शुक्रवार 07 डिसेंबर 2018

माझा बालमित्र - एक फॅण्टसी

माझा बालमित्र अभय देशपांडे पुढे खूप मोठ्ठा शास्त्रज्ञ झाला . अणुरेणिया थोकडा , तुका आकाशाएवढा !! हा शोध तुकारामानी केव्हाच लावला होता . त्याच्याच पुढे काहीतरी करतोय म्हणे. त्याच्यावरून पूर्वी सुचलेली एक फँटसी , नाव फक्त न्यूटनच टाकलय . शुभाताई, तुझ्यासाठी जुन्या आठवणी !!

मी आणि आयझेक ( तुम्ही न्युटन म्हणता तोच!) पार्ले टिळकला एकाच वर्गात होतो.एकाच बाकावर बसायचो आम्ही. तसा तन्द्रटच होता तो पहिल्यापiसुन. सारखा खिडकीबाहेर आकाशात तन्द्री लावून बसायचा. एकदा तर शाळेसमोरच्या इमारतीतला एका मुलीचा बाप त्याला रागारागाने शोधत आला होता. त्याला वाटल, त्याच्या टेडी बेअर सारख्या दिसण्या-या मुलीकडे हा टक लावून बघतोय. तस वयच होत आमच. मुलींच्या खिडकीकडे लक्ष जाण्याच.(यत्ता नववी). पण आम्ही मात्र धुतल्या तान्दळासारखे स्वच्छ होतो.( बाबूच्या वड्याची शप्पथ).तो जरा जास्तच होता.म्हणजे अक्खा बासमती.

तर सांगतोय काय? आकाशात टक लावून विचार करत बसायचा. बाई म्हणायच्या अरे न्यूटन, जरा फळ्याकडे लक्ष दे. पण हा आपला ढिम्म. लहानपणी विनोबांच्या गीताईचा आमच्यावर खूप परिणाम झाला होता. न्यूटनने त्यातल "फळाची" आसक्ती सोड एवजी "फळ्याची" आसक्ती सोड अस वाचल होत त्याचा परिणाम असावा बहुतेक.

एकदा असच बाईनी वर्गाबाहेर काढल म्हणून आम्ही दोघे बाहेर पडलो. चित्रकलेचे वर्ग भरायचे ना ( हो, तेच गावडे सरांचे) त्याच्या मागे एक सफरचंदाचे झाड होत. तिथे जाऊन बसलो. पोटात कावळे कोकलत होते आणि डबे वर्गात राहीले होते.

वरुन एक सफरचंद पडल. मी म्हटल, न्यूटन ( मी त्याला न्यूटन म्हणायचो, आयझेक मालवणी शिवी सारख वाटत.). तर न्यूटन लेका घे खाऊन, देवाने आयतच दिलय. तर म्हणतो कसा, हे वरुनच का पडल? खालीच का पडल? खालून वर का नाही गेल? आता पडल तर खायच की नाही गपचुप? पण हा असाच तर्कट. म्हटल याच पोट भरलय बहुतेक. म्हणून असले प्रश्न पडतायत. मी टाकल खाऊन.

पुढे अनेक वर्षानी माथेरानला घोड्यावर लाल मातीने माखलेला एक माणुस मला अडवून म्हणाला, काय रे ओळखलस का मला? मी म्हटल लाल तोंडामुळे तू आपल्या पूर्वजापैकी दिसतोयस. पण अरे न्यूटन!! तू? काय करतोस? कुठे असतोस?

न्यूटन शांतपणे म्हणाला , अरे तुला आठवतय? लहानपणीच आपल ते सफरचंद ? तू पटकन खाऊन टाकलस , मी मात्र विचार करत बसलो, गुरूत्वाकर्षणाचा शोध लावला. त्याचीच रॉयल्टी इतके वर्ष खातोय. शाळा तेव्हाच सोडली. काही काम करायची गरजच नाही. तुम्ही गणपतीत चार दिवस कोकणात जाऊन जे करता ते मी वर्षभर करत असतो. जगभर फिरून धमाल!!.

मला गीतेच वचन आठवल…!!! "फळाची" आसक्ती सोड. त्याने ते बरोबर ऐकलं. मी सोडू शकलो नाही. मी खाऊन टाकल. सफरचंद मी खाल्ल, पण “फळ” त्याला मिळाल.

आई म्हणायची, याला छक्के पंजे कळत नाहीत हो ! बायको म्हणते याना व्यवहारद्न्यान म्हणून नाही हो!!. म्हणजे नेमक काय नाही हो?. मलाच प्रश्न पडतो. त्याचं उत्तर मिळालं. मी आता ठरवल आहे, कुठलही "फळ" समोर आल की, आधी विचार करायचा , मग खायच. असो. बापट गुरुजी म्हणाले होते तेच खरं. राहूची महादशा चालली होती माझ्या कुंडलीत.

मी भानावर आलो. त्याला म्हटल तोंड धुवून घे. आपला दोघांचा एक फोटो काढू. मला माहितेय उद्या टीव्ही चॅनेलवाले न्यूटनचा बालमित्र माझ्याकडे शोधत येणारच तेव्हा “आपला: फोटो तयार आहे. तसा मी लहानपणापासून चाणाक्ष बर का ? तुम्हाला माहिती आहेच.!!