मंगळवार 11 डिसेंबर 2018

आयुष्याचा कॅरम बोर्ड

आपलं आयुष्य हाच एक कॅरम बोर्ड असतो . स्ट्रायकर म्हणजे मानवी प्रयत्न . सोंगट्या म्हणजे आयुष्यातले एकेक टप्पे . बालपण , शिक्षण , नोकरी , लग्न , मुलं , करियर , मैत्री , आरोग्य आणि शेवटी वार्धक्य अशा या ९ सोंगट्या . लाल राणी म्हणजे पैसा . आयुष्याच्या चारी बाजूला चार पॉकेट्स म्हणजे यश . सोंगटी बरोब्बर यशाच्या पॉकेट मध्ये गेलीच पाहिजे हे स्ट्रायकरचं काम. हेच आयुष्यातलं कौशल्य .

मधलं बोट स्ट्रायकरला, प्रयत्नांना बळ देतं. अंगठा मधल्या बोटाचा जोर नियंत्रित करतो. श्वास रोखून, डोळे सोंगटीवर स्थिर करून अक्खा मेंदू कौशल्य पणाला लावण्यासाठी मधल्या बोटात उतरतो. पॉकेट मध्ये जाण्यासाठी लागेल तेव्हढाच जोर प्रयत्नाना देतो आणि सुम्म करत सोंगटी यशाच्या पॉकेट मध्ये जाळीवर अलगद उतरते . एक झाली आता दुसरी घ्या. खेळ चालूच राहतो. आयुष्यभर शिक्षण , नोकरी , लग्न , करियर वगैरे सोंगट्या घेणं चालूच राहतं .

त्यात राणी सर्वात महत्वाची , राणी म्हणजे पैसा . राणी घेतली तर आयुष्याचा डाव जिंकला नाहीतर सगळं फुकट . काही अधीर लोक खेळ सुरु झाला कि लगेच राणीच्या मागे लागतात . पैसा  सतत हुलकावणी देतो पण गडी सोडायला तयार नसतो . हुशार खेळाडू मात्र योग्य टप्प्यावर बाकीच्या सोंगट्या घेऊन मगच पैशाच्या मागे लागतात किंवा राणी आपल्या टप्यात येण्याची वाट बघतात. राणी बरोबर सद्विवेकाची कव्हर सोंगटी घ्यावीच लागते. नाहीतर मिळवलेला पैसा फुकट. राणी परत द्यावी लागते. राणी सांभाळायची अक्कल म्हणजे विवेक.

कधी कधी प्रयत्न थोडक्यात कमी पडतात. सोंगटी पॉकेटच्या अगदी जवळ जाऊन थांबते. प्रतिस्पर्ध्याला आयतीच मिळते. माझ्या मित्रावर अशी वेळ आली होती. माझ्या मित्रावर कॉलेजमधली एक गोड मुलगी  फ़िदा झाली होती. शरमेने किंवा हिम्मत होत नव्हती म्हणून त्यानं बराच वेळ हो-नाही करत काढला . उशीर झाला . पुढच्या सहा महिन्यात ती मुलगी शादी डॉट कॉम वरून थेट अमेरिकेत सॉफ्टवेयर इंजिनीअरच्या घरी लग्न होऊन गेली . 

याउलट कधीतरी सोंगटी नको तितकी जोरात जाऊन समोर आपटते . रिबाउंड होऊन आपल्याकडेच येते . माझ एका जवळच्या मित्राबरोबर क्षुल्लक भांडण झालं. दोघांचा इगो आडवा आला. आम्ही बोलणं टाकलं ते कायमचं. मी एक चांगला मित्र गमावला. याला म्हणतात स्ट्रायकरला जोर जास्त लावणं .

असा हा आयुष्याचा कॅरम. प्रत्येकाचा गेम वेगळा. आणखी एक गोष्ट . नशिबाने जर आपल्या कॅरम बोर्ड वर पावडर टाकली तर तो गुळगुळीत होतो आणि सोंगट्या सटासट जातात. पण ते आपल्या हाती नसतं. आपल्या हातात असतो फक्त स्ट्रायकर , प्रयत्न आणि त्याला बळ देणारं ,मेंदूइतकाच विचार करणारं मधलं बोट. बस्स त्यांच्या जीवावर गेम जिंकायचा . जिंकलाच पाहिजे. पर्याय नाही.