मंगळवार 11 डिसेंबर 2018

स्वातंत्र्यदिन आणि नागपंचमी !

  स्वातंत्र्यदिनी  नागपंचमी असणे हा योगायोगच . भारतातले सगळे राजकारणी नागोबा आज आपापल्या बिळातून बाहेर येऊन जन गण मन च्या तालावर एकत्र डोलतात . उद्यापासून पुन्हा आपल्या बिळात जाऊन एकमेकांवर फुत्कारतात . असो . आपण सामान्य मध्यम वर्गीय असल्यामुळे आपले महाराज सांगतात ते ऐकायचं आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं . त्यामुळे हा विषय सोडूया . खऱ्या नागोबांकडे वळूया . 

नागोबांकडून संकटाला प्रतिसाद कसा द्यावा हे माणसाने शिकावं. बऱ्याचदा ते फणा काढतात , फुत्कारतात . तेवढच पुरे होतं . शत्रू घाबरतो तेही आपल्या मार्गाने निघून जातात . उगाच शक्ती वाया  नाही घालवत . आपणही आयुष्यात  हे करायला हवं . तुम्ही त्रास देईपर्यंत नाग तुमच्यावर हल्ला करत नाही  पण तो पूर्ण तयारीत असतो . त्रास दिलाच तर तो सर्व शक्ती आपल्या विषात एकवटतो , दंश करतो, शत्रूला निकामी , पॅरलाईझ  करतो . माणसामध्ये सुद्धा असा एक असामान्य गुण असतो कि जो कितीही मोठं संकट धावून आलं तरी त्याला पॅरलाईझ करू शकतो . तो गुण म्हणजे धैर्य , सहनशक्ती . मिर्झा राजे जयसिंग यांनी स्वराज्याला वेढा घातला त्यावेळचे शिवाजी महाराज असोत किंवा शत्रूच्या तावडीत सापडलेला देशभक्त जावं असो कि मरणांतिक वेदना भोगणारा एखादा रुग्ण असो , असामान्य धैर्य , सहनशक्ती सर्वांना पुरून उरते . 

इंद्रिय कशी वापरायची हे नागाकडून शिकावं . नागाला कान  नसतात त्यामुळे दिवसभर कानावर पडणारं फालतू त्याला ऐकूच येत नाही आणि म्हणून मन चलबिचल होत नाही . नाग जिभेने वास घेतात हे माहितेय का तुम्हाला ? तोंड उघडून जीभ लपालपा हलवणारे नाग हवेचा आणि त्यातल्या कणांचा वास घेतात परिस्थितीचा अंदाज घेतात . ते जणू सांगत असतात कि तोंड उघडण्यापूर्वी अंदाज घ्या . आपण कुठे बोलतोय काय बोलतोय हे बघा . 

पाहिजे तेव्हा डोळ्यावर कातडं ओढणारे सुद्धा नागच . वाईट ऐकू नका वाईट बघू नका तोंड उघडण्यापूर्वी विचार करा हा गांधीजींच्या ३ माकडांचा उपदेश पाळणारे कोण ? आपण नव्हे , नाग !!

दूध आणि पाणी यांच्या अभिषेकामुळे थंड झालेल्या दगडाच्या शिव पिंडीवर नाग वाटोळे करून बसतात . ते शिवभक्त नसतात मनात हेतू स्वतःला थंड करण्याचा असतो. ते सुचवतात कि नुसतं देवाला कवटाळून देव देव करून आपण भक्त होत नाही त्यामागे आपला हेतू देवाने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात हा असतो. त्याला भक्ती म्हणत नाहीत. भक्ती म्हणजे देवाला आवडेल अस वर्तन करणं . 

नागोबांचे एक महा आळशी थोरले बंधू आहेत त्यांचा उल्लेख आज केल्याशिवाय राहवत नाही . ते म्हणजे अजगर . आयुष्यात अपयशाला कसं तोंड द्यावं  हे अजगराकडून शिकावं. अजगर आधी गिळतो मग हळू हळू पचवतो . आपण आलेलं अपयश गिळायला , स्वीकारायला तयार नसतो . त्यापूर्वी काथ्याकूट करतो अनालिसिस करतो . दुसऱ्याला , दैवाला , परिस्थितीला दोष देतो . मनःशांती घालवतो .  अजगर शिकवतो कि आधी नम्र पणे अपयशाचा स्वीकार करा, गिळा नंतर कुठे कसं चुकलं याचा विचार करा. एक अपयश जर व्यवस्थित पचवता आलं तर तेच शक्ती देतं,  अनुभव देतं  मग पुढे यश पदरात पडतं . 

 खऱ्या नागोबांकडून त्यांचे सद्गुण शिकणं हीच खरी नागपंचमीची  पूजा !