मंगळवार 07 मे 2019

मन नावाचा नेपोलिअन

आमच्या शेजारी रेगेकाकुंचा एक श्वान आहे. कुत्रा म्हणायचं नाही बरं का? त्यांना राग येतो. त्याचं नाव आहे नेपोलिअन. मोठ्ठा वासराएवढा अल्सेशिअन. रेगेकाकूंचं मन आताशा था-यावर  राहत नाही. सगळं व्यवस्थित असून सुद्धा नेगेटिव्ह विचार येतात. कारण काहीच नाही. फॅमिली डॉक्टर म्हणाले मेनोपौजमुळे असेल, स्वामीजी म्हणाले, पूर्व कर्म, अध्यात्माकडे वळा. सायकिऍट्रिस्ट म्हणाले डिप्रेशन ची सुरुवात असेल पण औषध नको, मिस्टर म्हणतात रिकामपणाचे खेळ दुसरं काय? मुलगा म्हणतो जिमला जा. सून म्हणते लायब्ररी जॉईन करा. सल्ले ऐकून काकूंना गरगरायला लागलं..

एकदा देवळात भेटल्या. सहज विषय काढला. त्यांनी प्रॉब्लेम सांगितला. मी म्हटलं काकू मी सायकिऍट्रिस्ट नाही पण आपण तुमच्या नेपोलिअन विषयी बोलू. काकूंनी कान टवकारले ... नेपोलिअन सारखे. मी म्हटलं आपण असं समजू कि तुमचं मन नेपोलिअन आहे. तुम्ही लहान पपी असताना त्याला आणलंत, मुलासारखं लाड केलेत. मनाने जे जे मागितलं तेते दिलंत. विचार ही केला नाहीत, की हे योग्य कि अयोग्य. त्याला हौसेने फिरवलंत. हळुहळू तो मोठा झाला. लाडात वाढला. आता त्याला( मनाला) सगळं मनासारखं हवय. फिरायला नेलं आता तो तुम्हाला हिसके देऊन पाहिजे तिथे नेतो. त्याचं भुंकणं, अंगावर येणं, मूडी स्वभाव हे हाताबाहेर जायला लागलं, मी मनाचं म्हणतोय बरं का? म्हणून या मनावर लहान, कोवळं असतानाच संस्कार करायचे असतात. असो.

काकू तुम्हाला गम्मत सांगू का? तुमचा नेपो भुंकायचा म्हणून तुम्ही मला आवडत नव्हता. एकदा ओळख झाली तेव्हा कळलं कि तुम्ही तर स्वभावाने छान आहात.

असच होतं. मन वाईट वागलं कि आपण स्वतःला नावं ठेवतो. अपराधी वाटतं पण मन वेगळं आपण वेगळे. ५ टक्के मन वाईट वागतं म्हणून उरलेले ९५ टक्के वाईट नाही. ते चांगलच आहे पण आपण जाणीव करून घेत नाही.

आता तुम्ही नेपोला शिस्त लावायला डॉग ट्रेनर आणणार. हो ना ?. मनाचाही एक ट्रेनर असतो. शिस्त लावणारा, बदल घडवणारा. त्याचं नाव सकारात्मक विचार व आठवणी,  पॉसिटीव्ह थिंकिंग व मेमोरिज. चांगले दिवस, आठवणी, मित्र, आवडी छंद, चांगल्या घटना यांची उजळणी मनाच्या पडद्यावर सतत करायची. नेपोला डॉग बिस्कीटचा स्पेशल खुराक देता ना ? तसा जाणूनबुजून पॉसिटीव्ह विचारांचा खुराक मनाला द्यायचा. अजून एक करा. रोज घरी आल्यावर मनाला मिठी मारा, त्याचे लाड करा, कुरवाळा, त्याच्याशी बोला, चौकशी करा, कुठे दुखतंय खुपतंय, कोण चांगलं वाईट वागलं हे विचारा. नेपोशी माणूस समजून वागता ना तसं मनाशी वागा. नेपो घराची शान तसं मन तुमच्या अस्तित्वाची शान. मन नसेल तर तुम्ही मुर्दाड मग नाती बनणार नाहीत. म्हणजे पाण्याबाहेरचा मासा नुसती तडफड. कॉलोनीत तुम्हाला नेपोलिअनची मम्मी म्हणून ओळखतात ना? तसं मन हीच तुमची ओळख त्याशिवाय तुम्ही कोणीच नाही.

काकू नेपोलिअन कोण होता माहितेय ? जगद्जेता, अशक्य हा शब्द त्याला ठाऊक नव्हता. मारुतीरायाची शक्ती आणि रामाची भक्ती असलेला मन नावाचा नेपोलिअन जर प्रसन्न झाला ना काकू ? तर अक्ख जग तुमच्या पायाशी आणेल, घरी जाऊन नेपोलिअनची एखाद्या हाडाने दृष्ट काढा म्हणावं, मना, सज्जना, रोज पॉसिटीव्ह विचारांचा नैवेद्य दाखवीन, पण प्रसन्न रहा रे बाबा !!