शुक्रवार 07 डिसेंबर 2018

ठिक्कर आणि ठकीचा संसार

लहानपणी माझी एक बालमैत्रीण होती . पुण्याला माझी मावशी सदाशिवपेठेत ज्या वाडयात राहायची तिथे ती शेजारी होती. नाव विसरलो म्हणून आपण तिला ठकी म्हणूया. ठकी होती चिमुरडी चुणचुणीत पुणेरी . दोन चप्प वेण्या , परकर पोलका, ७ वर्षांची , हुजूरपागा किंवा नु म वि अशा हुशार मुलींच्या शाळेत जाणारी. ७ व्या वर्षी महर्षी कर्व्यांचं ज्ञान दान व समाज प्रबोधन हे मह्तकार्य हाती घेतलेली .( थोडक्यात सर्वाना अक्कल शिकवणारी ). पुण्याहून सुट्टीतून परत येताना माझा IQ दहा वीस टक्क्यांनी वाढवणारी , वेळ पडली तर कचाकचा भांडण करणारी. ठकी .
वाड्यात बाकीची मुलं मोठी असल्यामुळे मला बऱ्याचदा ठकीशीच खेळावं लागे . ठकीचा आवडता खेळ होता ठिक्कर. अमेरिकेत त्याला हॉपस्कॉच म्हणतात म्हणे.वाड्यातल्या रिकाम्या लाद्यांवर खडूने ठकी चौकोन काढत असे . सगळे चौकोन, त्यांना ती घरं म्हणत असे , काढून झाले कि हातात एक चपट ठिक्कर घेऊन मे महिन्यातल्या रणरणत्या उन्हात ठकी मला खेळ शिकवत असे .
आज या गोष्टीला ४७ वर्ष झाली . पुढच्या आयुष्यात अनेक बायकांचे संसार बघितले तेव्हा ठकीच्या या ठिक्कर खेळाची आठवण येत असे .ठकीने प्रथम मला खेळ शिकवला , माझ्याकडून सगळं करून घेतलं तो दिवस आठवतो . तिने चौकोन काढून त्यात आकडे भरले मी त्या घराना नाव देतो म्हणजे स्त्री आणि तिचा संसार म्हणजे काय ते कळेल .
ठकीने पहिला चौकोन काढला. आपण त्याला माहेर म्हणू. ती म्हणाली हे पहिलं घर . इथे काय तो श्वास घे , इथून पुढे श्वास घ्यायला मिळणार नाही . या घरात दोन पावलांवर उभं राहता येतं. याच्या पुढे लंगडी किंवा एका पायाची कसरत . आता हातात ही ठिक्कर घे. ठिक्कर म्हणजे मुलीचं वय . जस जस वय वाढेल तशी ही ठिक्कर पुढच्या घरात टाकायची आणि ती जबाब दारी घ्यायची . आता पुढे दोन घरं , शिक्षण आणि तारुण्य , दोन्ही घरात मज्जा . सुरवातीला तुझ्यासाठी सोप्पी घरं ठेवलीयेत . बरं का ? याच्यापुढचं घर लग्न . इथे लक्ष देऊन पाऊल टाक. चुकलं तर बाद होशील . ( ठकी मला मध्येच घाबरवायची )
आता याच्या पुढे पुन्हा दोन घरं , नवरा आणि सासर , दोन्ही घरात बरोब्बर पाऊल पडलं पाहिजे . थोडी ओढाताण होईल . तोल सांभाळ . ( होय ग बाई !)
आता एकदम  उडी मारून एकाच घरात यायचं , ते घर म्हणजे बाळंतपण. थोडा श्वास घे पण थोडा वेळच बरं का ? पुढच्या तयारीला लागायचं.
आता पुन्हा दोन घरं मुलं आणि नवरा . हे बघ प्रत्येक घराला चौकट असते त्याबाहेर पाऊल जाता कामा नये .( ठकी , काही चौकोन नुसतेच फुल्या मारून ठेवलेत , काय आहे ते ? ) ठकी म्हणाली, तिथे कधीच जायचं नाही, त्या दिशेला पाऊलही पडणार नाही हे बघ, मोठेपणी तुला काय ते कळेलच.
बराच प्रवास झालाय तुझा , पण अजून संपलेलं नाहीये . पुढे बघ दोन घरं . एकात मुलांचं करियर ,लग्न , संसार दुसरीत नवरा , सासर .
ठकी त्या खेळाची डिफिकल्टी लेव्हल वाढवत न्यायची . कधी माझे डोळे बंद करून , तळहातावर दगड ठेवून तर कधी चक्क कपाळावर दुसरी ठिक्कर ठेवून .
संसारात पण असच . कधी नवर्याची अचानक परगावी बदली झाली , कधी सासऱयांचा  बायपास , कधी फ्लॅटचे पैसे बिल्डरने बुडवले, कधी माहेरी दादा वहिनीची पराकोटीला गेलेली भांडणं. मी म्हणायचो , ठकी, किती दमवतेस . जरा पहिल्या घरात जाऊन पुन्हा सुरुवात करू का ? ठकी म्हणायची, एकदा पाऊल बाहेर टाकलस ना.? आता पुन्हा माहेरी नाही जायचं . जिथे असशील तिथूनच खेळ सुरु ठेवायचा . इतक्यात , ठकी SSS अशी हाक ऐकू यायची. आईची . ठकी
मदत करायला आत गेली कि मी धावत पहिल्या घरी माहेरी जायचो , मैत्रिणींना भेटून यायचो . फुफ्फुसात फ्रेश हवा भरून पुन्हा आहे त्याच घरात . ठकी यायच्या आत .मी म्हणायचो , ठकी खेळ  इतका कठीण का करून ठेवतेस ? ती गूढ हसत म्हणायची , हाच तर खेळ आहे , हीच तर गम्मत आहे , हे स्त्रीचं आयुष्य आहे तुला समजायचं नाही .
आज वाटतं , एका हातात  परकर धरून , लंगडी घालत , टणाटण उड्या  मारत , सगळी घरं काबीज करणारी ठकी आयुष्यात बरंच काही शिकवून गेली . सुदैवाने माझ्यावर ही  वेळ आली नाही . मी आपला नवर्यांचा आवडता खेळ आयुष्यभर खेळत राहिलो. कुठला माहितेय ? तळ्यात मळ्यात !!