मंगळवार 11 डिसेंबर 2018

श्रावणथेम्ब

थेंब टपोरा टपोरा / त्याच्या पोटी बाळवारा

थेंब पाकळीच्या ओठी / श्वासगुन्जन प्रियाभेटी

 

थेंब अल्लड मन / जसे खुळे पिसे यौवन

थेंब गवत रानी / तृण हिन्दोळा मनी

 

थेंब प्राजक्ता देठि / गाढ केसरी मिठी

थेंब टापुर टुपुर / वाजे निसर्ग नूपुर

थेंब पिलाच्या चोचीत / दयासागर ओंजळीत

 

थेंब राधेच्या गाली / शामस्पर्श करांगुली

राधा मोहरे थरारे /जणू युग मागे सरे

 

थेंब मेंदीच्या पानी / पाहे मान वेळावूनि

जसा विठु विटेवर / देखे भक्तीचा महापूर

 

थेंब माझेच आयुष्य / फुका मायेचा पसारा

जन्म क्षणमेघातून / मिळे मरणसागरा