शुक्रवार 14 डिसेंबर 2018

नवरा म्हणजे रुबिक्स क्यूब

प्रिय सुषमा , नवरा रात्री उशिरा बाहेरून ड्रिंक्स घेऊन आला तर कसं वागायचं अशी "तुमची " गीता सांगते ? असा खोचक प्रश्न तू विचारलास, त्याचं उत्तर इथे देतोय .

रात्री एक दीड वाजता आपल्याच लॅचकी ने दरवाजा उघडून , आवाज न करता किचन मध्ये जाऊन , फ्रिज उघडून कालची दोडक्याची भाजी आणि डाळ भात नवरा  निमूटपणे गिळू लागला की समजावं हे “महाशय” आज ३/४ पेग घेऊन आलेत . आपण तोंडावर पांघरूण घेऊन पडून राहावं . आता इथून पुढे कहाणीला ३ रस्ते फुटतात .

सिन एक - जर तो सांगली, कोल्हापूरच्या शेतातल्या हुरड्यासारखा कोवळा नवरा असेल म्हणजे लग्नाला १-२ वर्षच झाली असतील तर तो डायरेक्ट पांघरुणात घुसून पाठ करून झोपून जाईल पण सकाळी तुझ्या आधी उठून चहा करेल , गुड मॉर्निंग म्हणून हाती चहाचा कप ठेवून तुला सरप्राईझ देईल. तू नुसतं गोड हस, काही बोलू नकोस . मग तो म्हणेल तुला एक सांगायचं होतं , तू म्हण ,नको सांगुस, कळलंय मला. काल अंधारात धडपडून माझा आवडता फ्लॉवर पॉट तोडलास ना ? इट्स ओके . आज येताना एमसील, सोनेरी रंग आणि ब्रश घेऊन ये , रात्री तो पुन्हा जोडूया आणि सोनेरी रंगाने पेंट करूया , मस्त दिसेल ब्लॅक अँड गोल्ड . कशी वाटते आयडिया ? त्याला सुखद धक्का बसेल . तो तुला जवळ ओढेल आणि म्हणेल , आज सुट्टी टाक ना !! तू म्हण , चल चल , लाडात नको येऊ! बँकेत खूप काम आहे .( मनात म्हण , हीच तुला शिक्षा!)

सिन दोन- जर नवरा लग्नानंतर ५ -७ वर्ष झालेला असेल , लोणच्यातल्या लिंबासारखा , मुराम्ब्यातल्या फोडी सारखा संसारात पक्का मुरला असेल तर तो रात्री आल्यावर जेवून घेतल्यावर मुलांच्या बेडरूम मध्ये नेहेमीसारखा गुडनाईट किस द्यायला नक्की जाणार नाही ( बरोब्बर !, वास येईल म्हणून ). तो डायरेक्ट येऊन झोपेल , सकाळी उठून चहा करणार नाही . समोर चहा नेलास तरी पेपर मध्येच तोंड घालून बसेल .डोळ्याला डोळा भिडवणार नाही . पेपर मधूनच उत्तर देईल. लगेच अंघोळीला पळेल . कचऱ्याच्या डब्यात तुला फ्लॉवरपॉटचे तुकडे दिसतील . तू गप्प बस , तोही गप्प .तसाच ऑफिसला जाईल . दुपारी चारच्या चहाला तो फ्री असतो तेव्हा त्याला मेसेज कर ," प्रिय, तुला थँक्स म्हणायचं राहून गेलं , काल तू फ्लॉवरपॉट चे तुकडे उचलून कचर्यात टाकलेस ते फार बरं झालं , माझ्या किंवा निहारच्या पायाला नक्कीच लागले असते. तो हल्ली कुठेही धडपडत असतो. आमची किती काळजी घेतोस तू !! आणि हो, दरवाज्यातच आपण एक छोटा बल्ब लावून घेऊ त्यामुळे अंधारात कोणी धडपडणार नाही . लव्ह यु !!"

तो आज येताना नक्की मराठी नाटकाची दोन तिकिटं घेऊन येणार , एरवी मराठी नाटकं फार महाग झालीयेत म्हणत असतो.

 सिन तीन - जर तुझा नवरा तुझ्या एल आय सी च्या " जीवन आनंद " पॉलिसी सारखा पिकला ( मॅच्युअर ) झाला असेल . लग्नाला १०-१५ वर्ष झाली असतील, तर सकाळी उठून तुलाच म्हणेल अगं , किती ते घरात फ्लॉवरपॉट? माणसं चार , फ्लॉवरपॉट चाळीस ! उगीच श्रीमंती चाळे !! कुठेही बाहेर गेलं कि आणा फ्लॉवरपॉट , घराचं म्युझिअम करून ठेवलय नुस्तं.

तुझ्या तोंडावर असे शब्द येतील , छान ! म्हणजे आपण रात्री पिऊन यायचं , अंधारात डोळे फुटल्यासारखं चालायचं , माझा महागडा एकुलता फ्लॉवरपॉट तोडायचा आणि वर मलाच झापायचं ? अगदीच कसेहो सासूबाईंवर गेलात तुम्ही ?

पण माझ्या प्रिय मुली , हे शब्द तिथेच गिळून टाक , बाहेर पडू देऊ नकोस . दीर्घ श्वास घे आणि आता हे म्हण ," खरंय तुमचं , चुकलंच माझं !! प्रत्येक वेळी फ्लॉवरपॉट घेतला कि मला क्षणिक सुख मिळतं पण ते लगेच जातं . पुन्हा नवीन वस्तूच्या मागे धावावंस वाटतं .काही लोकांचं असच क्षणिक सुख खाण्यात किंवा पिण्यात असतं . आज काय ऑफिसमुळे , उद्या क्लायंट बरोबर, कधी मित्रांची पार्टी , कधी लग्न समारंभ, कॉलेजच रियुनिअन, तर कधी शनिवार रात्र, पाऊस, पिकनिक, मस्त हवा , इंडिया जिंकली, मोदी आले . कारणं तर सतत चालूच . आता आपण दोघांनीही या प्रसंगातून थोडा अध्यात्मिक धडा घेतला पाहिजे . मी तुम्हाला दोष देत नाहीये पण ही माणसाची प्रवृत्ती आहे. कुठे थांबायच ते कळायला हवं . काय वाटतं तुम्हाला ?

सुषमा , पहिला नवरा सत्व गुणी होता , चूक झाली , त्याला कळली , सावरला . दुसरा नवरा रजो गुणी होता , चूक झाली , कळली पण अहंकार आडवा आला . अहंकार हेच रजो गुणाचं लक्षण . तिसरा तमोगुणी होता , तो म्हणतो चूक झालीच नाही , उलट तुझीच झाली . आता या तिघांनाही जशास तसं करायला गीता शिकवत नाही . बरं का सुषमा , हे तीन नवरे नव्हेत , हि तुझ्याच नवर्याची कालानुरूप बदललेली तीन रूपं आहेत . गम्मत आहे कि नाही ? गीता म्हणते , तू मात्र सत्व गुणीच राहायचं म्हणून तर गुणांनुसार हे तीन वेगवेगळे रिस्पॉन्स दिले पण परिणाम मात्र एकच झाला तुझ्यावरच प्रेम जास्त वाढलं .

सुषमा , नवरा हा हातातला रुबिक्स क्यूब असतो. त्याला अनेक बाजू असतात . त्याची कुठली बाजू आपल्यासमोर आणायची? गोंधळलेली मिक्स ,रागीट लाल भडक , निरस सफेद , रोमँटिक हिरवी ? हे कौशल्य तुझ्या बोटात हवं. त्याच्यापुढे " हरले बाई !!" अस सारखं म्हणतेस ना ? गीता तुला नवऱ्याला “जिंकायला” शिकवते ते सुद्धा त्याला न "हरवता" !! जग प्रसिद्ध मॅनेजमेन्ट कन्सल्टन्ट स्टीफन कोव्हे याला " वीन वीन " सिच्युएशन म्हणतो . आता कळलं ना " आमची " गीता काय सांगते ?