सोमवार 10 डिसेंबर 2018

यौवन - बर्फ़ाचा गोळा

देव नावाचा एक भय्या असतो. ब्रह्माण्ड ही त्याची गाडी . सृष्टी नावाची बर्फ़ाची लादी किसून हाताने गोळा बनवणे हे त्याचे काम . मानवी जीवन नावाच्या काडीवर तो हा गोळा लावतो . हेच ते तारुण्य , यौवन . त्या गोळ्यावर  आता तो वेगवेगळे यौवनाचे रंग टाकतो . हिरवा तरुण हिरव्या मनाचा , गुलाबी प्रेमाचा, मैत्रीचा , आकाशी काव्य नाटय प्रतिभेचा , पिवळा ठणठणीत आरोग्याचा , मोरपिशी मुसमुसत्या यौवनाचा,  कधी कधी क्रांतीचा लाल आणि देशभक्तीचा भगवा सुद्धा . रंगीत सरबताने भरलेला गोळा आपल्या हाती देऊन देव म्हणतो , लो साब , खाओ !!. तारुण्य बर्फ़ाचा गोळा याकरता कारण ते क्षणाक्षणाला वितळत असतं . हे यौवनाचे सगळे रंग त्या त्या क्षणीच बर्फ वितळण्यापूर्वी  चाखायचे  असतात. बर्फ़ाचा गोळा खाणं ही  एक कला आहे  तसंच तारुण्याचा योग्य वेळी आस्वाद घेणं ही सुद्धा एक कलाच .
काही लोक हा अमूल्य वेळ फुकट घालवतात त्यांचा गोळा हातातच विरघळतो . काही लोक आपलं तारुण्य विरघळलंय हे मान्यच करायला मान्य नसतात . भय्याला और डालो और डालो असं विनवत असतात . तेच हे सगळे बोटॉक्स , फेस लिफ्ट, प्लास्टिक सर्जरी करणारे. निसटत्या यौवनाला घट्ट धरून ठेवणारे . हे म्हणजे तेलकट हाताने चोराला पकडण्याइतकं कठीण . आपला भय्या प्रत्येकाला एकदाच गोळा देतो . पुन्हा नाही . आपला संपेपर्यंत तो पुढच्या गल्लीत निघून गेलेला असतो .
तारुण्य आता सरलंय हे मनाला पटत नाही . बसमध्ये एखादी सुंदर देखणी तरुणी बिनदिक्कत पणे आपल्याच शेजारी येऊन बसते. अंकल एक्सक्यूज मी म्हणते तेव्हा आपल्या मनाशी खुद्कन हसावं . आपले कानामागचे चंदेरी केस नेमके फितूर होतात आणि सुंदर मुलींनाच आपल्या वयाची चुगली करतात . ( आंटीना ते दिसतही नाहीत ). 
खूप वर्ष परदेशी राहून गावी  सुट्टीला जावं . जिवलग मित्राबरोबर बरेच दिवस जुन्या आठवणीत जागवाव्यात  . मग त्याने आपल्याला सोडायला मुंबई एअरपोर्ट वर यावं . तसं अनेक वर्ष साथ देणारं हे तारुण्य असतं . जाण्यापूर्वी त्या यौवनाला एक मिठी मारावी . ( आयुष्याच्या ) एअरपोर्ट च्या थंड लॉबीत प्रवेश करताना त्याला काचेतुन बाय बाय  करावं . म्हणावं आता पुन्हा भेट डायरेक्ट पुढच्या जन्मी . मग कुटुंब कबिल्या सोबत प्रपंचाचं भरपूर बॅगेज घेऊन गृहस्थाश्रमा साठी चेक इन करावं . जीवन एरलाईन्स चा पुढचा प्रवास सुरु . याला म्हणतात यौवन संपल्याचा ग्रेसफुल स्वीकार !! हो कि नाही ?