बुधवार 05 डिसेंबर 2018

नॉन स्टिक पॅन - मन मोहन

प्रिय सुहासिनी , आपलं आणि श्रीकृष्णाचं मन एकच नाही का ? त्यात फरक काय ? असा प्रश्न तू एकदा विचारला होतास . हे बघ , आपलं मन म्हणजे लोखंडी तवा , त्याला सगळं चिकटून राहतं . आसक्ती . त्याचं मन म्हणजे निर्लेपचा नॉन स्टिक पॅन . आम्लेट असो व पिठलं . पॅन  आपलं काम करतो पण त्याला काही चिकटून राहात नाही. म्हणून तो मन मोहन . मोह नसलेलं मन . मोहात तो अडकत नाही पण मोहात पाडतो . लहान पणापासून लोणी , गवळणी , सवंगडी , राधा , मीरा , रुक्मिणी , सत्यभामा , गोकुळ , वृन्दावन , मथुरा , अर्जुन , बलराम , कशा कशातही तो अडकला नाही . काहीच त्याने चिकटू दिलं नाही . तुला गम्मत सांगू का ? कृष्णाच्या आजूबाजूची सर्व माणसं म्हणजे मानवी मनाच्या अवस्था आहेत . पेंद्या - कमजोर लंगडं मन , सुदामा - गरीब मन , बलराम - शक्तिशाली मन , रुक्मिणी - निर्व्याज प्रेम करणारं मन , सत्यभामा - मनाची श्रीमंती ,राधा - जीव ओवाळून टाकणारं मन , मीरा - निरपेक्ष त्याग , कंस - दुष्ट मन , वासुदेव - पित्यासारखी काळजी घेणारं मन . आपण सर्व, मनाने या सगळ्या अवस्थामधून जात असतो. तो मात्र निसटतो आपण अडकतो . तो निष्पाप निष्कपट निर्लेप राहतो म्हणून मोहन . अजून ऐक , गोवर्धन पर्वत म्हणजे संसाराची जबाबदारी तो बोटावर लीलया पेलतो , आपण धापा टाकतो . देवकी यशोदा म्हणजे आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी , तो दोघांच्याही मांडीवर खेळतो . लोणी म्हणजे लहानपणीच्या न टिकणाऱ्या गोष्टींचं आकर्षण , गोपी म्हणजे तारुण्य , यौवन , सौंदर्याचं आकर्षण . गोकुळ म्हणजे कुटुंबावस्था प्रवृत्त जीवन , वृंदावन म्हणजे निवृत्त जीवन . बघ , पुन्हा तो कशातही अडकला नाही .

सुहासिनी , तू मोह टाकलास कि देव झालीस अर्थात मनाने. तोच मोक्ष . विनोबा म्हणतात मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय .

सीमा चित्रपटातलं गाणं आता मागे वाजतेय . मन मोहन बडे झुठे ..... . नूतनचा नैसर्गिक अभिनय ,लताचा मुलायम आवाज, शेवटच्या रेशमी ताना, माहोल बनलाय . बडे झुठे म्हणजे खोटारडा . येतो सांगूनही येत नाही , आला कि लगेच निघून जातो . प्रेमातली व्याकुळता , विरह . प्रेमाला हवं असतं चिकटून राहणं , सोडून न जाणं. येईपर्यंत धीर नाही , आला कि सोडवत नाही . पण निसटून जाणं हा त्याचा गुण म्हणून तो मोहन , नॉन स्टिक पॅन .

आपल्या नात्यात मी पण चिकटून राहिलो असतो तर एव्हाना एखाद्या मॉल मध्ये मुलं आणि सामानाने भरलेली ट्रॉली ढकलत तुझ्या मागून फिरलो असतो . पण आज आपल्या सोनेरी सहवासाच्या आठवणी पापण्या मिटल्या कि क्षणात येतात . मनाच्या तळहातावर फुलपाखरू बनून विसावतात . आजीच्या दुलईची उब देतात.    

माझ्या सारख्या फुलपाखराला चिमटीत न पकडता उडू दिल्याबद्दल तुझे आभार. म्हणूनच मी चित्रकार होऊ शकलो पण तुझ्या आयुष्याचा कॅनवास रंगवू शकलो नाही याची खंत वाटते . सुहासिनी , आठवणी द्रौपदीच्या थाळी सारख्या असतात त्या कधीच कोणाला उपाशी ठेवत नाहीत. त्यावरच जगूया. काळजी घे .

तुझा नवरा होऊ न शकलेला मित्र - मोहन 

0 अभिप्राय :
Post Your Comment