शुक्रवार 07 डिसेंबर 2018

होली है ! ........

आज सकाळीच दारावर टक टक  झाली . बघतो तर काय ? देव, आपले थाळी भर रंग घेऊ उभा . अजिंक्य देव ,रमेश देव नव्हे ,साक्षात देव, देवळातला .
तो म्हणाला चल बाहेर ये , रंग लावायला आलोय. आणि तो "होळीसाठी खास"  जुना  टी  शर्ट घालून येऊ नको . साक्षात देव आलाय. चांगल्या कपड्यात ये. मी छान झब्बा  घालून आलो . तो ओरडला ……………होली  है  .......
पहिलाच रंग त्याने फासला निळा . तो म्हणाला हा रंग आकाशाचा . त्याच्यासारखं सर्वावर मायेचं पांघरूण घाल पण तटस्थ रहा. कधीतरी धुकं बनून त्यांच्यात आलास तरी धुक्या सारखं  पटकन विरून जा.
होली  है ........
दुसरा रंग निसर्गाचा . वेडा . नुसता देतच सुटलाय . घेण्याचं नावाचं नाही . माणसाने त्याच्या लाकडाची कुर्हाड करून त्याच्यावरचचालवली तरीही देतो आहे . माणूस हाताने  फुलं चुरगाळतोय तरीही ती सुगंध देतायत. माणूस आग लावून मधाचं पोळं काढतोय तरी मध माशा गोळा  करतायत . तसाच देत राहा देत राहा .
होली  है  ........
तिसरा रंग लाल तेजाचा . ज्ञानाचा . ज्ञानॆवं तू कैवल्यम . ज्ञान म्हणजेच मी . अथांग पसरलेला . द्याल तितका अनेक पटीने वाढणारा . ज्ञान म्हणजे ज्योत , आयुष्य म्हणजे तेल ,माणूस म्हणजे पणती . तेल संपेपर्यंत ज्योत पेटती राहू दे
  होली है ....... …………
  हा रंग केसरीया ,त्यागाचा. गीतेच्या अठराव्या अध्यायाचा . देशासाठी, समाजासाठी, निसर्गासाठी ,आई, वडील, बायको, मुले, विद्यार्थी, यांच्यासाठी  त्याग करणाऱ्या सर्वांचा. कुठलाही त्याग मोठा नाही कुठला लहान नाही ,सर्व सारखे ,श्वासा सारखे …..
होली है ..........
  हा गुलाबी रंग , निष्पाप मुलांच्या गालाचा , त्यांच्या हसण्याचा . सुख दुःखात कायम चेहर्यावर राहू दे .ते सर्वात मोठं पेन  किलर आहे. जेव्हा दैव, नशीब  सोबत  नसत तेव्हा हसू असतं . ते तुमच्या बाजूने त्यांच्याशी लढतं . ...
  होली  है..........................
आणि हा रंग चंदेरी .मी ओरडलो , हा नाही लावायचा ,हा ऑइल पेंट असतो , बरेच दिवस जात नाही , मागच्या वर्षी मी खोबरेल तेल लावून काढला .
तो म्हणाला अरे वेड्या हाच तर पक्का रंग आहे , आशेचा . मी म्हटलं चंदेरी ? आशा ? काय बोलतोयस
तो म्हणाला ,तुम्हीच म्हणता ना ?एव्हरी क्लाऊड हॅज सिल्वर लायनिंग !! त्याने शेवटी तोच रंग माझ्या तोंडाला जास्त फासला आणि ओरडत निघून गेला
  .....  होली  है………