सोमवार 10 डिसेंबर 2018

कारल्याची भाजी

वीणाताईंचा स्वभाव जरा तिखटच. फटकन बोलायचं आणि समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात टचकन पाणी आणायचं . कांद्यासारखं . त्यात परगावाहून बदली होऊन ऑफिसात साहेब आले. ते अजून निराळाच प्रकार . कडवट बोलायचं , टोमणे मारायचे , तिरकस बोलून अपमान करायचा . कडू कारलच जणू. वीणाताईंनी सुरवातीला गोड़ बोलून , साखर पेरून बघितली पण परिणाम शून्य . अशा माणसाबरोबर किमान दोन वर्ष कशी काढायची ? वीणाताईंच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून ही  रेसिपी.  
कारल्याची भाजी.  
आज आपण कांद्यावर परतून कारल्याची  भाजी करणार आहोत. काही माणसं कारल्यासारखी आतून कडवट असतात . तिथे साखर पेरून काही होत नाही. अशा लोकांना तिखट,  डोळ्यात पाणी आणणारा कांदाच योग्य .या कडू माणसांसारखं, कारल्याच्याही पोटात "बी" असतं , ते प्रथम काढून टाकावं. म्हणजे त्याला बोलतं करावं. पोटातलं  ओठावर येतं . मग मैत्रीचा सल्ला म्हणजे गरम पाणी घेऊन त्यात त्याला बुडवून ठेवावं , थंड पाणी म्हणजे थंड उपदेश नको. त्याने कडवटपणा जात नाही. कारलं मग कपड्याने पुसून घ्यावं आणि चकत्या कराव्यात . एका गरम कढईत संवादाचं तेल सोडावं ,त्यात कारलं आणि कांदा मंद आचेवर परतून घ्यावे.  थोडा वेळ लागतो पण घाई करून गॅस वाढवलात तर भाजी आणि नातं दोन्ही करपण्याची शक्यता जास्त. हळूहळू  कारलं आपला कडवट पणा सोडतं , कांदा कारल्यासाठी आपला तिखटपणा सोडतो. दोघांचं जमून येण्यासाठी कौतुकाचा अगदी थोडा, दाण्याएवढा गूळ घालावा. हिंग , हळद , मोहरी अशा बहुगुणी मित्राना  बोलावून या नात्याला चुरचुरीत फोडणी द्यावी. मग दोघेही गळ्यात  गळा घालून तुरटगोडपणा कडे पुढचा यशस्वी  प्रवास सुरु करतात . दुसऱ्यासाठी  आपला “स्वधर्म”सोडणार्या या दोघांमुळे या भाजीची "चव" आयुष्यभर लक्षात राहते.नातं कसं जोडावं हे शिकवून जाते.