दिवसांच्या खाऊन पिऊन लोणावळा ट्रीपला जेवढा खर्च येत होता तितक्या पैशात दोन मोठी पापलेटं आली . माझ्या हाती एक व्हिजिटिंग कार्ड ठेवत शकुंतला - फिश मर्चंट (होय कार्डवर तसच लिहिलं होतं ) म्हणाली
दादा , पुढच्या वेळी आधी फोन करून या , अशी ऐनवेळी मिळत नाहीत. रोज येणाऱ्या मेव्हण्याकडे बघून गूढ हसली ( कुठून आणलं हे पाव्हणं )
आज आठवणी , टोपली खाली झाकलेल्या चिंबोर्यांसारख्या बाहेर पडून धावतायत.
मागे एका सारस्वत मित्राला घरी बोलावून बांगडा , पापलेट सकट अक्ख मत्स्यालय खायला घालण्याचा बेत केला होता . बायकोसह घरी आल्यावर त्याने अचानक जाहीर केलं . अरे तुला सांगायचं राहिलं . हि शुद्ध शाकाहारी आहे बरं  का, पण कांदा चालतो . बायको अस्सल पुण्याची , ती कसली ऐकतेय ? ती ठसक्यात म्हणाली , मी शुद्ध शाकाहारी आणि हा बेशुद्ध शाकाहारी , मी व्हेज जेवण केलं कि चक्कर येऊन  पडतो मग कांदा लावावा लागतो , म्हणून मला चालतो .
पुणेरी , फटाकडी , शुध्द शाकाहारी बायको सारस्वताच्या घरात ? प्रेम आंधळं असतं कि प्रेमात डोळे फुटतात ? मी मित्राला बाजूला घेऊन म्हटलं ,
कशाला रे देवाला मागच्या जन्मी नडलास ? भोग आता कर्माची फळं . सु सु करत , डोळ्यातलं पाणी लपवत तो म्हणाला , बांगड्याचं तिखलं जरा तिखट झालंय रे . त्याच्या घरी "बांगड्या" आल्या तेव्हा पासून तो मोकळेपणी रडला नव्हता , आज माझ्या घरी "बांगड्या"ने रडवलं .