सोमवार 10 डिसेंबर 2018

डबा ऐसपैस

लहानपणीचे  खेळ म्हणजे मोठेपणाचे जीवनाचे धडे असतात हे माझ्या नुकताच लक्षात आलय . चला एकेक खेळ बघूया .
डबा  ऐसपैस. नवरा बायको मोठ्या थाटात लग्न करून आपलं संसार थाटतात . संसार हाच डबा . काहींचा नवा चकचकीत . काहींचा जुना चेपलेला तरी प्रत्येकाला आपला संसार प्यारा. एकदा खेळ सुरु झाला कि डोळ्यात तेल घालून त्यावर लक्ष ठेवावं लागतं कारण तुमच्यावर "राज्य" असतं म्हणजे तुमचंच राज्य संसारात  चालतं. संकटं हे सवंगडी, प्रतिस्पर्धी  . ते या डब्यावर नजर ठेऊन असतात .कधीही येऊन लाथेने दाब उडवतात .  माझ्या एका नातेवाईकाच्या बायकोला ऐन चाळीशीत पुढच्या स्टेज चा ब्रेस्ट कॅन्सर झाला . कोणाचा बिझिनेस अचानक बुडतो तर कोणाचा तरुण मुलगा अपघातात ........ .चारी बाजूने लक्ष ठेवणार तरी किती .
रावणाचे दोन जुळे भाऊ होते .अहिरावण ,महिरावण . प्रत्यक्षात एकच . मायावी होते कुठलही रूप घ्यायचे. तसे आपलेही  दोन असतात . एक शौर्य , दुसरा धैर्य . दोघांनाही डब्याच्या दोन्ही बाजूला उभं करायचं . लहान संकट असेल तर शौर्य पुढे होतो . जिंकून येतो . मोठं संकट आलं कि धैर्य अंगावर झेलतो . तिथे शौर्य चालत नाही. सहनशक्ती , चिवट पणा पेशन्स लागतो . वेळ वाईट असते ती जावी लागते . तोपर्यंत खिंड लढवावी लागते . बाजीप्रभू सारखी . हे दोघे मिळून संसाराचा डबा शेवटपर्यंत वाचवतात .
मग तुम्ही म्हणाल , इथे देवाचा काय रोल ? तर काही नाही . देव आईसारखा गॅलरीतून लक्ष ठेवतो . तुम्ही पडलात , खरचटलं तर डेटॉल लावणार . अंधार पडला कि घरी बोलावणार . खेळ गुंडाळणं तिच्या हाती . संकटं सुद्धा मग मुकाट आपल्या घरी जाणार .कुठल्यातरी संकटाने लाथ मारून आपला डबा उध्वस्त केला म्हणून आपण रडत घरी जातो .
देव नावाची आई म्हणते ,अरे  वेड्या खेळ होता तो. खरं नव्हतं काही . तू मन लावून खेळलास ना ? इतका वेळ डबा राखलास ना ? तेच छान झालं . अचानक कोणीतरी येऊन तुला आउट करणारच.  हार मानणं , अपयश स्वीकारणं , त्यातून शिकणं , दुसर्याला जिंकू देणं हेच शिकवायला तुला खाली पाठवलं होतं .
माझ्या या ऐसपैस विश्वात किती जणांचे संसार रोज थाटले जातात किती उध्वस्त होतात याची कल्पना कर . एकीकडे नवरा बायकोचा छोटासा संसार दुसरीकडे ऐसपैस विश्व , त्यात लपुन राहिलेली , टपून बसलेली संकटं . माझीच मुलं , त्यांचेच डबे , संकटं सुद्धा मीच दिलेली . तुम्हाला डबा राखायला लावणारी  मीच , संकटाना लाथ मारायला  लावणारी  ही  मीच .दोघांवर लक्ष  ठेवणारी , पडलात तर धावत येऊन उचलून घेणारी , खेळातून जीवनाचे धडे देणारी मी आहे ना सर्वांची आई .
अशी ही  माउली. आपला  डबा आणि तिचं हे  ऐसपैस विश्व ,खेळणारे आपण पण खेळ तिचा . म्हणून नाव डबा  ऐसपैस.