गुरुवार 06 डिसेंबर 2018

ती एक आधारवड

ती एका मोठ्या कुटुंबाचं एक विशाल आधार वड होती . प्रत्येक गावात एक मोठा प्राचीन आधार वड असतो. त्या भोवती गाव वसलेलं असतं . त्याच्या पारावर अक्ख गाव गोळा होतं . पोरं टोरं दंगा करतात . पाटील देशमुखांच्या गप्पा रंगतात . शेतकरी बैल सोडतात .. एखादी गाय ध्यानमग्न रवंथ करते . तिथेच माहेरवाशिणी मंगळागौर करतात . लेकी सुना वट पौर्णिमेला सौभाग्याचा धागा गुंडाळतात . दांडगी मुलं पारंब्यानं झोंबतात .पाना फांद्यात असंख्य पक्षी आपला घरटी संसार सांभाळून आश्वस्त असतात . पंख फुटल्यावर चिमणी पाखरं इथूनच उडतात पुन्हा परत न येण्यासाठी . आधारवड असं अक्ख गावच अंगावर वागवतो .

हे वर्णन तिचं आहे कुठल्या वटवृक्षाचं नाही .

आता मी इथे समुद्र किनारी उभा आहे . काळ मावळतीचा सूर्य तिला घेऊन साता समुद्रापलीकडे गेला . आमच्यामध्ये आता फक्त आठवणींचा विशाल समुद्र आहे . गत स्मृतींच्या लाटा माझ्या पायाशी येऊन चुळुकबुळूक करतायत. मला आठवतेय .

मी अनेकदा सिद्धिविनायकाला भेट देऊन तिथून एक हार घेत असे . मग तिच्या घरी जात असे . तिच्या विठ्ठलाला घालण्यासाठी . ती मला अंगारा लावून तिचा महामंत्र देत असे . जादूगाराच्या मंतरलेल्या पाण्यासारखा त्याचा उपयोग होई . ती म्हणे, काही काळजी करू नकोस , सगगळं छान होईल .. त्या मंत्राने मला चार बाटल्या रक्त चढवल्यासारखं होई . मी मुरारबाजी सारखा पुन्हा लढायला तयार होत असे .

कदाचित देवाला त्या महा मंत्राची गरज असावी म्हणून तो आमचा आधार वड घेऊन गेला . पण त्याला माहीत नाहीये , तो फक्त वड नेतोय. आधार इथेच आहे , इथेच राहील , आमच्यापाशी , अजून कित्येक वर्ष !!

0 अभिप्राय :
Post Your Comment