बुधवार 05 डिसेंबर 2018

वॉरेन बफेट

सामान्यांच्या पंढरपुरात विठ्ठल हा देव आणि तुकोबा हा भक्त श्रेष्ठ , तसाच जागतिक शेअरबाजाराच्या पंढरीत मार्केट हा देव आणि वॉरेन बफेट हा तुकोबा समजला जातो. सत्तर वर्षांचा स्टॉक मार्केटचा अनुभव असलेला हा अमेरिकन यशस्वी अब्जाधीश. त्याचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी असतं . मार्केटचा देव फक्त त्यालाच इतका प्रसन्न झालाय .

 

मी मराठी , त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात पडण्यापूर्वी मला हजार शंका असतात . त्या सुटल्या तरच मी क्षेत्रात पडतो . मग त्या क्षेत्रात पुन्हा (तोंडघशी) पडतो . त्यामुळे माझी पहिलीच शंका होती कि याचं नाव बुफेट , बफेट , बुफे कि बफे ? ते शोधायला मी टीव्ही वरची अर्थ विषयक निरर्थक सल्ला देणारी चॅनेल्स बघायला सुरुवात केली . ज्यांचा सल्ला ऐकून तुम्ही गार व्हाल असे एक एक सल्लागार तिथे बसतात . रेडिओ एफ एम वर जशी रोज एका नव्या गाण्याची शिफारीश होते तसे हे रोज एक नवीन शेअर शोधून , हा घ्या म्हणून फर्माईश करतात . वास्तविक रोज नवीन शेअर घ्यायचा नसतो , घेतलेला १० वर्ष टिकवायचा असतो हे शेअर बाजारातलं ग,म,भ,न त्यांच्या गावी ही नसतं . त्यांना फक्त टी आर पी हवा असतो. त्यांची भाषणं ऐकून मला कळलं कि वॉरेन बफेट हा माणूस श्रीकृष्णासारखा आहे . कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या . कुणी काहीही म्हणा त्याला फरक पडत नाही . असो

 

मराठी माणसाची एक गंमत आहे तो आपल्या शेअर मार्केट मधल्या इन्व्हेस्टमेंट बद्दल कमालीची गुप्तता पाळतो कारण त्याच्या मागे त्याचे मित्र त्याचा उल्लेख , हल्ली तो शेअर मार्केट मध्ये " घुसलाय " असा करतात . त्याला अति धाडसी समजतात ,इतकच नाही तर अशा माणसाच्या बायकोकडे सुद्धा "" बाई ग ! काय अंगावरचं किडूकमिडूक सोनं नाणं असेल ते जपून ठेव ग बाई , कधी कामी येईल सांगता येत नाही " अशा नजरेने बघतात . याला कारण पुन्हा टीव्ही चॅनेल्स . त्यांच्याकडे दर पंधरा दिवसांनी बाजार कोसळला अशी बातमी (ताजी ? ) तयार असते.

 

एकदा मी शेअर मित्रांच्या कोंडाळ्यात बसलो होतो . नवखा होतो . त्यात एक शेअर बाजारात कोल्हा झालेला होता . म्हणजे बँकेकडून लोन घेऊन ट्रेडिंग करणारा , लॉस मुळे शेर होण्या ऐवजी कोल्हा झालेला तरीही वाघाचं कातडं पांघरणारा .चर्चा रंगात आल्यावर मी बावळट पणे विचारलं , हा वॉरेन बफेट कोण ? शिवाजी पार्कमध्ये क्रिकेट खेळताना चार चौघात मोठ्याने सचिन तेंडुलकर कोण असं विचारल्यावर आजूबाजूचे जसे क्षुद्र म्हणून आपल्याकडे बघतात तसे सगळे बघू लागले. तो दिवस मी विसरणार नाही .

 

त्यांचीक्षुद्र ठरवणारी नजर पचवून हिम्मतीने मी म्हणालो , महा गुरु बफेटचा सल्ला आणि लग्नातला बुफे यांच्यात मला कमालीचं साधर्म्य आढळलं . इथे सांगितलंच पाहिजे . बुफे म्हणजे मराठी माणसासाठी लग्नात तुटून पडण्याची , उभे राहून बकाबका जेवण्याची , नवीन कपड्याना पिवळे डाग पाडून घेण्याची गोष्ट .

 

बफेटचा उपदेश बुफे मध्ये कसा तंतोतंत लागू पडतो ते पहा . मग तुम्हाला शेअर मार्केटच्या सल्लागाराची गरज नाही

 

बफेट म्हणतॊ……………..

 

-ताटात अनेक पदार्थ थोडे थोडे घेता तसेच शेअर्स मध्ये सुद्धा डिव्हर्सिफाय करा , अनेक सेक्टर्स चा समावेश असू दे

 

- आपल्याला माहीत आहेत तेच पदार्थ ताटात घ्या , उगाच चिकन रावळपिंडी ट्राय करू नका . invest in companies which you know

 

-हळू हळू खा , पदार्थ जास्त वेळ ताटात कमी वेळ पोटात ठेवा. शेअर्स घेतल्यावर धीर धरा. वाट पहा

 

- दुसर्याच्या ताटा कडे बघून पदार्थ घेऊ नका . आपली गरज ओळखून शेअर्स घ्या

 

- लोक ज्यावर तुटुन् पडतात ते पदार्थ टाळा उदा. जीलबी , भजी. लोक जे जास्त खात नाहीत सलाड कोशिंबीर वगैरेते घ्या , हेल्दी असतात . be fearful when people are greedy , be greedy when they are fearful

 

- अन्न टाकू नका , फुकट घालवू नका , शेअर मार्केट मध्ये नफा झाला नाही तरी चालेल पण लॉस टाळा .

rule no 1 - save the capital , rule no 2 - never forget rule no 1

 

- भाजी जिलबी संपली म्हणून निराश होऊ नका , ती परत परत येत राहणार आहे . मार्केट वरखाली होतच राहणार , संधी पुन्हा पुन्हा येतच राहणार. market fluctuation is your friend not enemy.

 

मी म्हणतो मराठी माणसाला काय गरज आहे वॉरेन बफेट च्या उपदेशाची ? आमच्याकडच्या लग्नात आम्ही हे लहानपणापासून शिकत आलोय तरीही तो अब्जाधीश कसा झाला हे कळत नाही बुवा !!

0 अभिप्राय :
Post Your Comment