शुक्रवार 14 डिसेंबर 2018

नको पुन्हा तो शेर !!

प्रिय जॉट, फार फार वर्षांपूवीची गोष्ट आहे ही. आमची कोळिण आमच्या साठी सोललेल्या कोलंबीची सालं शेजारच्या जोशी काकुन्च्या दारात टाकत असे. काकू रोज त्यावरून भांडायच्या. त्या कोलंबीचा वास लागून वरण भात खाणारा त्यांचा गणू अट्टल ( गुन्हेगार नव्हे!) खादाड बनला. पुढे माशांची आवड लागून , हॉटेल मॅनेज्मेंट करून, दुबईच्या हॉटेल मधे नोकरीला लागला. एकदा काकू सांगत होत्या , हॉटेलच्या क्युलिनरी हाइजीन डिपार्टमेंट मधे सेरमिक डिसिन्फेक्षन एग्ज़िक्युटिव आहे म्हणे, ( थोडक्यात, भान्डी घासतोय, पण आपण का बोला?) असो. मुद्दा काय तर दारात टाकलेली गोष्ट माणसाच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते.

तू रोज सकाळी आमच्या ( वाट्सॅपच्या) दारात ( शेरोशायरिची ) शेराची टोपली टाकतोस, केराची टोपली टाकल्या सारखी. पण माझ्या आयुष्यात आमूलाग्र क्रांती घडण्या ऐवजी पूर्वायुष्यात येऊन गेलेल्या चार शेरांची आठवण ताजी झाली. ती सांगतो . ऐक.

दहा धंदे करून फसलेला माझा एक मित्र शेयर मार्केट मधे दलाल आहे. डरकाळी फोडणारे शेर नेहेमी पडतात आणि गुहेत लपून राहिलेले शेर नेहेमी चढतात असा त्याचा सल्ला असतो. याच सल्ल्यामुळे एकदा शेयर मार्केट नावाच्या दुर्योधनाने भर दरबारात माझं (द्रौपदीच) वस्त्र हरण केलं होतं. बायको नावाच्या श्रीकृष्णाने बॅंकएफडी नामक वस्त्र पुरवून माझी लाज राखली होती. त्यानंतर मी पुन्हा शेर विकला किवा घेतला नाही.............................

दूसरा शेर, लग्नानंतर राणीच्या बागेत गेलो होतो तिथे एक शेर दिसला. दहा मिनिटे चालून वाण्याच्या दुकानात गेल्यावर खिशातुनसामानाची यादी पडली हे लक्षात यावं आणि आता बायकोला कसा फोन करावा या चिंतेत पडाव तसा त्याचा चेहरा दिसत होता.बाजूला सौ वाघ रागात येरझार्या घालत होत्या.मला माझ्या विवाह्पष्चात आयुष्याची कल्पना आली.

त्यानंतर पुन्हा शेर नावाचा वाघ मी पाहिला नाही. .............

माझ्या आयुष्यात तिसरा शेर आणला तो भेळवाल्याने. शेरोशायरीची पुस्तके टराटरा फाडुन त्यात तो भेळ बांधत असे. ती भेळ चाटून पुसून खाल्ली की त्यातली जादुई शायरी अलगद कागदावर उतरे.तीच पत्रात लिहून मी होणार्‍या बायकोला प्रेमपत्र ते लग्न असा कठीण प्रवास घडवला होता. आणि एके दिवशी नशीबच रुसलं. भेळवाल्याने शेरोशायरीची पुस्तक सोडून,गुळगुळीत कागदातल्या फिल्म फेयर मधेभेळ बांधायला सुरवात केली.मी सवयीप्रमाणे कागद चाटुन पुसून लख्ख करत होतो. पण आज शेरोशायरी ऐवजी कागदावर स्विम्मिंग कॉस्ट्यूम मधली एक नटी अवतरत होती. ( फिल्म फेयअरचे प्रताप)हिच्या एक दूरच्या आत्याबाई जवळच उभ राहून हा प्रकार बघत होत्या. ( दूरच्या असून नको तेव्हा जवळ!!)

त्यानी त्वरित नेताजी पालकर असल्याप्रमाणे रायगडावर महाराजांच्या ( सास-यांच्या) कानी ही गोष्ट घातली. आमचा राज्याभिषेकाचा (लग्नाचा) मुहूर्त पाचव्या वेतन आयोगा प्रमाणे पुन्हा एकदा पुढे ढकलला गेला.

त्यानंतर मी पुन्हा शेर वाचला नाही, चाटला तर कधीच नाही. ..............................

चौथा शेर, लग्नानंतर पुन्हा एकदा शायरीची सुरसुरी आली.

वि टी स्टेशन बाहेर हेलपाटे मारुन पुस्तकं आणली. पहिल्या वेळी माहेरी गेलेल्या बायकोला रात्री रस्मे उलफत, कसमे मुहब्बत,चस्मे बहादूर,भस्मे अगरबत्ती अस बरच काही बाही ऐकवलं. तिचं उत्तर ऐकलं आणि धन्य झालो. “झेपत नाही तर घ्यावी कशाला ? म्हणते मी. आता गाडी ठेवा तिथेच आणि टॅक्सीने घरी जा.”

पुन्हा मी शेर दुसर्याला ऐकवला नाही...................

थोडक्यात काय? तर हे जॉट, मेरे शेर ए डहाणू

पुन्हा त्या आठवणी काढून, नको डोळ्यात पाणी आणू...........