सोमवार 10 डिसेंबर 2018

स्वर्ग , कैलास , वैकुंठ

स्वर्ग , कैलास आणि वैकुंठ ही पुराणातली स्थळं नाहीत . मला वाटतं त्या मानवी मनाच्या तीन अवस्था असतात . स्वर्ग म्हणजे सुख ( राजा इंद्र ), कैलास म्हणजे वैराग्य ( अधिपती - शिव ) आणि वैकुंठ म्हणजे आनंद ( मालक - विष्णु ) . सुरुवातीला माणूस सुखाच्या मागे धावत असतो . सुखाची जुळी बहीण म्हणजे भीती . ती कायम त्याच्याबरोबर असते . आधी सुख मिळवण्यासाठी धावपळ , मिळालं तर जाईल हि भीती म्हणून टिकवण्यासाठी धावपळ. इंद्र म्हणून कायम टेन्शन मधेच असतो. ज्या लक्ष्मीला बोलावून सुख आणलं ती सुद्धा चंचल , सारखी बाहेर पळते . तिथे पृथीवर ऋषी तपश्चर्येला बसतात ते यशस्वी झाले कि भोळा सांब सदाशिव शंकर त्यांना वर देणार , मग पुन्हा इंद्राच्या स्वर्ग पदाला धोका . त्यांचा तपोभंग करायला मग अप्सरा पाठवायच्या . अरे बापरे किती तो डोक्याला ताप . का तर केवळ स्वर्ग सुख पाहिजे म्हणून . मन हा सुद्धा इंद्रच . सुखातही स्वस्थ बसू शकत नाही .


मनाची दुसरी अवस्था दुःख . दुःख आलं कि सगळं सोडावंसं वाटतं . हे नको, ते नको,  नातेवाईक, पाहुणे नको  साड्या दागिने नको , एकटं बसावं शांत राहावं . आवाजाचाही त्रास . ह्याला म्हणतात वैराग्य . आता मन कैलास झालं.  सुख नाही त्यामुळे भीती नाही . सगळं कसं कैलास पर्वतासारखं शांत, थंड . कोणी चिटपाखरू नाही . पण हेही जास्त वेळ जमत नाही कारण तुम्ही योगी, बैरागी नाही .


म्हणून मनाची तिसरी अवस्था हवी . वैकुंठ . इथे सुख दुसऱ्याला द्यायचं. दुसरा तुम्हाला देतो . घ्यायच नाही म्हणून स्पर्धाच नाही . ईर्षा नाही , भीती नाही . दुसर्याला  सुख  देणं म्हणजेच आनंद,  हॅप्पीनेस.


आनंद आहे ,म्हणून शांती , समाधान . आपली काळजी दुसरा घेईल हा विश्वास . जिथे हे घडतं ते घर म्हणजे वैकुंठ . मानवी जीवनाची उच्च पातळी . वैकुंठाच चित्र बघा . एक हजार डोकी असलेल्या शेष नागावर विष्णु टेन्शन न घेता आरामात पहुडलाय . त्याच्या जिभेवर सरस्वती  आहे . म्हणजे घरातला परस्पर संवाद . नाभीतून ब्रह्मा. सुजनशीलता , क्रिएटीव्हीटी , नवनिर्मिती . पायाशी  लक्ष्मी , ऐश्वर्य, संपत्ती आपणहून येऊन बसलीय , खेचून आणलेली नाही. विष्णु आणि त्याचं हे कुटुंब पोहोतंय ज्ञानाच्या अथांग समुद्रात . दुग्ध  सागरात. संवाद, निर्मिती , समाधान , शांती  असलेल्या  या ज्ञानी कुटुंबाच्या  पायाशी लक्ष्मी येणारच. म्हणून आपण स्वर्ग वासी किंवा कैलास वासी होण्यापेक्षा वैकुंठ वासी व्हावं . तुम्ही म्हणाल , शुभ बोल रे नाऱ्या ....!!