मंगळवार 11 डिसेंबर 2018

स्टॅच्यू पासून स्टॅच्यू पर्यंत- एक प्रवास मैत्रीचा

मी मनु , मानसी आणि ती तनु, तनुश्री माझी मैत्रीण. आम्ही स्कूल पासून बेस्टिज. शोले मधल्या वीरू-जय सारखी आमची जोडी कॉलोनी ते कॉलेज फेमस आहे. मी म्हणते तनु आणि मनु, म्हणजे शरीर आणि मन , इनसेपरबल. उद्या तनुच राजीवशी लग्न होणार आहे . अरेंज्ड मॅरेज. मी आज जरा सेंटी होऊन त्याला पत्र लिहितेय.

प्रिय राजीव, मला तो स्कूलचा सहावीतला पहिला दिवस आठवतोय. पपांची ट्रान्स्फर झाली. आम्ही शहरात आलो. शाळा बदलली. मैत्रिणी कोणी नव्हत्या. माझा पहिला दिवस. मुलानी मधल्या सुटीत उच्छाद मांडला होता. मी टिफिन उघडून खाणार इतक्यात तनु अचानक समोर आली. पिस्तुलसारखी दोन बोटं माझ्यावर रोखून म्हणाली, स्टॅच्यू !!! मी एका पायावर तशीच उभी राहीले. हातात उघडा डबा होता आणि डबा सांडला. सॉरी सॉरी म्हणत तनुने चटकन डबा उचलला. "मी तनु, आजपासून आपण बेस्ट फ्रेंड्स "!! तनुने डिक्लेअर केल. मी त्यादिवशी तिचा टिफिन शेअर केला. ओलसर पोळी, तिखट भाजी, लोणच. खूप छान चव लागली. स्टॅच्यू मुळे अशी आमच्या मैत्रीला सुरूवात झाली.

राजीव , (माझं झालं नसलं तरी ) लग्न या विषयावर मी पी एच डी होईल इतका स्टडी केलाय, तुला त्यातले काही फन्डे ऐकवते. मैत्रीणींची मैत्री आणि नवरा बायकोच प्रेम यामधे नेमका काय फरक असतो ? हा प्रश्‍न मला नेहेमी पडतो. कारण आम्हाला दोन्ही स्टेजेस मधून जावं लागतं. नवरा बायको मधे गिव अँड टेक असतं. मैत्रिणीमधे गिव अँड गिव. दोन्ही नात्यात ईगो हा महत्वाचा फरक असतो. परवाच माँल मधे एक डिओ बघितला, नाव होतं, ईगो. एकदम सुचलं, ईगो हा डिओ सारखा असावा. त्याने आपल्याला छान वाटावं, पण जास्त मारला की दुसर्‍याच्या नाकात जाऊन शिंका आणतो तसं होऊ नये..

इगो, अहंकार ही पुरुषाची सावली आणि पहिली पत्नी, ऑफीस ही दुसरी पत्नी, लग्नाची बायको तिसरी पत्नी. पण डोक्यावर छत्री (प्रेमाची) धरली की पायाखालची सावली अदृश्य होते. अहंकार हा वाघिणीच्या दातांसारखा असतो. क्षणात मानेत खुपसुन भक्ष्य पळवणारी वाघिण त्याच दातानी आपल्या पिलाना उचलून सुरक्षित जागी ठेवते. देवाने दात वापरायच द्न्यान तिला दिलंय तसच अहंकाराचे दात वापरायच आपल्यालाही दिलंय. तुम्ही दोघांनी एवढं जरी केलं तरी उद्यापासून तुला एक छान मित्र मिळेल आणि तिला एक मैत्रीण !!

नवरा बायकोत म्हणे प्रेम असावं, म्हणजे नेमकं काय? प्रेम म्हणजे सेंट नसावं. अंगावर उडवून लोकाना दाखवता येणारं. स्वत:च दुस-यापर्यंत पोहोचणारं. प्रेम असावं कस्तुरी सारखं. पोटात दडवलेलं. रोज थोड थोड झीरपणारं, दुस-याला शोधत शोधत आपल्या पर्यंत आणणारं. रोमान्सची सुरवात रात्रीच्या कॅंडल लाइट डिनर ने किवा महागड्या पर्फ्यूमने होऊ नये. सकाळच्या गुड मॉर्निंग स्माइलने किवा मी करू का मदत? या छोट्याश्या प्रश्नाने ती व्हावी. नाही का ?

राजीव, मौलमधल्या शॉपिंग बॅग्स तुम्ही उत्साहात उचलता ना? तसाच मनावरचा भार वेळोवेळी उचलायचा. फक्त उचलायचा, अनॅलिसिस नाही करायचं, सोल्यूशन नाही द्यायचं. म्हणजेच फक्त ऐकायचं. लक्षात ठेव मैत्रीत, प्रेमात माणूस ऐकतो, संसारात, प्रपंचात माणूस बोलतो. ऐकणारा जिंकतो, बोलणारा कायम लढत राहतो. मला वाटत आज एवढं पुरे.

उद्यापासून आमचा दोघींचा दिवस वेगळा असेल. आज आम्ही दोघी मिळून एक चित्र रंगवणार आहोत. उद्या सकाळी त्याचे दोन भाग करून आपापल्या घरी घेऊन जाणार. आमचे मोरपंखी, सोनेरी दिवस उदबत्ती सारखे विझून त्याची उदी होण्यापेक्षा ते फ्रेम मधे आम्ही कायमचे लॉक करून ठेवू आणि म्हणू स्टॅच्यू !!!! स्टॅच्यू पासून सुरू झालेला प्रवास उद्या असा स्टॅच्यू पर्यंत येऊन थांबेल. संपेल अस मी म्हणणार नाही.

हा बघ एक मोठा टपोरा थेंब कागदावर पडला. शेवटी डोळ्यानी फसवलच. त्याना म्हटलं होतं तुम्ही पत्र संपेपर्यंत तरी साथ द्या. पण असो. आता थांबायला हवं. विश यू शुभ मंगल पण सावधान !! बाय !!

तुझ्या तनुची मनू