शुक्रवार 07 डिसेंबर 2018

शबरीची बोरं !!

खरं सांगू का ? आपणच कैकेयी असतो . जगात वावरताना आपल्याला "व्यवहार " या नावाखाली हवं तसं वागून घ्यायचं असतं . स्वार्थ सांभाळायचा असतो . म्हणून आपण व्यवहार नावाच्या भरताला सिंहासनावर बसवून विवेक नावाच्या रामाला वनवासात पाठवतो. सद्सद्विवेकबुद्धी आपल्याला दैनंदिन जीवनात नको असते . तिची अडचणच जास्त होते . आता आपण प्रपंचाच्या नावाखाली काहीही करायला मोकळे . विवेक वनात निघाला कि त्याच्या मागे नीतिमत्ता नावाचा लक्ष्मण ही  निघाला. सद्विवेक ही  आत्म्याची सावली म्हणून मग सीताही वनवासाला निघाली .
दंडकारण्यात रामाला भेटायला आलेल्या शेकडो ऋषींना सारून राम मातंग ऋषींच्या आश्रमात शबरीला भेटायला गेला. ही शबरी म्हणजे सद्बुद्धी.योग्य अयोग्य याचा निर्णय करणारी बुद्धी . तिला मनासारख्या भावना  नसतात .  वनातली अनेक बोरं चाखून बघणारी , त्यातली आंबट टाकून, गोड़ आपल्या रामासाठी राखून ठेवणारी शबरी. आपल्या मनात अनेक विचार येतात . शुभ, अशुभ , भद्र अभद्र , चांगले, वाईट, नकार किंवा  सकारात्मक. त्यातले जाणीवपूर्वक पॉजिटीव्ह , शुभ विचार जमा करून ठेवायचे .अशुभ टाकून द्यायचे . असं सतत करायचं .  ते विवेकाला जोडायचे . विचार आणि विवेक हेच फक्त आपल्या आयुष्यातल्या "वनवासात" कामाला येतात अन्य काही नाही .पुन्हा एकदा वाचा , शुभ , पॉजिटीव्ह विचार आणि विवेक , रॅशनल थिंकिंग हेच कामाला येतात .  पैसे , आरोग्य , सौंदर्य , नाती , संबंध नाही येत .
रामाने शबरीला नवविधा भक्ती शिकवली , तिचा उद्धार केला. विवेक  आणि बुद्धी एकत्र आले कि तिचा उध्दार होतो ती सद्बुद्धी होते शुद्ध बुद्धी होते . पण माहितेय का ? शबरीने रामावर सर्वात मोठे  उपकार केले. त्याला किष्किंधा नगरीच्या सुग्रीव आणि त्याचा सेनापती हनुमान यांच्याकडे  जाण्याचा मार्ग दाखवला. हनुमान म्हणजे सत्वगुणी मन , सुग्रीव म्हणजे रजोगुणी मन . आधी विवेकाच्या मदतीने त्यांनी  तमोगुणी मन म्हणजे वालीचा पराभव केला. मग सत्वगुणी मनाला घेऊन विवेक पुढे युद्धासाठी निघाला. सद्सद्विवेकबुद्धी आणि त्याच्या पायाशी बसलेलं श्रद्धाळू  सत्वगुणी मन यांनी फक्त वनातले नर म्हणजे वानरांच्या मदतीने युद्ध जिंकलं . नीतिमत्तेच्या लक्ष्मणाने , विवेकाची रामाची साथ कधीही सोडली नाही. अशी ही  शबरी,  म्हणजे सद्बुद्धी. प्रभू रामाच्या  विजयाची खरी मानकरी.