शुक्रवार 07 डिसेंबर 2018

कर्म

आज लेख नको . उपदेश नको . उपनिषदातली एक छोटीशी गोष्ट सांगतो . गोष्टीचं नाव आहे कर्म

एका झाडावर एक लहान पक्षी राहत होता . एकदा तो फांदीवर बसून मोठ्या आनंदाने फळ खात होता . इतक्यात त्याची नजर झाडाखाली उभ्या असलेल्या यमावर गेली . यम  त्याच्याकडे टक लावून पहात होता . पक्षी घाबरला , थरथरू लागला . इतक्यात एक घार  वरून उडताना त्याला दिसली. त्याने घारीला हाक मारली . तो म्हणाला , अगं , जरा माझी मदत कर ना . तो यम बघ कसा माझ्याकडे बघतोय . मला उचलणार बहुतेक . त्या आधी मला इथून बाहेर काढ .घारीला त्याची दया आली . तिने त्याला चोचीत धरलं आणि उंच उडू लागली . हिमालयाच्या उंच शिखरावर त्याला सुरक्षित ठेवून म्हणाली , आता इथे तुला कोणी हात लावणार नाही . त्याक्षणी यमाने आपल्या पंजात त्या पक्षाला धरलं . घार म्हणाली , ए यमा , हा रडीचा डाव आहे, मी त्याला वाचवून इथे आणलंय . यम म्हणाला , अगं , ऐकून घे , मी झाडाखाली उभा राहून हाच विचार करत होतो कि या पक्षाचं मरण हिमालयाच्या उंच शिखरावर लिहून ठेवलय तर हा इथे कसा ? आणि हा एवढासा पक्षी तिथे जाणार तरी कसा ? माझ्याकडून  चूक झाली कि काय ?असं कधी होत नाही !! पण तू गुंता सोडवलास.