मंगळवार 11 डिसेंबर 2018

सीगल ते ईगल – गीतेचा १५ वा अध्याय

प्रिय अपूर्व , रिचर्ड बाखच्या जोनाथन पुस्तकावरचा तुझा छान लेख वाचला . विषय सुचला. लिहावेसे वाटले. चाकोरी मोडून ईगल म्हणजे घार होऊ पाहणाऱ्या जोनाथन या समुद्र पक्ष्याची ही कथा. मानवी जीवनात प्रयत्नवादाचे महत्व सांगणारे हे एक रूपक .

हल्ली सगळेच यशस्वी लोक हार्ड वर्क करा असा सल्ला देत असतात . तरुणपणी  प्रयत्नवादाचे हे पाश्चिमात्य तत्वज्ञान नेहमीच भुरळ पडते म्हणून आमच्यावेळी हे पुस्तक खूप लोकप्रिय ठरले .२५ वर्षांनी “ईश्वर इच्छा बलियसी”हे पौर्वात्य तत्वज्ञान अनुभवानंतर पटते ते म्हणजेच अध्यात्म. ते म्हणते कि मानवी प्रयत्नांना ईश्वरी जोड हवी. अर्जुन गीतेच्या सुरवातीला म्हणतो कि मी कर्तव्य विसरलो , तुला शरण आलो , मला मार्ग दाखव . शेवटी १८ व्या अध्यायात म्हणतो माझा मोह गेला, तू सांगशील ते मी ऐकेन .या दोघांच्या मधले ज्ञान म्हणजे अध्यात्म . आपण सर्वच हार्ड वर्क करायला तयार असतो तरीही आपण गांधीजी किंवा विनोबा का होऊ शकत नाही याचं उत्तर गीता देते . आफ्रिकेतून आल्यावर लगेच मोहनदास, महात्मा नाही झाले किंवा स्वातंत्र्य नाही मिळालं. गीता त्यांचा प्राण होता व  त्याप्रमाणे त्यांनी स्वत:मध्ये बदल  घडवला. १५ वा अध्याय हा मानवाच्या अध्यात्मिक प्रगतीचा कळस आहे. १४ व्या अध्यायापर्यंत रनवे वरून टेक ऑफ घेणाऱ्या विमानासारखी वेगाने धावणारी गीता आता अचानक अध्यात्माच्या आकाशात झेप घेते.

पुरुषाचा पुरुषोत्तम करण्याची क्षमता यात आहे म्हणून तो अध्याय गांधीजींना भावला. त्यावर त्यांनी अनासक्ती योग म्हणून पुस्तकही लिहिले , जरूर वाच. निर्गुण परमात्मा म्हणजे पुरुषोत्तम. सृष्टी आणि आत्मा यापलीकडे असलेली इर्श्वरी शक्ती. अनासक्ती म्हणजेच वैराग्य अंगी बाणवून, मधला मायेचा फोफावलेला पसारा छेदून, दृश्य जगात न गुंतून पडता , फक्त त्याच्याशी संपर्क ठेवायचा. पण हे करताना चराचरात ईश्वर पाहायचा , हरिमय दृष्टी ठेवायची , प्रत्येक कर्म देवपुजेइतकं मंगल करायचं. हे अध्यायाचं सूत्र. जमेल हे आपल्याला? आपल्यासाठी अतिथी देवो भव , ग्राहक राजा वगैरे दुकानात लावायच्या फक्त पाट्या आहेत .

एवढी तयारी झाली कि ती ईश्वरी शक्ती तुमच्याकडून विश्वात बदल घडवणारं अशक्य कर्म करून घेणार हे नक्की , तुम्ही फक्त निमित्त असणार असा या अध्यायाचा सारांश आहे .

स्वातंत्र्य लढ्यासाठी अक्खा देश एकत्र आणणे किंवा विनोबांसारख भूदान चळवळीत ५ हजार एकर जमीन जमीनदारांना स्वखुशीने गरीब शेतकऱ्यांना द्यायला लावणे हे अफाट कर्म शक्य होईल अस वाटलं होतं?

ज्या ईश्वरी शक्तीने गांधीजी आणि त्यांचे परम शिष्य विनोबा यांच्याकडून हे करवून घेतलं त्यापूर्वी त्यांची खडतर परमार्थसाधना , अध्यात्म तपश्चर्या पणाला लागली . त्यांनी आपल्या जीवनात गीता अक्षरशः: रुजवली. पुढे इतिहास घडला.

अपूर्व , देव हा टेलर असतो. सदा शिव ( दोन्ही अर्थाने ) अस त्याचं नाव आपण ठेवूया . आपण माणसं म्हणजे टेलरच्या अनेक आकाराच्या सुया. हा सदाशिव  माणूस नावाच्या सुई मधून लहान मोठे कर्माचे दोरे घालतो आणि सृष्टीत घडामोडी करतो. समजा लहान सुई ,बारीक दोरा असेल तर रुमाल शिवायचा. म्हणजे छोटे कर्म. जरा मोठे कर्म असेल मोठी सुई, मोठा दोरा. सर्वात मोठे कर्म, उदा. देशात क्रांती म्हणजे दाभण हवे त्यातून कर्माचा जाड दोरा गेला पाहिजे तरच गोधडी शिवता येणार.  सुई ते दाभण हा फरक आकाराचा नाही तर अध्यात्मिक तपश्चर्येचा आहे . म्हणून आपलं काम वेगळं आणि महात्मा लोकांचं वेगळं . आपली दाभण व्हायची तयारी हवी आणि गीता तसे करवूनही घेते. 

आपल्यापैकी अनेक जण सतत कर्म करतच असतात आणि त्याला तयारही असतात. मग कर्माचा अतिरेक आणि हरिमय कर्म यात फरक काय ? दगडफोड्या दिवसभर घाम गाळतो, दगड फोडतो, २०० रु मिळवतो . शिल्पकार आधी त्याच दगडात ईश्वराची मूर्ती बघतो मग नुसता मूर्तीबाजूचा दगड काढून टाकतो , लाखो  मिळवतो हाच तो फरक. विनोबांनी सौंदर्याची व्याख्या फार छान केलीय . ते म्हणतात , ईश्वराने तुमच्या कर्मावरून हात फिरवला कि जे निर्माण होतं ते सौंदर्य.