मंगळवार 11 डिसेंबर 2018

अर्थ विटेचा

माझा आणि विटेचा अर्थच तुम्हाला कळला नाहीये. देहूवरुन मला भेटायला साक्षात भक्ती येते . आळंदीवरून ज्ञान येतं पण मी मात्र कर्माने फेकलेल्या विटेवर उभा आहे . मी हेच सांगतोय कि कर्म सोडू नका मी तुमच्यासाठी थांबायला तयार आहे . पण हि वीट  मात्र भक्तीची हवी . भक्तीचा महाल नका बांधू एक वीट हवी बस्स . श्रद्धेच्या लाल मातीपासून बनलेली , निष्ठेच्या भट्टीत भाजलेली . भुसभुशीत नव्हे तर कणखर भक्ती . माणसाच्या जीवनाचं घर याच ईश्वर भक्तीच्या विटेनी बांधलं जातं. विश्वास ठेवा. कर्माचं सिमेंट फक्त विटा साधायला उपयोगी आहे , नुसत्या कर्माने सिमेंटच्या भिंती उभ्या नाही राहत . विटांच्या घरांची गरिबांना नाही वाटत पण श्रीमंताना,  उच्च शिक्षितांना लाज वाटते  , त्यांना वाटतं देव देव काय करायचं , आम्ही  कर्म करतोच की . बाहेरून प्लास्टर , रंग लावून मग भक्तीच्या विटा आत लपवल्या जातात मला ठाऊक आहे कितीही नाही म्हणोत . भिंतींना मग ते ज्ञानाच्या खिडक्या लावतात . मान्य कि ज्ञान म्हणजे जगाकडे बघण्याची खिडकी पण ज्ञानाची खिडकी उघडली कि अहंकाराचं वारं घरात शिरलच म्हणून समजा . अहंकाराच्या वा-याबरोबर "मी पणाची" धुळ तुमच्या डोळ्यात शिरते मग सगळंच अंधुक दिसतं.  समोर उभा असलेला मी सुद्धा दिसत नाही . अंतकाळी मात्र चित्र बदलतं . भिंत पाडायला घेतल्यावर जसे सिमेंट , रंगांचे टवके उडतात तशा आतल्या भक्तीच्या विटा पुन्हा एकदा दिसू लागतात . हात जोडले जातात , लोकं माझ्या पायाला मिठी मारतात , माझा ऊदो  ऊदो  करतात. मी गालातच हसतो . एक वेळ मला विसरा पण ज्या भक्तीच्या विटेने मला अट्ठावीस युगं उचलून धरलय तिला विसरू नका कर्म करत राहा मी आलोच तर बस खऱ्या भक्तीची एक वीट फेका मी उभा राहीन. युगानुयुगं. हाच अर्थ विटेचा.