मंगळवार 11 डिसेंबर 2018

कसरत

प्रिय मोनिका , जुळ्या मुलांच्या पहिल्या वाढ दिवसाच्या तुला डबल शुभेच्छा !! पहिल्याच वर्षी तुझी कसरत पाहिली. बाकीच्या आयांची तारेवरची कसरत असेल तर तुझी तारेवर चक्क एका पायाची लंगडी होती. आज मुलांच्या प्रकटदिनी काही विचार सुचले ते मांडतो .

खरं म्हणजे प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर तुझासारखीच जुळी होतात . एक असते मुलगी - स्वप्न -dreams, दुसरा असतो मुलगा - वास्तव - reality . दिसताना एकच दिसतो पण दुसरा त्यामागे दडलेला असतो . "स्वप्नांच्या" मागे धावावं तर "वास्तव " पाय खेचतो . वास्तवात अडकून पडावं तर स्वप्नं बोंबलतात . दोघांच्या मागे धावत मागण्या पुऱ्या करता तिची दमछाक होते. मग संध्याकाळी हलत डुलत अजून एक महाशय, नवरोबा येतात . अपेक्षा उर्फ expectations . हा तिचा खरा नवरा . सगळ्यांकडून अपेक्षा ! मुलं , सासर, माहेर, ऑफिस, नातेवाईक, समाज , जागतिक स्त्री वर्ग वगैरे वगैरे . हा अपेक्षा नावाचा नवराच स्त्रीला न बोलता बांधून ठेवतो . पंखाना अदृश्य दोरी बांधतो . उडू देत नाही . अपेक्षा पुर्या कराव्या तर त्याला अंत नाही , न कराव्या तर मन खातं . dreams, reality and expectations असं हे स्त्रीचं संसारचक्र . बिचारी दोन पायानी तीन चाकं चालवतेय , फिरतेय गरागरा .

मग यावर उत्तर काय ? समजा एका स्त्रीला ३ मुलं सांभाळत मॉल मध्ये फिरायचंय, तर ती काय करेल ? एकाला कडेवर घेईल . दुसर्याला बाबागाडीत बसवेल . तिसऱ्याचं बोट धरून चालेल . "स्वप्न" लहान असतात . तिला कायम तुझी गरज असते . तिला कडेवर घ्यायचं . तुम्ही नेमकं उलट करता. "अपेक्षांना" कडेवर घेऊन फिरता. "वास्तव" कडेवर घेतलं तर त्रागा करतो ,त्रास देतो . जास्त जवळ गेलेलं "वास्तवाला" आवडत नाही. त्याला डोळ्यासमोर बाबागाडीत ठेवायचं . त्याच्या मागून चालायचं . "अपेक्षांचं" नुसतं बोट धरायचं . आपोआप चालतात . जास्त लाड करायचे नाहीत .

"स्वप्न" , "वास्तव" नावाची मुलं आणि "अपेक्षा" हा नवरा या तिघांना सांभाळायला जर तुम्हा बायकांना जमलं तर मग प्रत्येक दिवस म्हणजे हैप्पी बर्थडे !!!