सोमवार 10 डिसेंबर 2018

नळी

गेली २५ वर्ष मी मटणाची नळी चोखतोय पण त्यातला मऊ मगज सोनूसाठी ठेवतोय. आमच्याकडे तशी परंपराच आहे. माझ्या बाबानी सुद्धा आयुष्यभर तो मला दिला. एकदा बाहेरगावी मटण खाताना ताटात नळी आली पण सोनू नव्हती. मगज खाताना मला अपराधी वाटत होतं. बाप म्हणजे एक नळीच  असतो. आपल्या आयुष्याची नळी  फुंकून त्यातला मऊ मगज आपल्या मुलांना भरवणारा किंवा आपण स्वत: बाहेरून नळीसारखं कणखर, टणक राहून मगजासारख्या मुलांच रक्षण करणारा. त्या बापासाठी  ही कविता
 
मी एक नळी
 
जन्माला तुमच्यासोबत येणारी...........नाळ, ………मी एक नळी
बालपणी शिक्षणात साथ देणारं............पेन , ……. एक नळी
 
तरुणपणी वाईट व्यसन लावणारी....... सिगरेट, ………मी एक नळी
स्त्रियाना मातृत्व देणारी.... फलोपियन ट्यूब, ………सुद्धा एक नळी
 
यशस्वी डॉक्टर घडवणारा ........ स्टेथोस्कोप ,……… एक नळी
भगवंत ज्यात प्राण फुन्कतो ती, देहाची  बासरी,…… सुद्धा एक नळी
 
सावित्री होवुन पेशन्टला मान्डीवर घेते, यमाला पळवुन लावते,
ती वेंटीलेटर ची ट्यूब , ………… एक नळी
 
एका टोकाला जन्म,   दुसर्या  टोकाला मृत्यू , मधूनच पळण्याची सोय नाही
अस तुमच आयुष्य  म्हणजे  सुद्धा मीच  !!!   ……….एक नळी