गुरुवार 13 डिसेंबर 2018

बोर्डिंग स्कुल - एक व्यथा

पण तुम्ही लक्ष देऊ नका!!

य़ा, असे या बाजुनी या!
महाबळेश्वरच दगडी बोर्डीग स्कूल मला म्हणालं

हा गेटपाशी मान खाली घालुन केशरी टिपं  गाळतोय तो पारिजातक
बोर्डिन्ग म्हणजे मुल आणि फ़ुल हवीत लाम्ब लाम्ब
"हात लावु नका" हा बोर्डींगचा “पासवर्ड” गळ्यात अडकवून
आशाळभूतपणे  मुलांकडे  बघणारी  फूलझाडे  आडवी तुम्हाला  येतील

.......................पण तुम्ही लक्ष देऊ नका.

हिबिसकस रोज़ासिनेन्सिस ही बोटॅनिकल शिवी / पाटी
ज्याने आपल्या खोडात ठोकून घेतलीय  तो जास्वंद
आणि ती पहा तिथेच सायन्सची मिस मुलाना शिकवतेय
(शांती  निकेतन स्टाइल, यू नो?)
डोण्ट टच बॉयज, झाडानाही भावना असतात !!

...............पण तिकडे लक्ष देऊ नका.

इथे लाँबीत या. जीभ बाहेर काढून धपाधपा श्वास टाकणारे
गुबगुबीत अल्सेशियन इम्पोर्टेड कोच ठेवलेत त्यावर बसा.
ते बघा,मम्मी डॅडी मुलाला पहिल्यांदाच घेऊन आलेत
या क्षणी सुद्धा  "सातशे शेयर्स  विका"  हा मेसेज
सारखा सारखा रिसेन्ड करणार्या शेयर डॅडीकडे बघा.

मॅगझीन चाळता चाळता,
 डोळ्यांच्या कडा आणि  विरघळणारं आयलाय़नर
 पुसणार्या मम्मीकडे नजर जाईल

............. पण तिकडे लक्ष देऊ नका!.

आता ही बघा तुमच्या मुलाची पॉश बेडरूम आणि वॉशरूम (बघून तर घ्या )
म्हणजे चेकवर एक शुन्य जास्त पडल्याच दुक्ख तुम्हाला होणार नाही
भिंतीवर आपटणारे हुंदके, ओल्या उशामधले उसासे,
रात्रभर कुशी बदलून चुरगाळलेल्या चादरी तुम्हाला खुणावतील,
म्हातार्या आजीसारख "पाहुण्यांसमोर येऊ नको" म्हटल तरी त्या  ऐकत नाहीत

.............. ...... पण तुम्ही लक्ष देऊ नका!

शंभर वर्षांपूर्वी इथे एक इंग्रज, मडमेला घेऊन या दगडी बंगल्यात राहत होता.
एकुलत्या मुलाला आपल्या देशात  फ्रेंच नॅनीकडे ठेवून.
पुढे ही जागा एका पारशी बावाकडून आमच्या ट्रस्ट्ला मिळाली


मला आठवत एके दिवशी व्हरान्ड्यात
तो चिरुटला चिकटलेला इंग्रज, मुलाच पत्र बायकोला वाचून दाखवत होता
जिच्या फुन्करीच सुख नखावरच्या नेलपोलीशला मिळाल
तेवढ  मुलाच्या कापलेल्या बोटालाही नाही मिळाल

मुलाने लिहिले होते डॅडी, ज्या घरात तुम्ही मुलाशिवाय रहाताय
त्याच घरात शंभर वर्षानी शंभर मुल राहतील पण .....आईबापाशिवाय

अंध श्रद्धा! डॅम इट...................पण तुम्ही लक्ष देऊ नका!